मुंबई : तीनशे टनाच्या दोन अजस्र क्रेन्स..जेसीबी..गॅस कटर मशीन्स..यांच्यासह रेल्वेच्या अभियंते व कर्मचार्यांनी अवघ्या १८ तासांच्या कालावधीत ब्रिटिश काळातील हॅँकॉक पुलाचे पाडकाम यशस्वीरित्या पूर्ण केले. हा पूल तुटल्याने मध्य रेल्वेच्या लोकलच्या वेगावरील मर्यादा दूर होणार आहे.
हॅँकॉक पूल पाडण्यासाठी एक महिन्यापासून नियोजन सुरू होते. शनिवारी मध्यरात्री १२.२० ते रविवारी सायंकाळी ६.२० वाजेपर्यंत तब्बल अठरा तासांचा विशेष ब्लॉक घेतला होता. रविवारी सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, रविवार सुट्टीचा दिवस आणि लग्नाच्या मुहूर्तामुळे कोलमडलेल्या रेल्वे वाहतुकीचा त्रास काही प्रमाणात मुंबईकरांना सहन करावा लागला.
रेल्वेवर गर्दी झाल्याने अनेकांनी आपला मोर्चा बेस्ट बसकडे वळवल्याने त्याही ओसंडून वाहत होत्या. विशेष म्हणजे जम्बोब्लॉकची पूर्वसूचना मिळाल्याने अनेकांनी रविवारी घरीच थांबणे पसंत केले.
जम्बोब्लॉकच्या काळात भायखळा ते सीएसटी दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद होती. या काळात १५० लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. तर अनेक लोकलची वाहतूक भायखळा, दादर आणि कुर्ला स्थानकांतून सुरू ठेवली होती. पुलाच्या तोडकामासाठी ६५० कर्मचारी, ५० अभियंते आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर रेल्वेने केला. त्यामुळे हे काम योग्य वेळेत पूर्ण करणे रेल्वेला शक्य झाले.
यासाठी तीनशे टनाच्या दोन क्रेन पुलाच्या दोन्ही बाजूने उभ्या केल्या होत्या. याशिवाय, एखादा तांत्रिक बिघाड झाल्यास खबरदारी म्हणून दोन अतिरिक्त क्रेन तयार ठेवल्या होत्या. या कामासाठी केलेली पूर्वतयारी आणि घडयाळाच्या काटयावर काम करणार्या कर्मचार्यांमुळे रेल्वे प्रशासनाला हा पूल वेळेत तोडणे शक्य झाले.
या काळात मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील १५० लोकल आणि ४२ मेल-एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाडयांच्या तिकीट परताव्यापोटी रेल्वेला तब्बल पाच ते सव्वापाच कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला. शिवाय, हा पूल तोडण्यासाठी रेल्वेला दोन कोटी साठ लाख रुपयांचा खर्च आला.
तर याठिकाणी नव्या पुलाची उभारणी महापालिका करणार आहे. यासाठी पंधरा ते वीस कोटी रुपयांचा अंदाजे खर्च वर्तवण्यात येत आहे. यासाठी किमान दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. हे काम पूर्ण झाल्याने वेग मर्यादा हटवण्यात येईल, अशी माहिती अधिका-यांनी दिली.
अत्याधुनिक यंत्रणा आणि कर्मचारी अभियंत्यांची साथ
हा पूल तोडण्यासाठी केवळ अठरा तासांचा ब्लॉक मिळाल्याने रेल्वेच्या अभियांत्रिकी आणि बांधकाम विभागासमोर मोठे आव्हान होते. मात्र, ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्यासाठी रेल्वेच्या अधिकार्यांची कसोटी लागली होती.
यामध्ये रेल्वेचे ६५० कर्मचारी ५० अभियंते रात्रभर कार्यरत होते. तर पुलाचे बांधकाम हे स्टीलचे असल्याने पुलाचे भाग कापण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंनी तीनशे टनाच्या दोन क्रेन आणि पर्यायी व्यवस्था म्हणून आणखी दोन क्रेन घटनास्थळी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. तसेच कुर्ला रेल्वे स्थानकात आपात्कालीन प्रसंगासाठी रेल्वेच्या मालकीची एक क्रेन तयार ठेवण्यात आली होती.
घराबाहेरील उघडयावरची रात्रदरम्यान, हॅँकॉक पुलाला लागून असलेल्या अनेक रहिवाशांना पाडकामाच्या काळात घराबाहेर हलवले होते. यामध्ये परिसरातील दीडशे ते दोनशे कुटुंबातील सातशे ते आठशे जणांचा समावेश होता. यामधील काहींना रेल्वेच्या रिकामी बोगी राहायला देण्यात आल्या होत्या.
त्याठिकाणी त्यांच्या राहायची आंघोळीची आणि जेवणाची सोय केली होती. तर काहींना रेल्वेच्या जागेत उघड्यावर बसवण्यात आले होते. त्यामध्ये स्त्रिया, लहान मुले यांसह वृध्दांना याचा त्रास सहन करावा लागला.