नदीचे अस्तित्व संकटात
मुंबई : ‘तू गंगा की मौज मैं जमुना की धारा, हो रहेगा मिलन ये हमारा तुम्हारा…’ १९५२ साली प्रदर्शित झालेल्या भारतभूषण आणि मीनाकुमारी या कलावंतांच्या अभिनयाने गाजलेल्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटातीलहे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. ६४ वर्षापूर्वीच्या लोकप्रियतेइतकेच आजही लोकप्रिय आहे. या चित्रपटाचे अधिकांश चित्रीकरण नॅशनल पार्कमधून वाहणाऱ्या दहीसर नदीमध्येच झाले होते. यासह अनेक चित्रपटांच्या कथानकाची, चित्रीकरणाची साक्षीदार असणारी दहीसर नदी आज आपल्या अस्तित्वासाठी व ओळख टिकविण्यासाठी संघर्ष करत आहे.
पूर्वीच्या काळी या नदीमध्ये असणाऱ्या मगरी या पर्यटकांसाठी आकर्षणाची बाब असायच्या. भाडूंपच्या तुलसी विहारपर्यत विस्तारलेली ही दहीसर नदी
कान्हेरी गुंफा, नॅशनल पार्क, बोरिवली तसेच दहीसर येथून वाहत १२ किलोमीटरचा प्रवास करत मिरा रोड येथील मनोरीच्या खाडीत सागरामध्ये विलिन होत असे. नदीकाठी असणाऱ्या लोकांची तहान भागविण्याचे काम करणारी दहीसर नदीचे आज नाल्यामध्ये रूपांतर झाले आहे. आताची नवी पिढी दहीसरच्या नदीला दहीसरचा नाला या नावाने ओळखत आहे. औद्योगिक कंपन्या, तबेले यातून निघणारा कचरा, दूषित पाणी यामुळे दहीसर नदीचे पाणी विषारी बनले आहे. आसपासच्या परिसरातील लोकांकडून दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने ही डंपिंग नदी बनली आहे. या नदीच्या पाण्यात धोबी घाटाचेही पाणी सोडले जात असल्याने पाणी ‘कलरफुल’ही होवू लागले आहे. एकीकडे आज मुंबई पाणीटंचाईतून वाटचाल करत असतानाच दुसरीकडे नैसर्गिक स्त्रोत असणारी दहीसर नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रशासनाकडून गंभीरपणे प्रयत्न केले जात नाहीत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाणी संरक्षणासाठी कार्य करणारे ‘जलपुरूष’ डॉ. राजेंद्र सिंह यांनी काही पर्यावरणप्रेमी जागृत रहीवाशांसह ‘रिव्हर मार्च’ हे आंदोलन नुकतेच केले होते.
दहीसर नदीकिनारी झालेले अतिक्रमण पाहता आज नदीला खऱ्या अर्थाने संरक्षणाची गरज असल्याने ही नदी वाचविण्यासाठी दहीसरच्या आमदार मनिषा चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयास केला आहे. या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी गंभीरपणे दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक बोलवित नदीकरता उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्र्यांनी आदेश देण्याची तत्परता दाखविली असली तरी आदेशाची अंमलबजावणी करताना प्रशासनाला अडथळ्यांची मालिका पार पाडावी लागणार आहे. १९८०च्या दशकामध्ये मुंबई उपनगरांचा विकास होवू लागला, त्यावेळी लोकांनी बोरिवली,दहीसर या ठिकाणी आपली घरे बनविण्यास सुरूवात केली. त्यात दहीसर नदीच्या सभोवतली किनाऱ्यावर दौलत नगर, इंदिरा नगर, मेडिना कॉलनी, साईनाथ नगर, धोबीघाट, दहीसर गावठाण, कांदरपाडा आदी परिसरातील १००५ झोपड्या आता प्रमुख अडथळा आहेत. या झोपड्यांचे पुर्नवसन एमएमआरडीच्या जमिनीवर करण्यासाठी महापालिकेला त्या हस्तांतरीत कराव्या लागणार आहेत. याशिवाय दहीसरच्या नदीत औद्योगिक कंपन्या-कारखान्यांचे दूषित पाणू, मल:निस्सारणचे पाणी,तबेल्यातील शेण, धोबी घाटाचे पाणी आदींचीही व्यवस्था करावी लागणार आहे.