मनपाकडून स्वस्त दरात पाणीखरेदी, विक्री मात्र व्यावसायिक दराने, दर महिन्याला लाखोचा घोळ
सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात पाणीबाणीसदृश्य परिस्थिती असताना नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात पामबीच मार्गावर असणार्या वाधवा टॉवरकरता गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाणीघोटाळा सुरू आहे. खारफुटीच्या क्षेत्रात वाधवा टॉवरचे बांधकाम झाल्याने महापालिका प्रशासनाकडून या टॉवरला भोगवटा प्रमाणपत्र अद्यापि मनपा प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. मनपा प्रशासनाकडून टॅकरवाले अवघ्या 300 रूपयांमध्ये एका पाण्याची टॅकरची खरेदी करून वाधवा टॉवरमधील रहीवाशांना व्यावसायक दराने विकतात. दररोजचे किमान 45 ते 50 टॅकर गृहीत धरल्यास हा पाणीघोटाळा दर महिन्याला लाखोच्या घरात जात आहे. महापालिका प्रशासनातील पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांचा वरदहस्त असल्यामुळेच हा पाणीघोटाळा गेली काही वर्षे बिनबोभाट सुरू असल्याचा आरोप कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी केला आहे.
पामबीच मार्गावरून जाताना सारसोळे जंक्शन चौकाच्या लगतच आपणास वाधवाचा टोलेजंग टॉवर आपणास पहावयास मिळतो. हा टॉवर सुरूवातीपासूनच वादाच्या भोवर्यात अडकलेला आहे. या टॉवरचे बांधकाम अर्धवट अवस्थेत बराच काळ होते. टॉवरबाबत न्यायालयीन प्रकरणही झाले होते. मुळातच सिडकोने या ठिकाणी निर्माण केलेल्या भुखंडाबाबत व त्या ठिकाणी उभ्या राहीलेल्या टॉवरविषयी सुरूवातीपासूनच वाद सुरू आहेत. पामबीच मार्गाच्या निर्मितीमुळे सारसोळे जेटीचे स्थंलातर झाले. आज ज्या ठिकाणी वाधवाचा टोलेजंग टॉवर उभा आहे, त्या ठिकाणी सुरूवातीला सारसोळेचे जेटी होती. पामबीच मार्गामुळे जेटी काही अंतर पुढे स्थंलातरीत झाली. जेटी स्थंलातरीत झाली तरी खारफुटी तिथेच राहीली. या टॉवरकरता खारफुटीची मोठ्या प्रमाणावर कत्ल झाली आहे. आजही वाधवा टॉवरच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच वनविभागाचे खारफुटीविषयीचे फलक पहावयास मिळतात. या टॉवरला भोगवटा प्रमाणपत्र देवू नये व खारफुटीच्या जागेवर उभा राहीलेला टॉवर पाडण्याविषयी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे अनेकांनी यापूर्वी लेखी तक्रारीही केलेल्या आहेत. ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे पाडण्याकरता सिडको पुढाकार घेते, मग खारफुटीवर उभा असलेला धनाढ्याचा वाधवा टॉवर पाडण्यास सिडको हात आखडता का घेते असा संतापजनक सवाल मनोज मेहेर यांनी विचारला आहे.
पामबीच मार्गावर उभ्या असलेल्या वाधवा टॉवरमध्ये किमान हजाराच्या आसपास सदनिका आहेत. या सदनिकांची किंमत आज करोडोच्या घरात असून उच्चभ्रू, गर्भश्रीमंताचे वास्तव्य या टॉवरमध्ये आहे. आज या टॉवरमध्ये किमान 45 ते 50 टक्के सदनिकांमध्ये रहीवाशी रहावयास आले आहेत. सकाळी या टॉवरच्या प्रवेशद्वारापासून स्मशानभूमीकडे जाणार्या मार्गावर पाण्याचे टॅकर मोठ्या संख्येने उभे असलेले दिसून येतात. वाधवा टॉवरला दररोज 45 ते 50 टॅकर मनपा प्रशासनाकडून अवघ्या 300 रूपयांमध्ये खरेदी करून तोच पाण्याचा टॅकर 1200 ते 1600 रूपयांपर्यत वाधवाच्या टॉवरला विकले जाते. गेल्या काही वर्षाचा हिशोब जमेस धरल्यास करोडो रूपयांच्या घरात हा पाणीघोटाळा जावून पोहोचला आहे. दर महिन्याला पाणीघोटाळा लाखोच्या घरात जात आहे. मनपाचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांचे हात ओले केल्याशिवाय हा पाणीघोटाळा होणे शक्यच नसल्याचा आरोप मनोज मेहेर यांनी केला आहे.
नेरूळ विभाग कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राऊत यांना मनोज मेहेर यांनी संपर्क केला असता, अवघ्या 300 रूपयाला वाधवा टॉवरकरता पाण्याच्या टॅकरची विक्री होत असल्याची माहिती राऊत यांनी दिली. मनपाच्या तिजोरीत पैसे नाहीत, वाधवा टॉवरला मनपानेच 1200 ते 1600 रूपये या दराने अन्य टँकरवाल्यांसारखी व्यावसायिक दराने विक्री केल्यास मनपाच्या तिजोरीला मदत होईल, मनपाच्या टॅकरने वाधवाला पाणीविक्री का केली जात नाही असा प्रश्न मनोज मेहेर यांनी विचारताच पाणीपुरवठा विभागातील एकाही अधिकार्याने उत्तर दिले नाही. एका पाण्याच्या टॅकरमागे 300ची खरेदी व 1600 रूपयांची विक्री यादरम्यान 1200 ते 1300 रूपयांचा फरक व दररोज अंदाजे 50च्या आसपास पाण्याच्या टॅकरची विक्री याचा हिशोब केल्यास महिन्याला लाखो रूपयांचा पाणीघोटाळा होत आहे. वाधवाच्या टॉवरला गेल्या काही वर्षातील हिशोब केल्यास हा पाणीघोटाळा काही करोडोच्या घरात जात आहे. मनपा प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांच्या आशिर्वादानेच नेरूळमधील पाणीसम्राटाचे उखळ पांढरे करण्याचा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे.