पोलीस मित्र दिलीप आमलेंचा सत्कार
सुजित शिंदे
नवी मुंबईः गुन्हेगार मुक्त शहर व्हावे असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. सदरचे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी फक्त पोलिसांवर अवलंबून न राहता, पोलिसांना मदत करुन आपले कर्तव्य बजावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी वाशीत केले. दरम्यान, लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना पोलीस मित्रांची खूप चांगल्या प्रकारे मदत होत असल्याचे नामदार शिंदे यांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने १८ फेब्रुवारी रोजी वाशीतील सिडको प्रदर्शन संकुलात पोलीस मित्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
होते. त्यावेळी ना. एकनाथ शिंदे बोलत होते. याप्रसंगी ‘नवी मुंबई’चे महापौर सुधाकर सोनवणे, ‘नवी मुंबई’चे पोलीस आयुक्त प्रभात रंजन, ‘बेलापूर’च्या
आमदार मंदाताई म्हात्रे, ‘उरण’चे आमदार मनोहर भोईर, आ. नरेंद्र पाटील, पोलीस उपआयुक्त दिलीप सावंत (गुन्हे शाखा), शहाजी उमाप (परिमंडळ-
१), सुरेश मेंगडे (विशेष शाखा), विश्वास पांढरे (परिमंडळ-२), प्रशांत खैरे (मुख्यालय), इतर पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यासह नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील शेकडो पोलीस मित्र उपस्थित होते. या कार्यक्रमात ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले यांच्यासह काही समाजसेवकांचा उत्कृष्ट पोलीस मित्र म्हणून प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला.
यावेळी ना. एकनाथ शिंदे यांनी परराज्यातील गुन्हेगार मोठ्या प्रमाणात येत असल्याचे तसेच इसिस सारख्या दहशतवादी संघटनेशी तरुणी जोडले जात असल्याने अशा लोकांच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शिवाय राज्याला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभला असून या सागरी सुरक्षेवर देखील भर देणे आवश्यक असल्याचे नामदार एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तर शहरात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्याने पोलिसांकडून तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र, त्यावर विसंबून न राहता दुसरा पर्याय म्हणजे पोलीस मित्रांचा आहे. पोलीस मित्रांची अनेक गुन्ह्यांमध्ये मदत होत असल्याचे मत पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी यावेळी स्पष्ट केले. शहरात सध्या घरफोडींच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून नागरिकांनी विशेषत: महिलांनी सर्तकता दाखविल्यास सदर गुन्ह्यांना आळा घालण्यास मदत होणार असल्याचेही पोलीस आयुक्त रंजन यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आयोजक पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी पोलीस मित्र संकल्पना राबविण्यामागचा हेतू स्पष्ट केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी केले.