माहितीच्या अधिकारात उघड
मुंबई : मुंबई पोलिसांनी एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या एक वर्षाच्या कालावधीत स्वरक्षणार्थ नव्याने १७३ जणांना शस्त्रास्त्र परवाने मंजूर केले आहे. माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली आहे. २०१५ ते २०१६ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये स्वरक्षणाकरता शस्त्रास्त्र परवाना मिळावा मुंबई पोलिसांकडे ३४२ लोकांनी अर्ज सादर केले होते. त्या अर्जाची छाननी करताना मुंबई पोलिसांकडून १६९ अर्जांना परवानगी नाकारताना उर्वरित १७३ लोकांना शस्त्रास्त्र परवाने मंजूर केले आहेत.
ज्या लोकांच्या जिविताला धोका आहे, गुन्हेगारांकडून ज्यांना धमक्या दिल्या जात आहेत, त्याच लोकांना शस्त्रास्त्र परवाने मंजूर केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
** शस्त्रास्त्र परवाना मिळण्याची प्रक्रिया
अर्जदारास शस्त्रास्त्र परवाना मिळण्याकरता आपला अर्ज पोलिस उपायुक्त (मुख्यालय-१) यांच्याकडे सादर करावा लागतो. तेथून तो अर्ज स्थानिक पोलीस ठाण्यात पाठविला जातो. अर्जदाराची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिस ठाण्याकडून विभागिय पोलिस उपायुक्तांकडे पाठविण्यात येते. त्यानंतर पोलिस उपायुक्तांकडून अर्जदाराची चौकशी
केली जाते. अर्जदाराच्या जिवितास खरोखरीच धोका असल्याची खात्री पटल्यावर त्यास स्वरक्षणासाठी शस्त्रास्त्र परवाना मंजूर करण्यात येतो. यानंतर अर्जदारास शस्त्रास्त्र परवाना मिळाल्यावर मान्यताप्राप्त प्रशिक्षकाकडून शुटींग क्लबमध्ये शस्त्र चालविण्यातकरता व व सुरक्षित ठेवण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. दरवर्षी शस्त्राचे नुतनीकरण करावे लागते. शस्त्राचा दुरूपयोग झाल्याचे निदर्शनास येताच हा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येतो.
** कागदपत्रांची संख्या झाली कमी
केंद्र सरकारच्या नवीन शस्त्र कायदा २०१५ अस्तित्वात आल्यानंतर स्वरक्षणासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना कागदपत्रे कमी द्यावी लागत आहेत. पूर्वी आपली विविध डझनपर प्रमाणपत्र, रहीवाशी पुराव्याचे दाखले व अन्य कागदपत्रे सादर करावी लागत आहे. आता ती संख्या अर्ध्यावर आली आहे.
** २०१५-१६ या वर्षात शस्त्र परवाना मंजूरीची यादी
1) ८१ : चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती, सुरक्षा यंत्रणा व सर्वसामान्य नागरिक
2) ४८ : व्यापारी
3) २५ : पोलिस कर्मचारी
4) ९ : बिल्डर
5) ५ : डॉक्टर
6) २ : कंपनी अधिकारी
7) १ : वकील
8) १ : न्यायाधीश
9) १ : राजकारणी