मुंबई : मुंबईतील छोट्या व मोठ्या नाल्यांमधील कचरा व गाळ काढण्यासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च केले जातात. परंतु आजवर नालेसफाईवर केलेला खर्च बिनकामाचाच असून सफाईच्या नावावर तिजोरीची हातसफाई होत असल्याचे नालेसफाईप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या देशमुख समितीच्या अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे नालेसफाई हा केवळ फार्स आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये होत असलेला कचरा रोखून एकाच जागी साफ करता यावा, यासाठी ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर सी-बीन ही पाणी गाळणी यंत्रणा बसवण्यात यावी,अशी मागणी नगरसेवकांकडून होऊ लागली आहे.
मुंबईत दरवर्षी नालेसफाईवर सुमारे १५० ते १७५ कोटी रुपये खर्च केले जातात. परंतु यावर्षी नाल्यांमधील भ्रष्टाचार उघड झाल्यामुळे सफाईच्या नावावर कंत्राटदार केवळ महापालिकेची तिजोरी लुटत असल्याचे समोर आले.
महापालिकेने नेमलेल्या ३२ कंत्राटकामांमधील कंत्राटदारांना दोषी ठरवून त्यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवण्यात आली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच कंत्राटदारांच्या सात कार्यालयांवर छापा घालून कागदपत्रे व रोख रक्कम जप्त केली. त्यानंतर पाच कंत्राटदारांना अटक केली. तब्बल बारा दिवसांनी यापैकी ४ कंत्राटदार सुटले आहेत. एक कंत्राटदार अजूनही आतमध्येच आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामात पारदर्शकता आणण्याचा विचार प्रशासन करत आहे. परंतु यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये कंत्राटदारांनी जास्त बोली लावल्यामुळे मिठी नदीची कामे वगळता इतर मोठ्या व छोट्या नाल्यांच्या कामांसाठी फेरनिविदा मागवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईतील नाले व समुद्रकिनारे याठिकाणी कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आदी टाकाऊ वस्तूू मोठ्या प्रमाणात टाकल्या जातात. अनेक मोठे नाले हे झोपडपट्ट्यांमधून जातात. त्यामुळे हा तरंगता कचरा काढून गाळ काढल्याचे दर्शवले; परंतु या प्लास्टिकच्या पिशव्या नाल्यांमध्ये अडकल्या जातात. परिणामी नाल्यांमधील पाण्याचा निचरा न होता नाले तुंबून आसपासचा परिसर जलमय होतो. त्यामुळे मुंबईतील सर्व छोटया व मोठया नाल्यांमधील व समुद्राच्या पातमुखाजवळ पाण्यातील कचरा व गाळ साफ करण्यासाठी ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशात वापरण्यात येणारी ‘सी-बीन’ पाण्याची गाळणी यंत्रणा (सी-बीन वॉटर फिल्टरिंग सिस्टीम) बसवण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक परमिंदर भामरा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. अशा प्रकारे प्रणालीचा वापर केल्यास नाल्यांमध्ये मोठया प्रमाणात टाकला जाणारा कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या व इतर टाकाऊ कचरा हा सहज बदलता येण्याजोग्या असलेल्या या सी-बीनमधील पिशव्यांमध्ये शोषला जाऊ शकतो. परिणामी नाले व समुद्र साफ होण्यास मदत होईल,असे परिमिंदर भामरा यांनी म्हटले आहे.
सी-बीनचा वापर केल्यास समुद्रजीवांचे संरक्षण होऊन पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल आणि मान्सूनपूर्व हे सर्व सी-बीन साफ करणे हे सुलभ होईल. शिवाय यासाठी लागणारा खर्चही कमी होईल,असे त्यांनी म्हटले आहे.