नवी मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून बेलापुरच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाकडे विशेष लक्ष देण्यास सुरूवात झाली आहे. गावठाणात गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी आ. मंदा म्हात्रेंच्या पाठपुराव्यामुळे सुरू झालेली प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच बेलापुरनजिकच्या दिवाळे जेटीच्या कायापालटाकरता १८ कोटीचा निधी खर्च केला जाणार आहे.
नवी मुंबईतील ३५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या खाडीतील मासेमारी व्यवसायाशी संबंधित असतानाही आजवर या व्यवसायाकडे महाराष्ट्र सरकारने, नवी मुंबई महापालिका प्रशासनाने, स्थानिक राजकारण्यांनी कानाडोळा केला. मासेमारी व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्याकरता राजकीय घटकांकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे या व्यवसायाला घरघर लागलेली आहे. आजवर मासेमारी व्यवसायाकरता शासकीय योजना कधीही राबविल्या गेल्या नाहीत. केवळ इमारतींचे जंगल उभे राहीले, महापालिका राजकारणापुरताच येथील विकास सिमित राहील्याने येथील मासेमारीचा पर्यायाने या व्यवसायावर आधारीत असलेल्या आगरी-कोळी समाजाचा विकास खुंटला असल्याची खंत भाजपा आ. मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली.
नवी मुंबईतील आगरी-कोळी समाज उपजिविकेसाठी समुद्रात अथवा खाडीत जावून मासेमारी करतो. समुद्रात काहीही गुंतवणूक करावी लागत नाही, उलटपक्षी समुद्र आपल्याला भरभरूनच देत असतो. येथील आगरी-कोळी समाज मासेमारी करतो, पण पकडून आणलेले मासे विकण्यासाठी ससून डॉकला जातो. ससून डॉकला होलसेल मार्केट असल्याने नवी मुंबईत २०० रूपयाला विकला जाणारा मासा त्या ठिकाणी नवी मुंबईच्या मच्छिमारांना ६० ते ८० रूपयाला विकावा लागतो. जाण्या-येण्याचा वेळ व प्रवासखर्च लागतो तो वेगळाच. खाडीत प्रदूषित पाणी येवू लागल्याने मासेमारी कमी झाली. खाडीकिनारी अथवा जेटीच्या जवळपासच मासेमारी करणार्या लहान मच्छिमारांचा व्यवसायच संपुष्ठात आला. त्यामुळे खाडीतील मासेमारी सोडून मच्छिमारांना खोल समुद्रात जावून मासेमारी करण्याशिवाय पर्यायच राहीला नाही. याकरता लहान होड्या सोडून मोठ्या होड्या विकत घ्याव्या लागल्या. ज्यांना शक्य नाही, त्यांनी दोन-तीन जणांनी एकत्रित भागीदारी तत्वावर मोठ्या होड्या विकत घेतल्या. खोल समुद्रात जावून मासेमारी केली तरी मासे विक्रीला स्थानिक भागात बाजारपेठ नसल्याने पुन्हा सूसन डॉक, पुन्हा स्वस्त दरात मासेविक्री, जाण्या-येण्याचा खर्च व वेळेचा अपव्यय. यामुळे स्थानिक मासेमारी करणार्या समाजातील अनेकजण या व्यवसायातून अंग काढू लागले. मच्छिमारांतीलच काहींनी समुद्रात जावूनही नफा होत नसल्याचे पाहून स्वत:चा टेम्पो विकत घेतला व ससून डॉकला जावून तेथून मच्छि विकत आणून येथे विकण्याचा धंदा सुरू केला. नवी मुंबईच्या खाडीतील मच्छि ससून डॉकला जावून पुन्हा नवी मुंबईतच मच्छि विकण्याचा प्रकार आज नवी मुंबईत सुरु आहे. स्थानिक भागात बाजारपेठ नसल्याने हा सर्व प्रकार सुरू होता. नवी मुंबईतील मच्छि खवय्यांना खाडी व समुद्र जवळ असतानाही बर्फातील मच्छि खाण्याची वेळ आली. परंतु आता काही महिन्यातच हे चित्र बदलणार आहे.
आ. मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाचा मासेमारी व्यवसाय टिकविण्यासाठी नाही तर व्यवसाय वाढविण्यासाठी, या व्यवसायातून रोजगारवृध्दीसाठी आणि स्थानिक ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. वर्षभराच्या कालावधीत दिवाळे, वाशी आणि सारसोळे या तीन जेट्टीच्या कामासाठी पाठपुरावा सुरू केला. त्यात पहिल्या टप्प्यात दिवाळे जेट्टी, त्यानंतर वाशी जेट्टी आणि अखेरीला सारसोळे जेटीचा कायापालट होणार आहे.
दिवाळे जेटीकरता मेरीटाईम बोर्डाकडून आ. मंदा म्हात्रेंनी १४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केला असून सागरी सुरक्षेचे महत्व लक्षात घेता या जेटीसभोवताली संरक्षक भिंतीकरता ४ कोटी रूपयांचा अतिरिक्त निधीही मंजूर करून घेतला आहे. याशिवाय स्थानिक मच्छिमारांना जाळी विणणे, बोटींची डागडूजी अथवा अन्य साहीत्याकरता शेड बनविण्यासाठी आ. मंदा म्हात्रेंनी आपला आमदार निधीही उपलब्ध करून दिला आहे.
जेटी परिसरात गाळ मोठ्या प्रमाणावर साचल्याने खाडीतील पाणी भरतीच्या काळात जेटीपर्यत येत नाही. मच्छिमारांना आपल्या बोटी,होड्या जेटीपर्यत आणताना त्रास होतो. हे पाहून लवकरच जेटी परिसरातील गाळही काढण्याच्या कामास सुरूवात होणार आहे. यापुढे नवी मुंबईतील मच्छि ही नवी मुंबईतच विकली जावी, नवी मुंबईतील मत्स्यप्रेमींना ताजी व स्वच्छ मच्छि मिळावी याकरता नवी मुंबईतच मच्छि मार्केट उभारणीला प्राधान्य दिले जाणार आहे. सुरूवातीचा प्रयोग म्हणून दिवाळे जेटीलगतच मासे विकण्यासाठी गाळे उपलब्ध करून देण्याचा आ. मंदा म्हात्रेंचा मानस आहे. नवी मुंबईकरांना ताजी, स्वच्छ मच्छि हवी असेल तर त्यांनी यापुढे दिवाळेच्या जेटीवर फेरफटका मारण्यास हरकत नाही.
दिवाळेपाठोपाठ, वाशी गाव व सारसोळे गावाचीही जेटी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुधारीत होणार असल्याने बेलापुर विधानसभा मतदारसंघात मासेमारी व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस येवून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावलेले पहावयास मिळेल.