* ३११ महिलांचा मृत्यू
मुंबई : वर्षभराच्या कालावधीत देशाची आर्थिक राजधानी म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये तब्बल ३४७९० महिलांनी गर्भपात केल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. गर्भपातादरम्यान ८ महिलांचा मृत्यू झाला आहे. गर्भपात करणे कायद्याने गुन्हा असतानाही विशिष्ट परिस्थितीमध्ये गर्भपात करण्यास परवानगी दिली जाते. २०१५-१६ या वर्षामध्ये सर्व कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केल्यानंतर ३४७९० महिलांनी गर्भपात केला आहे. यातील अधिकांश गर्भपात करणाऱ्या अल्पवयीन असून बाळाला जन्म दिल्यावर ३११ महिलांचा मृत्यू झाला आहे.
*गर्भनिरोधक तंत्र अपयशी
माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, गर्भनिरोधक तंत्र अपयशी ठरल्यामुळे गर्भपात करण्याची वेळ या महिलांवर आली आहे. गर्भपाताच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, २०१५-१६ या वर्षात शरीरसंबंध ठेवतेवेळी गर्भनिरोधक तंत्र अपयशी तसेच कुचकामी ठरल्यामुळे इच्छा नसतानाही २८ हजार ८४३ महिलांवर गर्भवती राहण्याची वेळ आली. याच एकमेव कारणास्तव महिलांवर गर्भपात करवून घेण्याची वेळ आली. गर्भवती असताना महिला अशक्य असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १ हजार २५५ महिलांना गर्भपात करवून घ्यावा लागला. गर्भाशयामध्ये अपत्याची व्यवस्थित वाढ न होणे, बालकांच्या आरोग्यास गर्भाशयातच धोका यामुळे मुलांना जन्म न देण्याचा १ हजार २५५ महिलांना निर्णय घ्यावा लागला. गर्भाशयात बालकांची तपासणी करताना बालकांना अपंगत्व असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ७७५ आणि गरोदरपणाच्या कालावधीत मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ३५० महिलांना गर्भपात करून घ्यावा लागला. महिलांकरता देशामध्ये सर्वाधिक सुरक्षित शहर म्हणून मुंबई शहराच्या असणाऱ्या नावलौकीकाला पुन्हा एकवार काळीमा फासला गेला आहे. २०१५-१६ या वर्षात बलात्कार प्रकरणांना सामोरे जावे लागलेल्या २२ महिलांना गर्भपात करावा लागला. मुंबईमध्ये २२ महिलांवर बलात्कार झाल्यामुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेबाबत तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकवार प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
*मुलींच्या सुरक्षेकरता करावा लागला कायदा
वंशाकरता मुलगाच हवा या समजापायी गर्भपाताच्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी गर्भपातावर बंदी आणली आहे. परंतु प्रसुतीच्या वेळी आईच्या जिविताला निर्माण झालेला धोका, बलात्कार, मुलगा गर्भाशयातच अपंग असल्यास, मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या महिला अशक्तअसल्यास गर्भपाताकरता शासनाकडून परवानगी देण्यात येते.
*प्रसुतीनंतर मृत्यू
मुंबई शहरात अत्याधुनिक प्रसुतीगृहे असल्याचा राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडून केला जाणारा दावादेखील गर्भपाताच्या घटनांमुळे फोल ठरला आहे. प्रसुती झाल्यावरही ३११ महिलांना मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. प्रसुतीच्या वेळी झालेला रक्तस्व्राव, शरीरातील ताठरता, क्षयरोग ह्दयाला सुज येणे अशा विविध कारणांमुळे एक वर्षामध्ये गर्भपाताच्या वेळी ८ महिलांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १९ ते २५ वयोगटातील ५ महिला, २६ ते २९ वयोगटातील १ महिला आणि ३० ते ३५ वयोगटातील २ महिलांचा समावेश आहे.