नवी मुंबई : शासकीय गरजेतून निर्माण झालेल्या नवी मुंबईतील स्थानिक आगरी-कोळी समाजबांधवांना आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत असतानाच त्यांचा पारंपारिक असणाऱ्या मासेमारी व्यवसायालाही घरघर लागली आहे. आगामी दोन-अडीच दशकामध्ये नवी मुंबईतील मासेमारी व्यवसाय संपुष्ठात येण्याची भीती मासेमारी करणाऱ्या स्थानिक आगरी-कोळी समाजबांधवांकडून व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईचे शहरीकरण वेगाने झाले असले तरी अजूनही ठिकठिकाणी गावठाण भाग आपणास पहावयास मिळतो. गावठाणात असणारे कोळीवाडे आपणास एकेकाळी समृध्द असणाऱ्या मासेमारी व्यवसायाची आपणास साक्ष देत आहेत. नवी मुंबईतील आगरी-कोळी लोकांकरता भातशेती व खाडीतील मासेमारी हे दोनच उपजिविकेचे पारंपारिक व्यवसाय होते. राज्य शासनाने भूसंपादन केल्यावर येथील ग्रामस्थांचा भातशेतीचा प्रश्न कायमचाच निकाली निघाला. उरलेला मासेमारी व्यवसायही संपुष्ठात येण्याच्या मार्गावर आहे.
नवी मुंबईतील खाडीमध्ये ओहोटीच्या काळात मासेमारी करावयास गेलेला आगरी-कोळी मच्छिमार मोठ्या प्रमाणात मासेमारी करून भरतीच्या वेळी जेटीवर येत असे. पण आता अनेकदा ५०० ते एक हजार रूपयांची तर सोडा, पण कुटूंबाच्या जेवणाकरताही अनेकदा मच्छि भेटत नसल्याचे मच्छिमारांकडून सांगण्यात येत आहे.
विकसित नवी मुंबईमध्ये कंपन्या व रासायनिक कारखाने आले. या कंपन्या व रासायनिक कारखान्यातील प्रदूषित पाण्यामुळे खाडीतील मत्सय प्रजननावर परिणाम झाला. त्यातच खाडीपूला उभारण्यात आलेले दोन पुल यामुळे वाशी ते घणसोली आणि वाशी ते दिवाळापर्यतच्या खाडीतील मासे कमी झाले. भरीस भर म्हणून पामबीच मार्गाची निर्मिती झाल्याने खाडीतील मासे आणखी कमी झाले. रस्त्याची निर्मिती व खाडीपुलावर उड्डाणपुलाची निर्मिती यामुळे वाहनांची रहदारी वाढली. रस्ते व उड्डाणपुल खाडीवर व खाडीनजिक असल्याने मासे मृत पडण्याचे प्रकारही वाढीस लागले.
खाडीतील मासे कमी होण्यास अडचणी वाढत असताना नवी मुंबई महापालिकेनेदेखील त्यात हातभार लावला. मल:निस्सारण वाहिन्यातील पाणी शुध्दीकरण न करता खाडीत तसेच सोडण्याचे कार्य गेली अनेक वर्षे बिनबोभाट सुरू असल्याने जेटीआवारातच नाही तर खाडीमध्येदेखील मल आपणास पहावयास मिळेल. याचाही फटका मत्स्य प्रजननाला मोठ्या प्रमाणावर बसला. पूर्वी मासेमारीवर आगरी-कोळी समाजाचे अर्थकारण अवलंबून होते. पण आता मासेमारीवर अर्थकारण तर सोडा, पण अनेकदा कुटूंबाच्या जेवणापुरतेही मासे खाडीत सापडत नसल्याने आगरी-कोळी समाज आता दुसऱ्या व्यवसायाकडे वळू लागला आहे. अनेकांनी अर्थकारणाचे व कुटूंबाच्या गरजेचे समीकरण जुळत नसल्याने मासेमारीकरता खाडीत जाणेही सोडून दिले आहे. नवी मुंबईतील मासेमारी व्यवसाय आता खऱ्या अर्थाने अखेरच्या घटका मोजत असून खाडी शुध्दीकरण प्रकल्प न राबविल्यास हा मासेमारी व्यवसाय नजीकच्या काळात इतिहासजमा झालेला आपणास पहावयास मिळेल.