अतिक्रमणच्या विळख्यात नेरूळ सेक्टर 8 मधील आरोग्य सुविधा
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 8 मधील अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये वेगवेगळे दवाखाने व रूग्णालये असून येथील आरोग्य सुविधेसाठी येथे बर्याच ठिकाणाहून उपचारासाठी रहीवाशी येतात. या शॉपिंग कॉम्पलेक्सच्या तळाला चायनीज टपर्यांच्या अतिक्रमणाचा उद्रेक झाला असून महापालिका प्रशासनाचा अतिक्रमण विभाग गेल्या काही वर्षापासून या अतिक्रमणाकडे कानाडोळा करून हा भस्मासूर पोसत आहे, मागील पालिका आयुक्तांनी या प्रभागातील पाहणी दौर्यामध्ये या अतिक्रमणाबाबत नाराजी व्यक्त करता तात्काळ अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. तथापि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तत्कालीन पालिका आयुक्तांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवित चायनीजचालकांवरील आपले अर्थयुक्त प्रेम दाखवून दिले होते. नव्याने आलेले पालिका आयुक्त मुंढे हेदेखील या चायनीजचालकांच्या अतिक्रमणाचे चोचले पुरविणार आहात काय, असा संतप्त सवाल स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे.
नेरूळ सेक्टर 8 मधील अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्सच्या पहिल्या मजल्यावर विविध रूग्णालये कार्यरत असून तळाशी मात्र चायनीजच्या टपर्यांचे अतिक्रमण पहावयास मिळत आहे. रूग्ण व रूग्णाच्या नातेवाईकांना या अतिक्रमणातून वाटचाल करत उपचाराकरता ये-जा करावी लागते. महापालिका प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळे चायनीज चालकांचे व्यवसायाकरता मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्याचे धाडस वाढीला लागले आहे. तत्कालीन महापालिका आयुक्तांनी पाहणी दौर्यामध्ये बकालपणा आणणार्या या चायनीज टपरीचालकांचे अतिक्रमण हटविण्याचे अतिक्रमण उपायुक्तांना आणि नेरूळ विभाग अधिकार्यांना आदेश देण्याच्या घटनेला पाच महिन्याचा कालावधी उलटला आहे.चायनीजवाल्यांच्या अतिक्रमणाला आशिर्वाद देताना मनपा अतिक्रमण विभागाने व नेरूळ विभाग कार्यालयाने महापालिका आयुक्तांच्याच आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे पहावयास मिळत आहे. नवीन आयुक्त मुंढे हे त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल राज्यात ओळखले जात असल्याने महापालिका प्रशासनाचा अतिक्रमण विभाग या चायनीज अतिक्रमणाबाबत कितपत ठोस व कायमस्वरूपी कारवाई करतो, याकडे नेरूळवासियांचे लक्ष लागून राहीले आहे.
नेरूळ सेक्टर आठमध्ये अंबिका शॉपिंग काँम्पलेक्स एकीकडे दर्जेदार आरोग्य सुविधेकरता प्रसिध्द तर दुसरीकडे चायनीजचालकांच्या टपर्यांच्या अतिक्रमणाकरता कुप्रसिध्द आहे. या कॉम्पलेक्समध्ये पहिल्या मजल्यावर कमलेश माता-बाल रूग्णालय, पंचकर्मचे ट्रू हेल्थ केअर सेंटर, प्रिया हॉस्पिटल, कल्याणी डोळ्यांचे हॉस्पिटल, ओम डॉयग्नोस्टिक सेंटर, शारदा नाक-कान-घसा हॉस्पिटल, महाजन डेंटल क्लिनिक, शिवम क्लिनिक, डॉ. डांगे डॉयग्नोस्टिक सेंटर असे विविध हॉस्पिटल्स कार्यरत आहेत. येथील आरोग्य सुविधेकरता नवी मुंबईतून रूग्ण या ठिकाणी येत असतात. विशेष म्हणजे या कॉम्पलेक्सच्या तळाला कल्पना व समाधान असे दोन बिअर बार असून विशेष म्हणजे कॉम्पलेक्सच्या पहिल्या मजल्यावर जाण्याकरता दोन्ही बिअर बाजूनेच जिना उपलब्ध आहे. रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांना बाराही महिने येथे जाण्याकरता मद्यपिंचा सामना करावा लागतो. या कॉम्पलेक्सच्या तळाशी लहान लहान टपर्या असून या टपर्यामध्ये चायनीजचा व्यवसाय केला जात आहे. रवी चायनीज, टेम्पटेंशन, रॉयल फूड्स या टपरीचालकांनी आपल्या टपरीच्या जागेलगतच्या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेले आहे. विशेष म्हणजे चायनीजचालकांनी सभोवतालच्या जागेवर अतिक्रमण करताना कॉम्पलेक्सच्या मोकळ्या जागेत दुपारी 4 नंतर आपल्या ग्राहकांना खुर्च्या टाकून येण्या-जाण्यास अडथळे निर्माण केले आहेत.
चायनीज चालकांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत वैद्यकीय सुविधा देणार्या डॉक्टरांनी, रूग्णालय व्यवस्थापणाने वारंवार नाराजी व्यक्त करूनही पालिका प्रशासन चायनीजचालकांच्या अतिक्रमणाला पाठिशी घालत आहे. या डॉक्टरांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या घरातील सदस्यांचा समावेश आहे. डोळ्याच्या विकारावर उपचार करणार्यांमध्ये एक डॉक्टर तर मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांची पत्नीही आहे. माजी मुख्यमंत्र्यांची घरातील सदस्यांचे रूग्णालय व अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नीचे डोळ्यांचे हॉस्पिटल असतानाही मनपा प्रशासनाचा अतिक्रमण विभाग व नेरूळ विभाग कार्यालय चायनीजवाल्यांना पाठिशी घालत असण्यामागे फार मोठे अर्थकारण दडले असल्याचा आरोप स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे.
* तत्कालीन आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
तत्कालीन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रभाग 87चा पाहणी दौरा 10 डिसेंबर 2015 रोजी आयोजित करताना स्थानिक शिवसेना नगरसेविका सुनिता रतन मांडवे व स्थानिक रहीवाशांकडून समस्यांची माहिती जाणून घेतली असता, नगरसेविका मांडवे आणि स्थानिक नागरिकांनी तसेच आरोग्य सुविधा देणार्या घटकांनी चायनीज टपर्यांच्या अतिक्रमणाचा, बकालपणाचा, चायनीजच्या कचर्याचा प्राधान्याने त्रास होत असल्याची तक्रार करत चायनीजच्या टपर्यांचे अतिक्रमण हटविण्याची व चायनीजचालकांना मुळ जागेत व्यवसाय करण्यास लावण्याची मागणी केली होती. आयुक्तांनी स्वत: चायनिज टपरीवाल्यांचे अतिक्रमण पाहत अतिक्रमण विभाग व नेरूळ विभाग कार्यालयावर कडक ताशेरे ओढत तात्काळ हे अतिक्रमण हटविण्याचे संबंधितांना निर्देश दिले होते. तथापि आयुक्तांनी चायनीजवाल्यांचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश देवून पाच महिन्यानंतरही अतिक्रमण विभाग कारवाई करत नसल्याने नेरूळ विभाग कार्यालयाने व अतिक्रमण विभागाने या आदेशालाच केराची टोपली दाखविली असल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.