नवी मुंबई : कोणताही खेळ हा आरोग्यपूर्ण जीवनासाठी अत्यंत महत्वाचा असून मुलांमध्ये लहान वयापासूनच विविध खेळांची आवड जोपासली जावी तसेच त्यांच्या अंगभूत क्रीडागुणांना उत्तेजन मिळावे याकरीता मागील ५-६ वर्षांपासून २० हून अधिक क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केल्या जात असून यामध्ये प्रत्येक वर्षी सहभागी खेळाडूंची संख्या वाढताना दिसत आहे ही समाधानकारक बाब असल्याचे नमूद करीत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी स्पर्धेत अतिशय उत्साहाने सहभागी होणार्या खेळाडू व पालकांचे कौतुक केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील एन.एम.एस.ए. क्रीडासंकुलातील तरण तलावात आयोजित नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे यांचेसमवत सभागृह नेते जयवंत सुतार, स्पर्धेचे निमंत्रक क्रीडा समितीचे सभापती प्रकाश मोरे व उपसभापती सौ. तनुजा मढवी, युवक कल्याण समिती सभापती गिरीश म्हात्रे, नगरसेवक रविंद्र इथापे, शशिकांत राऊत, उषा भोईर, प्रज्ञा भोईर, सायली शिंदे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, क्रीडा उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, सहा. आयुक्त दिवाकर समेळ, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जलतरणपट्टू गोकुळ कामथ, राष्ट्रीय जलतरणपंच संतोष पाटील उपस्थित होते.
नवी मुंबईतील अनेक क्रीडापट्टू आज राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकताना दिसतात असे नमूद करीत क्रीडा समिती सभापती प्रकाश मोरे यांनी हे महापौर चषक जलतरण स्पर्धेचे सातवे वर्ष असल्याचे सांगत प्रत्येक वर्षी प्रतिसाद वाढता असून यावर्षी जलतरण स्पर्धेत नवी मुंबईसह ठाणे जिल्हा व रायगड जिल्ह्यातील ४६० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला असल्याचे सांगितले. फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय, ब्रेस्ट स्ट्रोक अशा एकुण ६० प्रकारात ही स्पर्धा ८, १०, १२, १४, १७ वर्षाआतील मुले व मुली तसेच खुला गटातील पुरूष व महिला अशा १२ गटात खेळविली जाणार आहे. प्रत्येक गटासाठी ३ पारितोषिके रोख व मेडल्स स्वरूपात दिली जाणार असून एकुण दोन लक्ष रक्कमेची पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत अशी माहिती त्यांनी प्रास्ताविकपर मनोगतातून दिली.
१२ आणि १३ डिसेंबर कालावधीत आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १३ डिसेंबर रोजी सायं. ५.३० वाजता संपन्न होणार असून क्रीडाप्रेमी नागरिकांनी दिवसभर चालणार्या या स्पर्धेतील सहभागी जलतरणपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.