पाण्याच्या बाबतीत गेल्या काही वर्षापासून सुजलाम सुफलाम असलेल्या नवी मुंबई शहराला अचानक पाणीकपातीचा सामना करावा लागला आहे. स्वमालकीचे धरण अशा अभिमानात वावरणार्या नवी मुंबईकरांची अवस्था ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशा स्वरूपाची फेब्रुवारी,मार्च, एप्रिलमध्ये झाल्यास फारसे आश्चर्य वाटायला नको. दोन दिवसापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नवी मुंबईकरांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. त्यात नवी मुंबई महापालिका प्रशासनाने यापुढे आठवड्यातील तीन दिवस सकाळ आणि संध्याकाळ फक्त दोन तासच आणि चार दिवस सकाळी दोनच तास पाणीपुरवठा होणार असल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी मुंबई व ठाणे तसेच सभोवतालच्या शहरातील नागरिकांना अवघ्या काही तासावर पाणी उपलब्ध होत असल्याने या शहरातील नागरिकांचे विशेषत: महिला वर्गाचे वेळापत्रक बहूंताशी पाण्याच्या वेळापत्रकावर अवलंबून होते. अन्य शहरात गेल्यावर नवी मुंबईकर ‘आमच्याकडे २४ तास पाणी’ असे अभिमानाने सांगत होते. पण संसारी महिलेला अचानक वैधव्य यावे असाच काहीसा प्रकार पाण्याच्या बाबतीत सुजलाम सुफलाम असलेल्या नवी मुंबईकरांच्या बाबतीत झालेला आहे. महापालिका प्रशासनाला केंद्र व राज्य स्तरावर सातत्याने अनेक पारितोषिकांचा वर्षाव होत आहे. महापालिका प्रशासनाने पाणीकपात सुरू करण्यापूर्वी नवी मुंबईकरांमध्ये जनजागृती करून पाणीबचतीचे महत्व पटवून देणे आवश्यक होेते. सध्या सर्वत्र सोशल मिडीयाचा बोलबाला आहे. मनपा प्रशासनातील १११ नगरसेवक , स्वीकृत ५ नगरसेवक, मनपा प्रशासनातील कायम व कंत्राटी कामगार, मनपा प्रशासनातील अधिकारी या सर्वांनी आपल्यापरिने यथाशक्ती योगदान दिले असते तरी आज पाणीकपातीबाबत लोकप्रबोधन सहज साध्य झाले असते. आजही नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी चोरी सर्रासपणे व तेही खुलेआमपणे होते. नवी मुंबईतील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत आहे. पाणीचोरीबाबत त्या त्या भागातील नगरसेवकांना, पक्षीय पदाधिकार्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, इतकेच काय पण त्या त्या विभाग अधिकारी कार्यालयातील पाणी खात्यातील कर्मचार्यांनाही कोठे कोठे पाणी चोरी होत आहे, कोणत्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वा चाळीमध्ये अनधिकृत नळजोडण्या केल्या आहेत याची इंत्यभूत माहिती असते. अनधिकृत नळजोडण्यांना किमान ७० टक्के जरी बंद केल्या तरी नवी मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट बर्याच अंशी कमी प्रमाणात होईल. अनेक सिडकोच्या व खासगी गृहनिर्माण गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये, गावठाणातील चाळीमध्ये, इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोडण्या आहेत. आता नवी मुंबईकर आलेले पाणीसंकट पाहता पालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे. अनधिकृत नळजोडण्याबाबत पालिका आयुक्तांनी शोधमोहीम राबविली आणि विभाग अधिकारी कार्यालयातील पाणी खात्यातील कर्मचारी-अधिकार्यांची आयुक्तांनी झाडाझडती घेतल्यास अवघ्या दोनच दिवसात अनधिकृत नळजोडण्या उजेडात येतील. दोन दिवसाची आवश्यकता नाही, अवघ्या काही तासातच या अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करणे महापालिका प्रशासनाला शक्य आहे. मुळातच २४ तास पाण्याची सवय असणार्या नवी मुंबईरांना आता अवघ्या दोन तास उपलब्ध पाणीपुरवठ्याची सवय आगामी पावसाळ्यापर्यत अंगवळणी लावून घेणे गरजेचे आहे. पाणीचोरीबाबत मनपा प्रशासनाने आक्रमकता दाखवित अनधिकृत नळजोडणीच्या माध्यमातून पाणीचोरी करणार्या चाळी, गृहनिर्माण सोसायट्यांवर आर्थिक दंडात्मक कारवाई करून संबंधित चाळमालकांवर, सोसायटींच्या पदाधिकार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे धाडस आता महापालिका प्रशासनाला दाखवावेच लागेल. दोन दिवसापासून नवी मुंबईत खर्या अर्थांने ‘पाणीबाणी’ लागू झालेली आहे. नवी मुंबईकरांचे पाण्यामुळे काळंवडलेले चेहरे पुन्हा एकदा हास्यमय करायचे असेल तर पाणीचोरांवर अकूंश हा बसवावाच लागणार आहे. पाणीचोरी रोखल्यास नवी मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. तसेच पाण्याचा वापर पैशाच्या माध्यमातून झाल्यास महापालिका प्रशासनाच्या उत्पन्नातही वाढ होईल. पाणीचोरीचा शोध घेणे महापालिका प्रशासनाकरता सहजशक्य आहे. फक्त आगामी पावसाळ्यापर्यत कोठे जलवाहिनी फुटणार नाही याची सर्वप्रथम महापालिका प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे. गळक्या जलवाहिन्या कोठे असतील तर त्याची त्वरीत डागडूजी होणेही आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाची इच्छाशक्ती व मनपा पाणीपुरवठा विभागातील क्रयशक्ती याचा मिलाफ झाल्यास अवघ्या काही तासातच नवी मुंबईतील पाणीचोरांचा फडशा पाडणे सहजशक्य आहे. अनधिकृत नळजोडण्यांना आतातरी प्रतिबंध बसणे अत्यावश्यक आहे. पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर नवी मुंबई आता आलेली आहे. नवी मुंबईकर आता पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीचोराचा शोध घेवून त्यांना प्रतिबंध न केल्यास मार्च महिन्याच्या मध्यावर नवी मुंबईकरांना कदाचित दिवसाआड पाणी उपलब्ध होण्याची भीती आहे. ही अतिशयोक्ती नसून पाणीचोरीचे व अनधिकृत नळजोडण्यांचे वाढते प्रमाण पाहता हा दिवस मार्च महिन्यात नवी मुंबईकरांना पहावाच लागणार आहे. पाणीचोर व अनधिकृतरित्या नळ जोडण्या करणार्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर आर्थिक दंडाची व फौजदारी गुन्ह्याची तत्परता महापालिका प्रशासनाने दाखविणे काळाची गरज आहे. महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांचे हित पाहता व संभाव्य पाणीटंचाईचे भयावह संकट पाहता अनधिकृत नळजोडण्यांचा व पाणीचोरांचा आर्थिक दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल करून नायनाट करणे काळाची गरज आहे. अनधिकृत नळजोडणीच्या माध्यमातून पाणीचोरांचे वाढते धाडस पाहता नजीकच्या काळात नवी मुंबईकरांना दिवसाआड पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे आणि हा दिवस उगवला तर त्यास पाणीचोरांना व अनधिकृत नळजोडण्यांना कानाडोळा करणारे नवी मुंबई महापालिका प्रशासनच त्यास जबाबदार असेल.