सुजित शिंदे
नवी मुंबई : केंद्र व राज्य स्तरावरील पुरस्कार सातत्याने मिळविणार्या नवी मुंबई महापालिकेचा कारभार बडा घर अन् पोकळ वासा या स्वरूपाचा आहे. दिव्याखाली अंधार तसाच काहीसा प्रकार या शहरात सुरू असून गटारांमधून शौचाचे मलमूत्र वाहत असतानाही पालिका प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहे. गटारांमधून मलमूत्राचे पाणी वाहत असताना नागरी वस्तीमध्ये दुर्गंधी पसरली आहे.
राज्यात संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दोन वेळा प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळालेले आहे. गटारातून मलमूत्रांचे पाणी वाहत असताना या शहराला दिल्या गेलेल्या पुरस्काराच्या पारदर्शकतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. गृहनिर्माण सोसायटीबाहेर तसे रस्त्यावर असणार्या गटारांमधून धुण्याभांड्याचे सांडपाणी वाहण्याऐवजी मलमूत्र वाहत असल्याने रहीवाशांना बाराही महिने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नवी मुंबईत चाळी, सिडकोच्या तसेच खासगी ईमारती, गावठाणातील ईमारती, एलआयजी, स्लम एरिया, झोपडपट्टी असा परिसर आपणास ठिकठिकाणी पहावयास मिळतो. सिडकोच्या ईमारती तसेच खासगी ईमारतींमध्ये स्वतंत्र जलवाहिन्या व मल:निस्सारण वाहिन्या आहेत. तथापि गावठाणातील अधिकांश ईमारतीमध्ये स्वतंत्र मल:निस्सारण वाहिन्या काढण्यात न आल्याने ही दुर्गंधीची समस्या निर्माण झालेली आहे.
गावठाणातील ईमारतींना सीसी (बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र) अथवा ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) हा प्रकार नसल्याने मनपा व सिडको प्रशासनाने लक्ष देण्यापूर्वी गावठाण परिसरात झटपट ईमारतींचे निर्माण केले जाते. त्यामुळे गावठाणातील ईमारतीमध्ये जलवाहिन्या व मल:निस्सारण वाहिन्या व पॉर्किगचे नियोजन केलेले पहावयास मिळत नाही. गावठाणातील ईमारतीमधील मलमूत्र थेट गटारांमध्ये सोडले जात आहे. हा प्रकार मनपा प्रशासनाला माहिती असतानाही त्याकडे कानाडोळा करण्यात आल्याने वर्षानुवर्षे गटारातूनच मलमूत्र शौचाचे पाणी वाहत आहे. वर्षातून चार वेळा गटारांची तळापासून सफाई करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने सफाई कामगारांच्या ठेकेदाराला दिलेले आहे. तथापि ठेकेदार चार वेळा सोडा, पण दोन वेळाही गटारांची तळापासून सफाई करत नाही. पावसाळीपूर्व कामाचा एक भाग म्हणून गटारांची सफाई केली जाते. गटारातून मलमूत्र शौचाचे पाणी वाहत असल्याने सफाई कामगार गटारांची सफाई करण्यास टाळाटाळ करतात. गटारे ईमारतीलगत तसेच रस्त्याच्या कोपर्यावर, पदपथाशेजारी असल्याने त्या त्या परिसरातील रहीवाशांना या दुर्गंधीचा बाराही महिने सामना करावा लागत आहे. सकाळच्या वेळी व रात्रीच्या वेळी या दुर्गंधीचा त्रास अधिक होतो. गटारांतून मलमूत्र शौचाचे पाणी वाहत असतानाही पालिका प्रशासनासोबत त्या त्या भागातील सर्वपक्षीय नगरसेवक, राजकीय घटक मतांचे गणित सांभाळण्यासाठी याकडे कानाडोळा करतात. यामुळे अन्य रहीवाशांना मात्र मलमूत्र, शौचाच्या दुर्गंधीचा सामना करत आला दिवस ढकलावा लागत आहे.