मुंबई : कडक उन्हाने तापणारे मुंबईकर दोन दिवसांपासून चांगलेच गारठले आहे. उत्तर भारतात थंडीची जबरदस्त लाट असल्याने मुंबईसह राज्याच्या काही भागात थंडीचा जोर वाढल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळनंतर आणि बुधवारी पहाटे शहर परिसरात गारव्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला.
मंगळवारी रात्रीपासून वातावरणात चांगलाच गारवा जाणवू लागला असून मुंबईकरही या थंडीचा आनंद लुटतांना पहायला मिळत आहे. शहराच्या तुलनेत उपनगरात थंडीचा अधिक प्रभाव जाणवला असून किमान १३ अंश से. तापमानाची नोंद करण्यात आली.
वातावरणातील थंडीचा प्रभाव पाहता बुधवारी लोकलमधील, घरातील पंखे आपसूकच बंद झाले होते. कपाटातील स्वेटर-शाल बाहेर पडल्या होत्या. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडयात थंडीने एन्ट्री केली असून शहर परिसरात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे.