मुंबई : विविध कारणास्तव पोलिसांकडून आवश्यक असणाऱ्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राकरता सर्वसामान्य नागरिकांना चकरा माराव्या लागतात,पण आता पोलिस ठाण्यामध्ये नागरिकांना चकरा माराव्या लागणार नाहीत. कारण आता मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राकरता ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. यामुळे नागरिकांच्या पैशाची व वेळेची बचत होणार आहे. नागरिकांना सुरक्षा व्यवस्था, खासगी कंपन्या, परदेशात नोकरी याकरता पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घ्यावे लागत असे. या प्रमाणपत्रामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल आहेत अथवा नाही, याची तात्काळ माहिती मिळत असे.
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे अतिरिक्त पोलिस रावसाहेब शिंदे यांनी मुंबईमध्ये दरवर्षी ८० हजार नागरिक चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रांकरता अर्ज करत असल्याची माहिती दिली. त्यांना या प्रमाणपत्राकरता विशेष शाखेच्या कार्यालयात अर्ज भरण्यापासून प्रमाणपत्र मिळेपर्यत अनेकदा चकरा माराव्या लागतात. त्यामध्ये वेळेचा अपव्यय व पैसाही खर्च होतो.
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे आता घरबसल्या कोणीही आपले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.
पूर्वी नागरिकांना www.mumbaipolice.maharashtra.gov.in अथवा www.mumbapolicegeneralunit.maharashtra.gov.in या साईटवर जावून अर्ज काढून तो अर्ज पोलिसांच्या विशेष शाखेमध्ये आपल्या कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह जमा करावे लागत असे. विशेष शाखेकडून तो अर्ज तपासून स्थानिक पोलिस ठाण्यात पाठविला जात असे. अर्ज मिळताच स्थानिक पोलिस ठाण्यातील पोलिस अर्जदाराच्या घरी जावून त्याचे कागदपत्र व गुन्हेगारी पार्श्वभूमी याची चौकशी करत असायचे. यानंतर पुन्हा तो अर्ज पोलिसांच्या विशेष शाखेकडे पाठविण्यात येत असे. या प्रक्रियेमध्ये पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनण्यास व अर्जदाराला ते प्रमाणपत्र मिळण्यास किमान ३० दिवसाचा कालावधी जात असे. यापूर्वी तर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राकरता तीन महिन्याचा कालावधी लागत असायचा.
पोलिस उपायुक्त अंकुर शिंदे यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या या www.pcs.mahaonline.gov.in अथवा www.aaplesarkar.mahaonline.gov.in साईटवर जावून अर्ज करायचा व त्यात आपला भ्रमणध्वनी क्रमांक व अन्य माहिती नमूद करायची. अर्जाचे रजिस्ट्रेशन झाल्यावर कागदपत्र स्वाक्षरीसहीत व फोटोसह अपलोड केल्यावर दोन ते तीन दिवसातच पोलिसांच्या विशेष शाखेकडून संबंधित अर्जदारास भ्रमणध्वनीवर संदेश येतो. मुळ प्रमाणपत्रासह स्थानिक पोलिस ठाण्यात कागदपत्रांच्या तपासणीकरता येण्याची वेळ त्यात देण्यात येते. पोलिसांनी कागदपत्रे तपासल्यावर पोलिसांच्या विशेष शाखेकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड करण्यात येई. हे प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड केल्यासवर अर्जदाराच्या भ्रमणध्वनीवर संदेश येतो. अर्जदाराने वेबसाईटवरून ते प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचे.