रायगड : महाडच्या ज्या चवदार तळ्याचं पाणी स्पर्शून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला लढा सुरु केला होता, त्याच चवदार तळ्यातल्या पाण्याचं पुन्हा एकदा शुद्धीकरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे. शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी शुद्धीकरण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.दरवर्षी 20 मार्चला चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वर्धापनदिनी लाखोंच्या संख्येनं आंबेडकरी जनता महाडला येते. त्याचवेळी आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत चवदार तळ्यातल्या पाण्याचं शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष रमेश जाधव यांनी केला आहे.आमदार गोगावले यांनी मात्र हा आरोप फेटाळला असून आपण केवळ जलपूजन केल्याचा दावा केला आहे. मात्र जलपूजनच करायचं होतं तर केवळ ब्राम्हण पुजारीच का, इतर धर्मगुरु का नव्हते असा प्रश्न जाधव यांनी विचारला आहे. तसंच याप्रकरणी गोगावले आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही रिपब्लिकन सेनेने केली आहे.