* महासभेतील प्रस्तावाचे गौडबंगाल * आरोग्य विभागात असंतोष * यापूर्वीही महासभेने फेटाळला होता प्रस्ताव * मंत्रालयातील नगरविकासनेही नाकारली परवानगी
नवी मुंबई : केंद्र व राज्य शासनाकडून सातत्याने पुरस्कार मिळविणार्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा कारभार म्हणजे ‘बडा घर आणि पोकळ वासा’ या स्वरूपातील आहे. त्यातील आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे ‘आंधळ दळतंय आणि कुत्रं पिठ खातंय’ या स्वरूपात चालू असून २० जानेवारी रोजी होणार्या महासभेत आरोग्य खात्याच्या पदोन्नतीच्या प्रस्तावावरून आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकार्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागात शैक्षणिक पात्रता व सेवाज्येष्ठता असणार्या डॉक्टरांची संख्या अधिक असतानाही आरोग्य विभाग केवळ तीन डॉक्टरांचेच चोचले कशासाठी पुरवित आहे, असा संतप्त प्रश्न आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्यांकडून विचारला जात आहे. महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून २० जानेवारी रोजी होणार्या महासभेत आरोग्य विभागाचे काही प्रस्ताव आले असून त्यामध्ये डॉ. दयानंद कटके, डॉ. धनवंती घाडगे, डॉ. रत्नप्रभा पुकार यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव विषय पत्रिकेवर आरोग्य विभागाकडून ठेवण्यात आल्याने आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकार्यांमध्ये असंतोषाचे स्फोटक वातावरण बनले आहे. मनपा प्रशासनाकडून आरोग्य अधिकारी (प्रतिबंधात्मक उपाययोजना), शहर हिवताप अधिकारी, शहर क्षयरोग अधिकारी, कुंटूंब कल्याण अधिकारी, शहर आरोग्य व माहिती अधिकारी, शहर प्रशिक्षण व साथरोग नियत्रंण अधिकारी या सहा जागा रिक्त असताना व या जागांकरता महापालिका प्रशासनात त्या पदाला पात्र उच्चसुशिक्षित डॉक्टर उपलब्ध असताना व सेवाज्येष्ठता त्यांची अधिक असतानाही त्यांना डावलून फक्त डॉ. दयानंद कटके, डॉ. धनवंती घाडगे, डॉ. रत्नप्रभा पुकार या तीनच लोकांवर पालिका प्रशासन विशेष मेहेरबानी का दाखवित आहेत, असा संतापाचा सूर आरोग्य विभागातून आता उघडपणे आळविला जावू लागला आहे. महापालिका प्रशासनात पदे भरण्यापूर्वी त्या पदाची निर्मिती करून मंत्रालयात त्या पदांना मंजुरीसाठी पाठविले जाते. मनपा प्रशासनातील आरोग्य विभागामधील आरोग्य अधिकारी (प्रतिबंधात्मक उपाययोजना), शहर हिवताप अधिकारी, शहर क्षयरोग अधिकारी, कुंटूंब कल्याण अधिकारी, शहर आरोग्य व माहिती अधिकारी, शहर प्रशिक्षण व साथरोग नियत्रंण अधिकारी या सहा जागा महासभेने २०१२ साली नामंजूर केलेल्या असतानाही पुन्हा या विषयाचा प्रस्ताव महासभेत पटलावर नव्याने आणला गेला आहे. महापालिका प्रशासनाने आकृतीबंधानुसार पदभरती करताना आरोग्याचा आराखडा मंत्रालयीन पातळीवर सादर केला असता नगरविकास खात्याने या आराखड्याला नामजुंरी देत केवळ एक वैद्यकीय आरोग्य अधिकारी व दोन सहाय्यक आरोग्य अधिकारी या तीनच पदांना मंजुरी दिली होती. सध्या आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी वा अन्य तत्सम पदावर डॉक्टर नियुक्त करून आरोग्य विभागाचा कारभार हाकला जात असला तरी ही पदे व सेवा रूग्णालयापुरतीच सिमित आहे. मंत्रालयाच्या नगरविकास खात्याकडून पदांना नामंजूरी असतानाही महासभेत आरोग्य विभागाकडून आलेल्या प्रस्तावाबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डॉ. निकम या पात्र, उच्चसुशिक्षित व सेवाज्येष्ठतेनुसार सिनिअर डॉक्टच्या पदोन्नतीकरता १२ वर्षे विलंब लावणार्या आरोग्य विभागाने या डॉ. दयानंद कटके, डॉ. धनवंती घाडगे, डॉ. रत्नप्रभा पुकार या तीन डॉक्टरांचा प्रस्ताव अवघ्या चार ते पाच दिवसातच कसा बनविला, याची उलटसूलट चर्चा पालिका मुख्यालयात सुरू आहे. आरोग्य विभागातील सेवाज्येष्ठतेचा विचार केल्यास डॉ. दयानंद कटके, डॉ. धनवंती घाडगे, डॉ. रत्नप्रभा पुकार या तीन डॉक्टरांपेक्षा डॉ. दयानंद बाबर, डॉ. वैजनाथ माने, डॉ. कुंभारे, डॉ. बारापात्रे यांच्यासह अनेक डॉक्टर सेवाज्येष्ठतेत पुढे आहेत. शैक्षणिक पात्रतेचा निकष लावल्यास डॉ. वसंत माने, डॉ. उज्ज्वला ओतुरकर, डॉ. रत्नेश म्हात्रे यासह अन्य काही डॉक्टर डॉ. दयानंद कटके, डॉ. धनवंती घाडगे, डॉ. रत्नप्रभा पुकार या तीन डॉक्टरांच्या तोडीस तोड व सेवाज्येष्ठतेतही अधिक आहेत. डॉ. रत्नप्रभा पुकार या सुरूवातीच्या एक-दोन वर्षाचा अपवाद वगळता १५ वर्षे मनपा मुख्यालयातच काम करत आहेत. त्यांच्याकडे सुरूवातीपासूनच क्षयरोग अधिकारी, हॉस्पिटल नोंदणी, आऊटसोर्सिग सेवा, सोनोग्राफी सेवा, सेंट्रल स्टोअर, खरेदी कक्ष, ट्रोमा सेंटर अशा महत्चाच्या जबाबदार्या आहेत. मनपा प्रशासनात अन्य कार्यक्षम वैद्यकीय अधिकारी उपलब्धच नाहीत काय, केवळ डॉ. पुकार यांचेच चोचले आरोग्य विभाग वर्षोनुवर्षे कशासाठी पुरवित आहे, हाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. डॉ. पुकार यांच्या तुलनेत सेवाज्येष्ठ व शैक्षणिक पात्रता असणार्या डॉ. निकम यांना पाणी नमुने, साथीचे रोग, जन्म मृत्यू नोंदणी दुय्यम कामाची जबाबदारी त्यांचे गेली काही वर्षे सातत्याने खच्चीकरण केले जात आहे. प्रस्ताव पाठविण्यापूर्वी मनपा प्रशासनात पदोन्नती समितीची बैठक होणे आवश्यक असते. डॉ. निकम यांच्याबाबत ४ महिन्यापूर्वी बैठक झाली असून गेल्या १२ वर्षापासून डॉ. निकम यांना सातत्याने पदोन्नतीपासून डावलले जात आहे. डॉ. निकम यांच्या निर्णयाला ४ महिने घेतले जात असताना डॉ. दयानंद कटके, डॉ. धनवंती घाडगे, डॉ. रत्नप्रभा पुकार या तीन डॉक्टरांबाबत अवघ्या सात-आठ दिवसामध्ये घेतला जाणारा निर्णय खटकणारी बाब आहे. डॉ. निकम यांच्या पदोन्नतीच्या प्रस्तावावर खिळ बसावी या हेतूनेच या तीन डॉक्टरांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव जाणिवपूर्वक आरोग्य विभागातील काही धुरीणांनी आणला असून बुधवारच महासभेत या प्रस्ताव मंजुर व्हावा याकरता आरोग्य विभागातील ठराविक महारथींनी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उंबरठ्यावर आपल्या चपला झिजविण्यास सुरूवातही केली आहे. मंत्रालयाच्या नगरविकास खात्याने नामंजूरी दिलेल्या व महासभेने यापूर्वी फेटाळलेल्या प्रस्तावास पुन्हा आरोग्य विभाग महासभेत प्रस्ताव आणण्याचे धाडस करतो याचीच खमंग चर्चा महापालिका मुख्यालयात सुरू आहे.