: कांद्याचे दर वाढल्यावर महिला वर्गाच्या डोळ्यात पाणी येते. कांदा महागाईबाबत चर्चा होते. पण आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा बटाटा मार्केटमध्ये याच्या विपरीत चित्र पहावयास मिळाले. ग्रामीण भागातील नवीन कांद्याची आवक वाढू लागल्याने कांद्याचे दर कमालीचे घसरले असून बाजार आवारात कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली आहे.
केवळ शहरी भागातल्याच नाही तर ग्रामीण भागातल्या बाजार समित्यांमध्येही कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातल्या बाजार समित्यांच्या तुलनेत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये किलोमागे दोन ते तीन रूपये अधिक भाव मिळत असला तरी वाहतुक खर्च, तोलाई, लेव्ही, पट्टीपेड कमिशन, माथाडी, वारणार खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही पडत नसल्याने या मार्केटमध्ये कांदा विक्रीला आणण्यापेक्षा गावाच्याच बाजार समित्यांमध्ये कांदा विकलेला बरा, अशी प्रतिक्रिया आज वाशी मार्केटमध्ये कांदा घेवून आलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
चार दिवसापूर्वी १२ ते १५ रूपये किलो या दराने विकला जाणारा कांदा बुधवारी एपीएमसीमध्ये ६ ते ९ रूपये किलो या दराने विकला जात आहे. आज कांदा बटाटा मार्केटमध्ये नाशिक, पुणे, सोलापूर या भागातून १२५ ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. ग्रामीण भागात कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी वाशी मार्केटमध्ये कांदा विक्रीकरता पाठविण्यास सुरूवात केली आहे. तथापि दोन ते तीन रूपये किलो अधिक मिळणाऱ्या दरापायी अन्य खर्चच जास्त होत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. अजून दोन महिने मार्केटमध्ये नवीन कांदा आवक वाढ कायम राहणार असल्याने कांदा दर आणखी घसरण्याची भीती बाजार समितीचे संचालक अशोक वाळूंज यांनी व्यक्त केली आहे.