नवी मुंबई : व्यवसायापाठोपाठ आता गुजरातने कृषी मालाच्या बाजारपेठेत शिरकाव केल्याने आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा बटाटा मार्केटमध्ये आता गुजरातचा कांदा विक्रीला आल्याने कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. कांदा बटाटा मार्केटमध्ये दररोज सरासरी १२५ ते १३० ट्रक भरून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून कांदा विक्रीसाठी येत आहे. यात पुणे व नाशिक भागातील कांद्याचे प्रमाण अधिक आहे. तथापि गेल्या दोन दिवसापासून गुजरात राज्यातील कांदाही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विक्रीसाठी येवू लागल्याने कांदा दर आता आणखीनच घसरण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती कांदा व्यापारी व बाजार समितीचे संचालक अशोक वाळूंज यांनी दिली. गुजरात राज्यातून २५ ते ३२ ट्रक भरून कांदा दररोक मार्केटमध्ये येवू लागला आहे. महाराष्ट्रातील कांदा ७ ते १० रूपये किलो दराने मार्केटमध्ये विकला जात असतानाच गुजरातचा कांदा मात्र ४ ते ६ रूपयांपासून विकला जात आहे. महाराष्ट्रातील कांदा टिकावू असून तो खरेदी केल्यापासून १० ते १२ दिवस टिकून राहतो. गुजरातचा कांदा मात्र टिकावू नसून तो दोन ते तीन दिवसातच वापरावा लागत आहे. दररोजच्या वापराकरता गुजरातचा कांदा परवडत असल्याने मार्केटमधील खरेदीदारांनी ४ रूपयांपासून उपलब्ध होणाऱ्या गुजरातच्या कांद्याला खरेदीकरता प्राधान्य दिले आहे. गुजरातमध्ये कांद्याला उठाव नसल्याने तेथील व्यापाऱ्यांनी कांदा मुंबईला विक्रीकरता पाठविण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नवीन कांदा निघण्यास प्रारंभ झाला आहे. कांदा लागवडीखाली क्षेत्रही प्रचंड असल्याने येत्या आठवडाभरात कांदा आवक अजून वाढणार आहे. आज २५ ते ३२ ट्रक गुजरातचा कांदा मार्केटमध्ये येत असला तरी खरेदीदारांची पसंती, मालाची होणारी तात्काळ विक्री आणि मालाचा रोखीत सुटणारा पैसा यामुळे गुजरातचे शेतकरी व व्यापारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कांदा मोठ्या प्रमाणात पाठविण्याची शक्यता लक्षात घेवून नजीकच्या काळात मार्केटमध्ये गुजरात कांदा व महाराष्ट्राचा कांदा यामध्ये स्पर्धा होण्याची शक्यता आहे. आधीच कोसळलेले दर व गुजरातच्या कांद्याशी आता करावी लागणारी स्पर्धा पाहून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा दिवाळेच निघण्याची शक्यता आहे.