मुंबई : मुंबईतील परळचे टाटा रुग्णालय केवळ भारतातीलच नव्हे तर शेजारील देशांतील कॅन्सर रुग्णांसाठी आधार ठरले आहे. १९५२ मध्ये स्थापन झालेल्या या रुग्णालयाने अनेकांचा जीव वाचवला. याच विश्वासापोटी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णालयाची जागा अपुरी पडत आहे. याचा विचार करून नवी खारघर येथे २००५ मध्ये या ‘टाटा’च्या वतीने उभारण्यात आलेल्या संशोधन विभागात आता ११५ खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे.
‘टाटा’त रुग्णांच्या गर्दीमुळे प्राथमिक निदान झाल्यानंतर पुढील उपचारांसाठी काही आठवडे वाट पाहायला लागायची. यामुळे राज्य- परराज्यांमधून येणार्या रुग्णांचे हाल तर होतातच, नातेवाइकांचीही कुचंबणा होत असे. मुुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक थेट रस्त्यावर मुक्काम ठोकून तारखांची वाट पाहत बसायचे. आता ही प्रतीक्षा कमी होणार आहे. खारघरला ६० एकर जागेवर उभ्या असलेल्या संशोधन केंद्रात आता संशोधनाबरोबरच कर्करुग्णांची तपासणी, शस्त्रक्रिया होतील. स्त्रियांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून त्याचबरोबर गर्भाशयाच्या कॅन्सरने महिलांना वेढलेे आहे. ब्रेस्ट, गर्भाशयासह तोंडाच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया खारघरला सुरू झाल्या आहेत. नवी मुंबई तसेच रायगडमधील रुग्णांना उपचार करून घेण्यापूर्वी परळच्या रुग्णालयात जाऊन कागदपत्रे जमा करावी लागत होती. मात्र आता या भागातील लोकांसाठी टाटाने खारघर येथेच व्यवस्था केली आहे. यामुळे त्यांचे हेलपाटे वाचणार आहेत. याचबरोबर राज्याच्या इतर भागांतून किंवा देशातून येणार्या रुग्णांनाही खारघरला अत्याधुनिक उपचाराची सोय घेता येईल. अधिक माहितीसाठी ९८६९४४१४१४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहिती टाटाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी जाफरी यांनी दिली.
जयंत संघवी या उद्योगपतीची मुलगी दिव्यांशी हिचे सन २००२ मध्ये कॅन्सरमुळे निधन झाले. आपल्या मुलीच्या स्मृतिप्रीत्यर्थ संघवींनी टाटा रुग्णालयाला डिजिटल मॅमोग्राफी हे यंत्र दिले आहे. ब्रेस्ट कॅन्सरमुळे काही वेळा तो अवयवच काढून टाकण्याची वेळ येत असे. मात्र या यंत्रामुळे ४० टक्के अवयव वाचवता येणे शक्य होणार आहे. माझ्या मुलीला वाचवण्यासाठी ‘टाटा’कडून खूप प्रयत्न झाले. कॅन्सरसारख्या आजारावर उपचार करण्यासाठी टाटा’कडून जी काही मेहनत घेतली जात आहे, त्याने प्रभावित होऊन मी हे यंत्र देऊन आणखी काही मुलींचे तसेच महिलांचे प्राण वाचवण्यासाठी छोटासा प्रयत्न केला आहे, असे संघवी म्हणाले.
किमोथेरपीने ब्लॅड कॅन्सरच्या रुग्णांना प्रचंड वेदना होतात. विशेष म्हणजे त्यांना बाहेरील व्यक्ती तसेच बाहेरच्या प्रदूषित वातावरणापासून खूप जपावे लागते. ‘टाटा‘ने याचा विचार करून अशा रुग्णांना खारघरला सुविधा देण्याचा निर्णय घेतला असून येत्या एक-दोन वर्षांत अशा रुग्णांसाठी लागणारे सर्व उपचार वृक्षराजींनी बहरलेल्या तसेच स्वच्छ हवा असलेल्या वातावरणात येथील रुग्णालयात होतील.