दिपक देशमुख
नवी मुंबई : विस्तीर्ण पोलीस आयुक्तालयाच्या तुलनेत अपुरे पोलीसी संख्याबळ यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नवी मुंबई निवासी कार्यक्षेत्रात बारबालांना निवासाची सोय लवकर होत असल्याने त्यांचे ग्राहक असणारी गुन्हेगार विश्वातील मंडळींनीदेखील अलीकडच्या काळात नवी मुंबईलाच आपले निवासस्थान बनविल्याचे पहावयास मिळत आहे.
नवी मुंबई , ठाणे, पनवेल या ठिकाणी चालणार्या बारमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर बारबाला काम करत असून मनोरंजन, नृत्य याशिवाय बारमध्ये सेविकाचेही काम या महिलांकडून विशेषत: मुलींकडून करवून घेतले जात आहे.
नवी मुंबईमध्ये एलआयजी चाळी, स्लम एरियासोबतच गावठाण भागातील ईमारतींमध्ये बारमध्ये काम करणार्या मुलींना लवकर सदनिका उपलब्ध होत आहे. सिडको गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तसेच साडेबारा टक्के भुखंडावर बांधकाम झालेल्या ईमारतींमध्ये बारमध्ये काम करणार्या मुली अथवा महिलांना सहसा सदनिका उपलब्ध होत नाहीत. उपलब्ध झाल्यास त्यांचा व्यवसाय व ग्राहकांची ये-जा निदर्शनास आल्यावर संबंधित मुली व महिलांना सदनिका रिकामी करून द्यावी लागत आहे. गावठाणात एकवेळ भाडे कमी दिल्यास फारशी चौकशी होत नाही व पाहिजे तितका काळ सदनिका निवासाकरता उपलब्ध होत असल्याने बारबाला व बारमध्ये काम करणार्या महिला गावठाण भागात निवासी वास्तव्याला अधिक प्राधान्य देत आहेत.
दुपारी 2 वाजल्मापासून ते सांयकाळी 5 वाजेपर्यत बारबाला व बारमधील महिलांना मे-जा करणारी वाहने रस्त्यावर ठराविक ठिकाणी उभी राहत असल्याने त्या ठिकाणी आंबट शौकीनांची वर्दळ त्याच वेळेत वाढलेली पहावयास मिळते. विशेष म्हणजे स्थानिक पोलीसांना आपल्या कार्यक्षेत्रात बारबाला व तेथेच काम करणार्या महिलांना ने-आण करणारी वाहने उभी राहत असल्याचे माहिती असतानाही त्यावर आजतागायत कारवाई केली जात नाही.
विस्तीर्ण पोलीस आयुक्तालयाच्या तुलनेत पोलीसी संख्याबळ तुटपुंजे असल्याने भाडेकरूंची झाडाझडती मोहीमही गांभीर्याने राबविली जात नाही. त्यामुळे या गुन्हेगारांचे फावले आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये निवासी वास्तव्याकरता पती-पत्नींची अट असल्याने गुन्हेगार घटक या बारबाला आपल्या पत्नी असल्याचे गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकार्यांना सांगत आहेत. गावठाणात भाडे वाढवून दिल्यास पती-पत्नीची अट लागू होत नाही. त्यामुळे गावठाणातील सदनिकांमध्ये एकाच सदनिकेत चार ते सहा बारबाला राहतांना दिसून येतात. त्यांचे ग्राहक असणारे गुन्हेगारदेखील त्या विभागात अथवा शेजारच्या विभागात सदनिका घेवून निवासी वास्तव्य करतात. गुन्हेगार निवासी कार्यक्षेत्रात कोणाला आपली ओळख पटू नये याकरता शांत असल्याने त्यांचा उपद्रव अद्यापी कोणाला जाणवत नाही. नवी मुंबई पोलीसांनी भाडेकरूंची झाडाझडती मोहीम गावठाण भागात राबविल्यास व बारबालांची ने-आण करणार्या वाहनांची वरचेवर तपासणी केल्यास हे गुन्हेगार तात्काळ नवी मुंबई सोडण्याची शक्यता आहे.
बारबालांना व संबंधित महिलांशी परिचित असणारे ग्राहकांचा संबंध केवळ बारपुरताच संबंधित न राहता निवासी परिसरापर्यतही येवून पोहोचला आहे. बारबालांच्या व्यवसायात पुन्हा बरकत येवू लागल्याने ऐरोली, घणसोली, कोपरखैराणे, सानपाडा, नेरूळ, तुर्भे आदी ठिकाणी बारबालांचे निवासी वास्तव्य वाढीस लागले आहे. एकेकाळी गावागावात बारबाला हटाव-गाव बचाव ही राबविली जाणारी चळवळही आता थंडावली आहे. मुंबईतील वातावरणापेक्षा नवी मुंबई सुरक्षित असल्याने व या परिसरातून मुंबई, ठाणे, पनवेल संपर्क ठेवणे शक्य होत असल्याने व बारबालाही सोबतीला असल्याने गुन्हेगारांनी नवी मुंबईत घरोबा वाढविल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.