सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : मार्च महिन्यात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित बामनदेव भंडार्याकरता खाडीअंर्तगत भागात बामनदेव मार्गाच्या साफसफाईकरता सारसोळेच्या युवा ग्रामस्थांनी शनिवारपासून सुरूवात केली आहे.
पामबीच मार्गावर बामनदेव मार्गावर वर्दळ सुरू झाली की बामनदेवाचा भंडारा जवळ आल्याचे संकेत वाहनचालकांना प्राप्त होतात.सारसोळेच्या खाडीअंर्तगत भागात सारसोळे गावातील मासेमारी करणार्या आगरी-कोळी लोकांचे श्रध्दास्थान आहे. सारसोळेची जेटी सोडली की बेलापूरहून वाशीकडे येणार्या मार्गावर खाडीच्या बाजूस डावीकडे वळसा मारल्यास आपणास थेट बामनदेवाच्या मंदिराकडे जाता येते. बामनदेव हा शिवशंकराचा अवतार मानला जातो. बामनदेवाला बंदीस्तपणा आवडत नसल्याने हे मंदिर खुलेच व विनाछताचे पहावयास मिळते.
खाडीमध्ये मासे पकडण्यास गेल्यास वादळ-वार्यात व अन्य संकटांमध्ये तसेच जेटी परिसरात रात्री-अपरात्री वावरताना बामनदेवच आपले रक्षण करतो, अशी सारसोळेच्या ग्रामस्थांची भावना आहे. खाडीअंर्तगत भागातील बामनदेव मार्गाचा अपवाद वगळता नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सर्व
रस्त्यांचे डांबरीकरण केलेले आहे. बामनदेव मार्गाचे डांबरीकरण व्हावे याकरता सारसोळेचे ग्रामस्थ गेली आठ वर्षे महापालिका ते मंत्रालय पाठपुरावा करत आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त सारसोळेच्या ग्रामस्थांकडून कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून बामनदेव भंडार्याचे आयोजन करण्यात येते. बामनदेवाकडे जाणारा मार्ग आजही कच्चाच व खाचखळग्यांचा असून पावसाळ्यानंतर त्या ठिकाणी सहा ते सात फूट जंगली गवत वाढलेले पहावयास मिळते. बामनदेव भंडार्यामध्ये दरवर्षी बारा ते पंधरा हजार भाविक सहभागी होत असल्याने भाविकांकरता रस्ता व्यवस्थित असावा याकरता सारसोळेचे ग्रामस्थ महिनाभर अगोदरच रस्ता सफाईस सुरूवात करतात. सुकलेले जंगली गवत काढणे, रस्त्यांचे खड्डे बुजवून सपाटीकरण करणे या कामातच 15 ते 20 दिवस जातात. या मार्गावर एकेकाळी तीन हजार लोकांचा राबता असायचा, पण मिठागरे बंद झाल्यावर वर्दळ तुरळक झाली. आता केवळ मासेमारीकरता व बामनदेवाच्या दर्शनाकरताचा सारसोळेचे ग्रामस्थ या मार्गावरून ये-जा करत असतात.