कल्याण : कचरा करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि आपण केलेला कचरा सफाई कर्मचार्यांनी उचलणे हे त्यांचे जन्मसिद्ध कर्तव्य’.अशा प्रकारची घाणेरडी मानसिकता नागरिक बदलत नाहीत, तोपर्यंत कचरा मुक्त शहराचं स्वप्न प्रत्यक्षात येणार नसल्याचे परखड मत कचरा निर्मूलन तज्ञ जयंत जोशी यांनी व्यक्त केले. येथील सुभेदार वाडा कट्ट्याचे आठवे पुष्प गुंफताना कचरा निर्मूलन विषयावर ते मार्गदर्शन करीत होते.
आजच्या घडीला जगातील सर्वाधिक प्रदूषित आणि अस्वच्छ देशांच्या यादीत भारताचा सर्वात वरचा क्रमांक आहे. आपल्या देशाची लोकसंख्या ही या कचर्याच्या समस्येचे मूळ कारण नसून इथल्या लोकांची मानसिकता या समस्येला कारणीभूत आहे. त्यासाठी आपल्या घरातील कचर्याचे ओला आणि सुका कचरा असे विभाजन केल्यास हा कचर्याचा प्रश्न ५० टक्के मार्गी लागू शकतो, असे जोशी यांनी सांगितले. घरातील चिरलेल्या भाज्या, अंड्याची टरफले, शिळे किंवा खराब झालेले अन्न एका विशिष्ट प्रकारच्या बास्केटमध्ये गोळा करण्याबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तर न्यायालयाने नवीन डम्पिंग ग्राउंड बनविण्यावर निर्बंध आणले असून आता यापुढे एकही डम्पिंग ग्राउंड तयार होणार नाही. त्यामुळे येत्या काळात कचरा आणि त्याचे निर्मूलन करण्याचा प्रश्न अतिशय उग्र रूप धारण करू शकतो. या डम्पिंग ग्राऊंडच्या डोंगरांमधून कार्बनडाय ऑक्सीइडपेक्षा ३०० पट घातक अशा वायूचे उत्सर्जन होत असते. ज्याच्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजारही होऊ शकतात. अगोदरच खूप उशीर झाला असून सर्व गोष्टी सरकार आणि महानगरपालिका यांच्या माथी मारण्याऐवजी नागरिकांनी स्वतःपासून बदलाला सुरवात केली पाहीजे. तर आणि तरच या समस्येपासून आपली सुटका होईल, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान जयंत जोशी यांनी कचरा साठविण्यासाठी बनविलेल्या ईकोफ्रेंडली बास्केटचे सादरीकरणही करण्यात आले. तर कचराकुंडी मुक्त प्रभागाची घोषणा करून त्यासाठी पहिल्या दिवसापासून काम सुरु करणार्या नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनाही या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित करण्यात आली होते. त्यांनीही जोशी यांच्या सूचनांचे स्वागत करून आपल्या प्रभागात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तर विश्वविक्रमवीर प्रणव धनावडे आणि त्याच्या आई-वडिलांचा संदीप गायकर आणि जयंत जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.