मराठवाड्यात ८ टक्क्यापेक्षा कमी पाणी
प्यायच्या पाण्याचीही मारामार
मुंबई : महाराष्ट्र राज्याला ४४ वर्षानंतर प्रथमच भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. लागोपाठ ३ वर्ष पाऊस कमी झाल्याने राज्य पूर्णपणे दुष्काळाच्या विळख्यात अडकले आहे. मराठवाडा, विदर्भासहीत राज्यातील अन्य ग्रामीण भागात १९७२ पेक्षाही दुष्काळाची तीव्रता महाभयावह आहे. शासनाच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील धरणांमध्ये ८ टक्क्यापेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक राहीलेला आहे. कमी पाणीसाठा आणि पावसाला अजून दोन महिन्याचा अवधी यामुळे दुष्काळग्रस्त भागाला पिण्याच्या पाण्याकरता आणखी संघर्ष कठोर करावा लागणार आहे.दुष्काळाचा सामना करण्याकरता राज्य सरकारला अपयश आले आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानेही राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. पाण्याच्या टंचाईने ग्रामीण भागासह शहरी भागातील लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पाणीटंचाईमुळे लातूरमध्ये १४४ कलम लागू झाले आहे. पाण्यासाठी ग्रामीण भागात लोक मैत्री, नातेसंबंध विसरून संघर्ष करू लागले आहेत. मार्च महिन्यात ही परिस्थिती निर्माण झाली होती. एप्रिल व मे महिना तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यत वरूण राजाचे आगमन होईपर्यतचा कालावधी लक्षात घेता पाणीटंचाईमुळे महाराष्ट्राला महाभयावह परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.शासकीय माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यातील तलावांमध्ये आणि धरणांमध्ये फक्त ३१ टक्केच पाण्याचा साठा राहीलेला होता. मराठवाड्यामध्ये ८, नागपुरमध्ये ३५, अमरावतीमध्ये ३२, नाशिकमध्ये ३०, पश्चिम महाराष्ट्र ३६ आणि कोकणात ६६ टक्के पाणीसाठा फेब्रुवारीमध्ये शिल्लक राहीलेला होता. कोकण कार्यक्षेत्रामध्ये मुंबई आणि ठाणे परिसर येत आहे. कल्याण व सभोवतालच्या परिसरामध्ये पाण्याकरता लोकांना आता टॅंकर मागवून पाण्याची तहान भागविण्याची पाळी आली आहे. शहरी भागातील ही परिस्थिती लक्षात घेता ग्रामीण भागातील अवस्थेचा विचारही करणे अवघड आहे.मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, पनवेल-उरण भागातही पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले असून पाणीटंचाईचा व पाणीकपातीचा तेथील लोकांना गेल्या दीड महिन्यापासून सामना करावा लागत आहे. वेधशाळेने पाऊस यंदा लवकर येण्याचा अंदाज वर्तविला आहे. पाऊस लांबणीवर पडला तर महाराष्ट्राला देवाचा धावा करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.