पनवेल : प्रस्तावित शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक अस्तित्वात आल्यावर शिवडीचं महत्त्व तर वाढेलच, याचबरोबर नवी मुंबई आणि त्यातही उरण, उलवे, द्रोणागिरी, चिरले या भागांची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सी- लिंकबरोबरच इतरही अनेक विकास प्रकल्प या भागांत आलेले असून त्यांच्यामुळे भविष्यात या भागांचा चेहरामोहरा बदलेल. पण या सी-लिंकमुळे उरणसह नवी मुंबईतील मासेमारी व्यवसाय कायमस्वरूपी संपुष्ठात येण्याची भीती असल्याने येथील मच्छिमारांनी आता न्यायालयात जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
मुंबई आणि नवी मुंबईला थेट जोडणारा प्रस्तावित ब्रिज म्हणजे शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक. मुळात शिवडी हे मुंबईतलं महत्त्वाचं उपनगर आहे. दक्षिण मुंबई तसंच सर्व उपनगरांना आणि पश्चिम उपनगरांशी जोडणारा ईस्टर्न फ्री वे शिवडीवरून जातो. शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकमुळे शिवडीचं महत्त्व वाढेलच, त्याचबरोबर नवी मुंबई आणि त्यातही उरण, उलवे, द्रोणागिरी, चिरले या भागांची भरभराट होईल.
प्रस्तावित सहा पदरी शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकची एकूण लांबी २२ कि.मी. असेल. त्यात समुद्रात १६ कि.मी.चा ब्रिज असेल तर नवी मुंबईत ५.५ कि.मी.चा भाग असेल. या मुंबई ट्रान्सहार्बर सी-लिंक रोडने नवी मुंबईत गेलं तर चिरले इथून मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ला जाता येईल. चिरले ते महामार्गादरम्यान रस्ते प्रस्तावित आहेत.
समाजाच्या प्रगतीकरता होणारा विकास हा कोणत्या तरी समाजाच्या जीवनमानाचा ऱ्हास करत असतो. या सी-लिंकमुळे उरण तालुक्यातील व नवी मुंबईतील मासेमारी व्यवसायाला कायमचेच टाळे लागण्याची भीती मच्छिमार समाजाकडून व्यक्त केली जात आहे. वाशी खाडीपुलामुळे वाशी ते ऐरोलीपर्यतचा मासेमारी व्यवसाय जवळपास संपुष्ठातच आला असून तेथील आगरी-कोळी मच्छिमार समाजाला आता सारसोळे-दिवाळे व वाशीच्या खाडीत मासे पकडण्यासाठी यावे लागत आहे. खाडीलगत रस्ते बनल्याने व खाडीवल पुल बनल्याने वाहनांच्या हादऱ्याने त्या भागात मासे येत नसल्याची तक्रार मच्छिमार समाजाकडून केली जात आहे. या सी-लिंकमुळे उरणसह नवी मुंबईतील मच्छिमार समाज देशोधडीला लागणार असल्याने आता मच्छिमारी करणाऱ्या आगरी-कोळी व्यावसायिकांची मोजणी केली जात असून लोकआंदोलन व न्यायालयीन लढ्याची तयारी करण्याच्या हालचाली या मच्छिमार समाजाकडून सुरू झाल्या आहेत.