* बळीराजासाठी व्यापारी संघटना ११ लाखाची मदत देणार
* ७५ वर्षाच्या १०० व्यापाऱ्यांचा सत्कार
सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : दि फ्रूट अॅण्ड व्हेजिटेबल मर्चन्ट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास ११ मार्च रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व देशाचे माजी संरक्षणमंत्री शरद पवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फळ मार्केटमध्ये येणार आहेत. याच कार्यक्रमात राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून व्यापारी संघटनेकडून शरद पवारांच्या हस्ते ११ लाख रूपये राज्याचे पणन मंत्री चंद्रकांत पाटील व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाधीन करणार आहेत.
१९३८ साली मर्चंट्स असोसिएशनची स्थापना झाली असून संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त फळ मार्केटमध्ये ११ मार्च रोजी सांयकाळी ४.३० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे पणन मंत्री चंद्रकांत पाटील, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खा. राजन विचारे, खा. शिवाजीराव आढळराव पाटील, आ. छगन भुजबळ, आ. अजित पवार, आ. दिलीप वळसेपाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. नरेंद्र पाटील, आ. संदीप नाईक, आ. मंदा म्हात्रे, आ. शरद सोनवणे, आ. शिवाजीराव नाईक, माजी खा. संजीव नाईक, माजी आ. गणेश नाईक, माजी आ. वल्लभ बेनके, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई मनपा विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नसिम सिद्दीकी, बापूसाहेब भुजबळ, मनोज सैनिक आदी सहभागी होणार आहेत.
या व्यापारी संघटनेची यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, राजीव गांधी, विलासराव देशमुख, बाबुराव शेटे, अभयसिंह राजे भोसले यांच्यासह देशातील व राज्यातील विविध राजकारण्यांशी जवळीक राहीली असून व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविणे, त्यांना सुविधा मिळवून देणे या कामाकरता सर्वांनी योगदान दिले असल्याची माहिती संजय पानसरे यांनी दिली.
फळ मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या परंतु ७५ वर्षे पूर्ण झालेल्या १०० व्यापाऱ्यांचा सत्कारही याच कार्यक्रमात केला जाणार आहे. शरद पवार यांनीही वयाची ७५ वर्षे पूर्ण केली असल्याने त्यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी फळ बाजारातील घडामोडींचे प्रतिबिंब असणारी ट्राफी शरद पवारांना भेट देण्यात येणार आहे.