मुंबई : एखाद्या स्पर्धेत बक्षिस म्हणून रोख रक्कम, गाडी, ट्रॉफी हे सगळं दिल्याचं तुम्ही पाहिलं असलेच. पण कुठल्या स्पर्धेत बक्षिस म्हणून बोकड आणि कोंबड्या दिल्याचं पाहिलंय? मुंबईच्या प्रभादेवीत कबड्डीची अशीच एक स्पर्धा पार पडली, ज्यात विजेत्यांना इनाम म्हणून चक्कबोकड देण्यात आला.
वरळीच्या आगरी सेवा संघाच्या कबड्डी स्पर्धेत शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या मुलांनी विजेतेपदावर नाव कोरलं आणि त्यांना इनाम म्हणून चक्कपंचवीस किलोचा बोकड देण्यात आला.
आगरी सेवा संघाच्या या कबड्डी स्पर्धेची गंमत म्हणजे फायनलच्या मैदानात शिवप्रेरणाकडून पराभूत झाल्यानंतर जय ब्राम्हणदेवची मुलं हिरमुसणं स्वाभाविक होतं, पण त्यांची निराशाही दहा गावठी कोंबड्याच्या इनामाने दूर केली होती.
विजेत्यांना पंचवीस किलोचा बोकड, उपविजेत्यांना दहा गावठी कोंबड्या. इतकंच काय पण उपांत्य पराभूत संघांनाही पाच-पाच गावठी कोंबड्या, मालिकावीराला दोन गावठी कोंबड्या आणि प्रत्येक दिवशी सर्वोत्तम ठरलेल्या खेळाडूलाही एक गावठी कोंबडी अशा अनोख्या बक्षिसांमुळंच आगरी सेवा संघाची कबड्डी ही मुंबईच्या क्रीडारसिकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
वरळीच्या आगरी सेवा संघाने कबड्डीच्या मैदानात रुजवलेली बक्षिसांची आगळीवेगळी परंपरा ही त्यांच्या संस्कृतीला साजेशी अशीच आहे. बाला टेनसन नाय घेवाचं. खावन पिवन मस्त र्हावाचं.
पद्माकर म्हात्रेंनी रंगवून सांगितलेल्या आगरी सेवा संघाच्या या कबड्डी स्पर्धेचा थाट खरंच लय भारी असतो. खरंतर सेमी फायनलच्या सामन्यांमधून मैदानात एकीकडे कबड्डीचं वातावरण तयार होत असतं. पण त्याच वेळी दुसरीकडे सुरु असतं मॉडेल्सचं फोटो सेशन.
पहिलं इनाम म्हणून त्यांना थेट पाहुणे मंडळीच्या गोतावळ्यात स्थान मिळतं. तिथंही फोटो सेशन होतं. गळ्यात हार पडतो. मग फायनलचा सामना सुरु होण्याआधी, एखाद्या मॉडेलने कॅटवॉक करावा तसा मैदानावर बोकडवॉक होतो. गळ्यात हार घालून स्वारी मैदानभर फिरली. मग काय विचारता, बोकडबुवांना जिंकण्यासाठी पोरं झाली ना येरी.
आगरी सेवा संघाच्या कबड्डीत इनामात बोकड आणि कोंबडया देण्याची पद्धत तुम्ही हसण्यावारी नेऊ नका. कारण या परंपरेमागेही आहे एक विचार. आगरी सेवा संघाच्या कबड्डीत इनाम म्हणून बोकड आणि कोंबड्या देण्यासाठी प्रभादेवीतल्याच काही दानशूरांचे हात पुढे येतात.
आगरी सेवा संघाच्या कबड्डीत बक्षिस समारंभाच्या कार्यक्रमाची गंमत काही वेगळीच होती. विजेत्यांच्या नावाचा पुकारा झाला की, एक एक कबड्डीपटू व्यासपीठावर जाई, मैदानात आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे पाय ओढून त्याला सहजतेने जेरबंद करणारा तो वीर मग कोंबड्यांचे पाय पकडून त्यांना मिरवत घेऊन येतानाचं दृश्य मोठं मजेशीर भासे. शिवप्रेरणाच्या शिलेदारानं तर ट्रॉफी उचलावी तसं बोकडाला उचलून पोटाशी धरलं होतं.