* कामगार नेते रविंद्र सावंतांचा मनपा ते मंत्रालय पाठपुरावा
: नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा कारभार म्हणजे बडा घर अन् पोकळ वासा या स्वरूपातच मनपा स्थापनेपासूनच सुरू आहे. राज्य व केंद्र शासनाकडून विविध पारितोषिके मिळविणार्या नवी मुंबई मनपा प्रशासनाचा कारभार दिव्याखाली अंधार या स्वरूपात असून समान पदावर काम करणार्या महिला कर्मचार्यांना पुरूष कर्मचार्यांपेक्षा वर्षांनुवर्षे जाणिवपूर्वक कमी वेतन देणे, अनेक वर्षे काम करूनही अधिकारी व कर्मचार्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवणे अशा प्रकारांविरोधात कामगार नेते रविंद्र सावंत यांनी प्रकाशझोत टाकला आहे.
महाराष्ट्र राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, राज्याच्या सचिव मनिषा म्हैसकर, मनपा आयुक्त, महापौर, उपमहापौर यांना लेखी तक्रारी करत संबंधित कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली असून दुसरीकडेे कामगारांनी न्याय लवकर न मिळाल्यास नवी मुंबई महानगरपालिका मागासवर्गिय व इतर मागासवर्गिय अधिकारी-कर्मचारी महासंघ या कामगार संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
देशाच्या कानाकोपर्यात महिला सक्षमीकरणाचे वारे गेल्या काही वर्षापासून जोरदार वाहत असताना नवी मुंबई महापालिका प्रशासनातील आरोग्य विभागात एकाच पदावर काम करणार्या महिला कर्मचार्यांना कमी वेतन व पुरूष कर्मचार्यांना अधिक वेतन असा दुजाभाव केला जात आहे. एकच पद व एकच काम असतानाही महिला कर्मचार्यांना पुरूष कर्मचार्यांपेक्षा कमी वेतन मनपा प्रशासन का देत आहे, ही एक आकलनापलिकडची संतापजनक बाब आहे.
जून 1993 सालापासून आरोग्य खात्यात आरोग्य सहाय्यक महिला या ए.एन.एम या पदावर कार्यरत आहेत. ऑक्टोबर 2003 ते 2004 या कालावधीत या महिलांना पदोन्नती प्रशिक्षण देण्यात आले. या महिलांना बरीच वर्षे काम केल्यावर 3मार्च 2006च्या आदेशान्वये पदोन्नती देण्यात आली. 4000-125-7000 अशी वेतनश्रेणी देण्यात आली.6 फेब्रुवारी 2008 रोजी पदोन्नती आदेश देण्यात येवूनही संबंधित महिला कर्मचार्यांना त्याच वेतनश्रेणीवर काम करावे लागत आहे. मात्र महापालिका प्रशासनात त्याच पदावर काम करणार्या आरोग्य सहाय्यक पुरूषांना 5000-150-8000 अशी वेतनश्रेणी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आरोग्य सहाय्यक महिला व आरोग्य सहाय्यक पुरूष ही दोन्ही पदे आरोग्य पर्यवेक्षक पदे असून ती नागरी आरोग्य केंद्रामध्ये आहेत. आरोग्य सहाय्यक पुरूषांना सरळ सेवेतून पदोन्नती आहे. परंतु आरोग्य सहाय्यक महिला या पदासाठी 6 महिन्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. उत्तीर्ण झाल्यावर महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलकडे नोंदणी करावी लागते.महिला व पुरूष कर्मचारी एकाच पदावर काम करत असतानाही महिला कर्मचार्यांना गेली अनेक वर्षे जाणिवपूर्वक कमी वेतन दिले जात आहे. महापालिका प्रशासन स्त्री-पुरूष असा भेदभाव करत आहे. संबंधित महिला कर्मचारी वेतनश्रेणीबाबतच्या तफावतीबाबत महापालिका प्रशासनाकडे गेली काही वर्षे पाठपुरावा करत असतानाही त्यांच्या लेखी पाठपुराव्याला कचर्याची टोपली दाखविली जात आहे.
दुसर्या एका घटनेत महापालिका प्रशासनामध्ये महासभेतील विविध ठरावांनुसार स्वच्छता अधिकारी, उपमुख्य स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक ही पदे मंजूर झालेली आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागात एकूण 26 स्वच्छता निरीक्षक असून त्यापैकी 10 स्वच्छता निरीक्षकांची सेवा 20 ते 22 वर्षे झालेली आहे. उपमुख् स्वच्छता अधिकारी (प्रभारी) यांनी सलग 6 ते 8 वर्षे या पदावर काम केलेले आहे. हे कर्मचारी पदोन्नतीस पात्र असतानाही महापालिका प्रशासनाकडून या कर्मचार्यांच्या पदोन्नतीस चालढकल केली जात आहे.
मनपा प्रशासनात काम करणार्या कनिष्ठ अभियंत्याच्या बाबतीतही हाच प्रकार घडला आहे. महापालिका प्रशासनात काम करणार्या विविध संवर्गात 47 कनिष्ठ अभियंता पदावर ऑक्टोबर 2007 पासून कार्यरत आहेत. पाच वर्षे काम केल्यावर संबंधितांना शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात येते. या अभियंत्यांना 2012सालीच पदोन्नती मिळणे आवश्यक असतानाही महापालिका प्रशासनाकडून या अभियंत्यांच्या पदोन्नतीबाबत चालढकलच करण्यात आलेली आहे. इतकेच नाही तर पदोन्नतीबाबत संबंधित अभियंत्यांनी प्रशासनदरबारी केलेल्या लेखी पाठपुराव्याला महापालिका प्रशासनाकडून कचर्याची टोपली दाखविलेली आहे.