नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे मोरबे धरण आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिकेपाठोपाठ केवळ नवी मुंबई महापालिकेच्याच मालकीचे धरण आहे. पाण्याच्या बाबतीत गेल्या दोन-अडीच महिन्याचा अपवाद वगळता नवी मुंबई खर्या अर्थांने सुजलाम-सुफलाम होती. नवी मुंबईकरांच्या शब्दकोशातही पाणीबाणी हा शब्द नव्हता. 24 तास पाणीपुरवठा या ध्येयाने अभिप्रेत होवून नवी मुंबई महापालिका प्रशासन व प्रशासनाचा गाडा हाकणारे सत्ताधारी प्रामाणिकपणे प्रयास करत होते. परंतु गतवर्षी सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस आणि काही वेळा जलवाहिन्या फुटल्याने लाखो लीटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होणे यामुळे नवी मुंबईकरांना आज पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. नवी मुंबईकरांना जेमतेम आज एक-दीड तासाचाच पाणीपुरवठा उपलब्ध होत आहे. मात्र पाणीचोरी करणार्यांना मात्र या पाणीबाणीचे गांभीर्य आजही जाणवत नाही. टॅकरमाफीयाचा एक गट आता नवी मुंबईत प्रभावशाली होवू लागला आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनातील पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांच्याच आशिर्वादाने टॅकरमाफियांचा प्रभाव वाढत चालला आहे. नवी मुंबईकरांना पाणीटंचाई जाणवत असली तरी टँकरच्या माध्यमातून पाहिजे त्या प्रमाणात मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. अनधिकृत नळजोडण्यांच्या माध्यमातून पाणी माफक प्रमाणात पाणी मिळत आहे. टॅकरवाल्यांना अवघ्या 300 रूपयांमध्ये महापालिका प्रशासनाच्याच पाण्याच्या टाकीवरून टॅकर पाहिजे त्या संख्येने पाणी भरून मिळत आहे. मग टॅकरराज व अनधिकृत नळजोडण्या याचा हिशोब केल्यास या पाणीटंचाईचा जाच हा प्रामाणिकपणे कर भरणार्या सर्वसामान्य करदात्यांनाच होत आहे. ज्या करदात्यांच्या जीवावर नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा आर्थिक डौलारा अवलंबून आहे, त्यांनाच पाण्यासाठी वेठीस धरले जात आहे. म्हणूनच नवी मुंबईकरांना आज पाणीबाणीचा का सामना करावा लागत आहे, पाणीबाणी कोणामुळे निर्माण झाली, पाणीबाणीचा फायदा कोणाला होत आहे, या प्रश्नांचा यानिमित्ताने नवी मुंबईकरांनी अवलोकन करणे गरजेचे आहे.
मोरबे धरणातून उपलब्ध होणार्या पाणीपुरवठ्यापैकी किमान 15 ते 20 टक्के पाण्याचा शोध लागत नसल्याची माहिती मनपाच्याच पाणीपुरवठा विभागातील सूत्रांकडून देण्यात येत आहे. या होत असलेल्या पाणीचोरीबाबत नवी मुंबई मनपा प्रशासनाला कोणत्याही प्रकाराचा खेद वाटत नसल्याने पाणीचोरीचा आजतागायत गांभीर्याने शोध घेतला जात नाही. नवी मुंबईतील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोडण्या पहावयास मिळतात. शहरी भागातही सिडको सोसायट्या, साडे बारा टक्के भुखंडावरील इमारती,खासगी सोसायट्या, चाळी, झोपडपट्टी, डोंगराळ विभाग, एलआयजी आदी ठिकाणीही मोठ्या संख्येने आजही अनधिकृत नळजोडण्यातून पाणीपुरवठा होत आहे. पाण्याची चोरी कोठे कोठे होत आहे, कोणकोणत्या ठिकाणी अनधिकृत नळजोडण्या कार्यरत आहेत, आजही कोठेकोठे अनधिकृत नळजोडण्या टाकण्यात येत आहे, याची खडानखडा महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांना व कर्मचार्यांना माहिती आहे. चायनीजच्या टपर्या, हॉटेल्सदेखील पाणीचोरीमध्ये आपले योगदान नोंदवित आहेत. मुळातच अनधिकृत नळजोडण्यांची समस्या पालिका प्रशासनाने मुळापासून उखडून टाकल्यास नवी मुंबईकरांना कधीही पाणीटंचाईचा व या पाणीबाणी परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही. महापालिकेच्या विभाग कार्यालयात कार्यरत असणार्या पाणीपुरवठा विभागातील अधिकांश लोकांना अनधिकृत नळजोडण्यांची माहिती असते. पण काम करण्याची इच्छाशक्तीच या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचार्यांकडे नसल्याने अनधिकृत नळजोडण्यांना पालिकाश्रय लाभला आहे.
ज्या ईमारतींकडे भोगवटा प्रमाणपत्र नाही, अशा गावठाणातील व अतिक्रमण केलेल्या जागेतील इमारतींना आजही मुबलक प्रमाणावर अनधिकृत जलवाहिन्यांतून पाणी उपलब्ध होत नाही. यावरदेखील कारवाई करण्यास नवी मुंबई महापालिका प्रशासनाने उदासिनताच दाखवलेली आहे.
ग्रामीण भागासारखेच नवी मुंबईसारख्या प्रगतीमय शहरात टँकरराज निर्माण झालेे आहे. भोगवठा प्रमाणपत्र अद्यापि न भेटलेल्या अनेक टोलेजंग टॉवरला, गृहनिर्माण संस्थांना, बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हे टॅकर पाणी कोठून उपलब्ध करून घेतात याचा शोध घेतल्यास आश्चर्यकारक माहिती उपलब्ध होते. नवी मुंबईकरांना पाणीबाणीच्या खाईत ढकलणार्या पालिका प्रशासनाच्या पाण्याच्या टाकीवरूनच या टॅकरवाल्यांना अवघ्या 300 रूपयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. हेच पाणी टॅकरवाले बाहेर 1300 ते 1800 रूपयांमध्ये विकतात. महापालिका प्रशासनाने स्वत:चे पाणी स्वत:च्याच टॅकरने विकल्यास मनपाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर विकासकामांकरता निधी उपलब्ध होईल. पण तसे केल्यास पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना मलई प्राप्त होणार नाही. टॅकरवाल्यांना पाहिजे त्या प्रमाणात कमी दरात पाणी उपलब्ध होण्याच्या समीकरणामागे फार मोठे अर्थकारण दडलेले आहे.
ग्रामीण भागात पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना वणवण फिरावे लागत आहे. नवी मुंबईकरांनाही आज जेमतेम तास-दीड तासच पाणीपुरवठा उपलब्ध होत आहे. पावसाळा अजून दोन महिन्यावर आहे. पाणी जपून न वापरल्यास मे महिन्याच्या मध्यावरच नवी मुंबईकरांनाही हंडाभर पाण्याच्या शोधात घराबाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे. ही अतिशयोक्ती नसून वस्तूस्थिती आहे. अनधिकृत नळजोडण्या व टॅकरमाफियांचे पुरविले जाणारे चोचले पाहता पाणीबाणीची भीषणता वाढीस लागणार आहे. हे कोठेतरी थांबले पाहिजे, कोणीतरी थांबविले पाहिजे. नवी मुंबईकरांच्या उदासिनतेचा व थंडपणाचा फायदा उचलला जात आहे. त्यामुळे पाणीबाणी संपुष्ठात आणावयाची असेल तर कोणी अनधिकृत नळजोडण्या व टॅकरमाफियांच्या विरोधात जनआंदोलन हे छेडलेच पाहिजे?
संदीप खांडगेपाटील
(साभार : दैनिक : नवराष्ट्र)