मुंबई : तो एक कवी. पण राग आन् भीक माग या म्हणीप्रमाणे त्याच्या हातून खून झाला. त्याची शिक्षा म्हणून त्याला जन्मठेप झाली. परिणामी त्याचे कुटुंब वाळीत टाकण्यात आले. याची सल त्याच्या कवितेतून जाणवू लागली. ती सनदी अधिकारी आणि संवेदनशील कवी असलेल्या माजी आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या नजरेतून सुटली नाही. त्याच्याशी संवाद साधून त्याच्या दुखर्या नसेवरच त्यांनी इलाज केला. हा सर्व प्रवास आता बाबांची शाळा या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
गेली 30 वर्षे सनदी अधिकारी सेवा करून निवृत्त झालेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या माजी आयुक्त नीला सत्यनारायण यांची नवी ओळख लवकरच होणार आहे. सरकारी सेवेत असताना त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून सहित्याचे व्यासपीठ गाजविले. आता त्यांचा कायद्याच्या जीवनाचा अनुभव पडद्यावर येणार आहे. एका खुन्याची मुलगी म्हणून समाजाने तिला वाळीत टाकले होते. तुरुंगात असलेल्या कवी वडिलांना तिचा घोर लागला होता. नीला सत्यनारायण यांनी तो जाणला आणि त्या मुलीचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. तिला वकील बनविले. तिचे लग्न लावून दिले. दरम्यान, तुरुंगातील कैद्यांनाही चांगल्या जीवनाचे धडे गिरवायला लावले आहेत.
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या या खुनी बापालाही हंबरडा फोडायला लावणारी बाबांची शाळा ही सत्यकथा नीला सत्यनारायण यांनी लिहिली. त्यांच्या या सत्यकथेवरच बाबांची शाळा नावाने चित्रपट 26 फेब्रुवारी रोजी राज्यातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
विलास माने आणि उमेश नाथाणी निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन आर. विराज याने केले आहे. या सिनेमात तुरुंगातील कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांवर भाष्य करण्यात आले आहे. ही कथा महिपत घोरपडे नावाच्या कैद्याची आहे. त्याच्या हातून रागाच्या भरात खुनासारखा गंभीर गुन्हा घडला. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यामुळे त्याची कुटुंबाशी झालेल्या ताटातूटीचा संघर्षमय प्रवास या सिनेमातून आपल्या समोर येणार आहे. महिपत सोबत त्याची मुलगी सोनाली, तुरुंगाधिकारी श्रीकांत जमदाडे आणि सामाजिक कार्यकर्त्या नीता साटम यांच्याभोवती सिनेमाची कथा गुंफली आहे.
सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्याकडे गृह विभागातील कारागृह हा विभागही होता. त्या काळात त्यांनी विविध तुरुंगांना भेटी दिल्या. त्यातून त्यांना कैद्यांचे जीवन जवळून पाहायला मिळाले. पैठण येथील तुरुंगात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगत असलेल्या महिपत घोरपडे याच्याशी त्यांचा संपर्क झाला. त्याच्याशी संवाद साधला असता तो कवी असल्याचे सत्यनारायण यांना समजले. त्याला एक तरुण मुलगी असून समाजाने या कुटुंबाला बहिष्कृत केले होते. यामुळे संवेदनशील असलेल्या सत्यनारायण हळव्या झाल्या. त्या मुलीला त्यांनी थेट मुंबईला आणून पदवीपर्यंतचे शिक्षण देवून समाजात नवीन ओळख मिळवून दिली.
दरम्यान, नीला सत्यनारायण त्या मुलीसाठी करत असलेली मदत पाहून पैठणच्या संबंधीत तुरुंग अधिकार्यालाही पाझर फुटला. बाप-लेकीची ताटातूट त्यांच्याही मनाला चटका लावून गेली. त्यामुळे त्यांनी तिची अणि तिच्या पित्याची तुरुंगातील नियमानुसार भेट घडवून आणली. एक प्रकारे ही मदत करून अधिकार्याने माणुसकीचे दर्शन घडवले. सामाजिक कर्तव्याचे भान दाखविणारा चित्रपट आता प्रदर्शित होत आहे. कारागृह ही सुधारगृहे व्हावीत, असा संदेश सत्यनारायण यांनी विद्यमान कारागृह अधिकार्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून दिला आहे.