नवी मुंबई : स्वमालकीचे धरण असणार्या नवी मुंबई शहराला प्रथमच पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. शहरातील गावठाण व कॉलनी भागात मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असतानाही महापालिका प्रशासनाने पाणी चोरांचा शोध न घेता करदात्या नवी मुंबईकरांचीच पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालीकेच्या दुसर्या सभागृहात मोरबे धरण विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नवी मुंबईकरांची पाण्याची गरज भागवून उर्वरित पाण्याची विक्री करणे व मोरबेच्याच पाण्यावर वीजनिर्मिती करून नवी मुंबईकरांना वीज उपलब्ध करून देणे हा नवी मुंबई महापालीकेचा हेतू होता. मुंबईनंतर स्वमालकीचे धरण असणारी एकमेव महापालीका असा नवी मुंबई महापालीकेचा नावलौकीक आहे. 24 तास पाणीपुरवठा पालीका प्रशासनाकडून नवी मुंबईकरांना करण्यात येत होता.
मंदा कमी पडलेला पाऊस व जलवाहिन्या फुटण्याचा प्रकार यामुळे प्रथमच नवी मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागला आहे. नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असतानाही पाणीचोरीचा शोध घेण्याची मोहीम महापालीका प्रशासनाकडून राबविण्यात येत नसल्याची नाराजी नवी मुंबईकरांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे कोठे कोठे पाणी चोरी होत आहे याची महापालीकेच्या स्थानिक विभाग कार्यालयांना माहिती असतानाही तेदेखील या पाणीचोरीकडे कानाडोळा करत आहे.
शहरी भागाच्या तुलनेत गावठाण भागात पाणीचोरीचे प्रमाण अधिक आहे. गावठाणातील दर दहा ईमारतींमागे किमान 7 ईमारतींमध्ये आपणास अनधिकृत जलवाहिन्यांचे टॅप पहावयास मिळतील. स्थानिक नगरसेवकांना, मनपा पाणीपुरवठा अधिकारी-कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांना या पाणीचोरी प्रकाराची कल्पना आहे. कॉलनी भागातही साडे बारा टक्क्याच्या भुखंडावरील ईमारती तसेच सिडकोच्या ईमारतीमध्येही चोरीच्या जलवाहिन्यातून आजही पाणीपुरवठा होत आहे.
महापालिका प्रशासनाने पाणीचोरांचा शोध घेवून त्यांना दंडीत केल्यास महापालीका प्रशासनाला पाणीकपात करण्याची वेळ येणार नाही. पाणीचोरांना अभय देणारी महापालीका करदात्या नवी मुंबईकरांवरच पाणीटंचाईची संक्रांत निर्माण करत असल्याचे चित्र या शहरात निर्माण झाले आहे.