सरकारी प्रकल्प, धरणांत जमीन गेलेल्या शेतकर्यांच्या वाट्याला तुटपुंजा मोबदलाच येतो, पण शहर व औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) मात्र त्यांच्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाकांक्षी योजना आखली आहे. आयआयएम, आयआयटी अशा नामवंत शिक्षण संस्थांमध्ये शिकण्यासाठी पाठवतानाच या मुला-मुलींना आयएएस होण्यासाठी धाडसी पाऊल उचलण्यात आले आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांची पहिली तुकडी संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी रवाना झाली आहे. यात सर्व मुलीच आहेत.राज्य सरकारच्या अखत्यारितील सिडकोने १९७० मध्ये वाशी, बेलापूर भागात ९५ गावांमध्ये १५ हजार ९७९ चौरस कि.मी. जमीन नवी मुंबईसाठी संपादित केली होती. प्रकल्पग्रस्तांना सिडकोने आर्थिक मोबदला दिलाच, पण विकसित भूखंडही दिले. आता त्यांच्या मुला-मुलींना रोजगार मिळवून देण्यासाठी परिवर्तनीय कौशल्य विकास कृतियोजना (तारा) आखली आहे.
५ जणींवर १५ लाख खर्च, दीड लाख विद्यावेतनही
सिडकोने या उपक्रमात निवडीसाठी यूपीएससी-सीईटी २०१६ परीक्षा घेतली. त्यात ५ मुलींची निवड झाली. यातील पूजा म्हात्रे व किर्ती बामा पाटील या दिल्लीतील ‘वाजीराम ऍण्ड रवी’ या नामवंत प्रशिक्षण संस्थेत दाखल झाल्या. योगिता कडू, अनघा तांडेल, अंकिता ठाकूर यांनी पुण्यातील ‘बार्टी’ संस्थेची निवड केली. प्रत्येक विद्यार्थिनीवर प्रशिक्षणासाठी सिडको तीन लाख रुपये खर्च करत आहे. विमानभाडेही देत आहे. शिवाय १५ महिन्यांसाठी दीड लाख रुपये विद्यावेतनही देणार आहे. पुढील वर्षीच्या सीईटीसाठी ५२ जणांनी नोंदणी केली आहे. दहावीनंतर आयआयटी जेईई या इंजिनिअरिंग व एम्स या मेडिकलच्या पात्रता परीक्षांसाठी नामवंत संस्थांमध्ये दोन वर्षांचे प्रशिक्षण देण्याचेही सिडकोचे नियोजन आहे.
*क्लास निवडीचे अधिकार
सिडकोने यूपीएससी अकादमी न काढता सर्वोत्तम क्लासेसमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. क्लास निवडीचे अधिकार विद्यार्थ्यांनाच असतात. दिल्लीच्या ‘वाजीराम’ क्लासमध्ये मी स्वत: आयएएसची तयारी केली आहे. – व्ही. राधा, सह-व्यवस्थापकीय संचालक
*तीन अकादमी उभारणार
नवी मुंबईत विमानतळ, जेएनपीटी बंदर विस्तार व स्मार्ट सिटी प्रकल्प येत आहेत. कौशल्यावर आधारित रोजगाराच्या या संधी प्रकल्पग्रस्तांना मिळाव्यात म्हणून विमानचलन, बंदर, बांधकाम अशा अकादमी उभारण्यात येतील. – संजय भाटिया, उपाध्यक्ष,एमडी, सिडको
*इतर संस्थांनीही सिडकोचा कित्ता गिरवावा
सिडकोमुळे दिल्लीत येऊन मी यूपीएससीची तयारी करू शकले. भरपाईसोबत रोजगार दिला तरच खरे पुनर्वसन म्हणता येईल. सिडकोचा कित्ता भूसंपादन करणार्या इतर संस्थांनीही गिरवावा. – किर्ती पाटील, प्रकल्पग्रस्त विद्यार्थि