नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्याने राजकारण्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला असला तरी सर्वसामान्य नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कडक स्वभावाचे, कार्यक्षम अशी तुकाराम मुंढेच्या कार्यप्रणालीची ओळख महाराष्ट्राला त्यांनी आपल्या कार्यप्रणालीतून यापूर्वीच दिलेली आहे. चौदा कोसावर भाषा बदलते, मातीचा गुणधर्म बदलतो, माणसांचे स्वभाव वैशिष्ठ्ये बदलतात, याचा अनुभव तुकाराम मुंढे यांना नवी मुंबईत अजून यावयाचा आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणारे अधिकारीदेखील भ्रष्टाचार घोटाळ्यात अडकल्याचा येथील प्रशासकीय अनुभव आहे. अतिक्रमण घोटाळ्यांमध्ये मनपा उपायुक्तांना निलंबित केले असल्याचे प्रकरण अद्यापि जुने झालेले नाही. नवी मुंबई महानगरपालिकेत काम करणार्या प्रशासकीय अधिकार्यांची, उपायुक्तांची श्रीमंती ही नगरसेवकांपेक्षा कैकपटीने अधिक असल्याचे नवी मुंबईकरांना जवळून पहावयास मिळत आहे. अतिक्रमणे, बकालपणा, कचर्याचे ढीगारे, अनधिकृत बांधकामे, अनधिकृत नळजोडण्या यासह नानाविध समस्यांना नवी मुंबई शहराच्या कानाकोपर्यात पहावयास मिळत आहेत. नवी मुंबई महापालिका प्रशासनाला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमाकांचे सलग दोन वेळा पारितोषिक मिळालेले आहे. स्वमालकीचे धरण असणारी महापालिका असा या महापालिकेचा नावलौकीक आहे. ग्रामपंचायतीतून थेट महानगरपालिकेत रूपांतरीत झालेली राज्यातील एकमेव महानगरपालिका असा या महानगरपालिकेचा नावलौकीक आहे. केंद्र व राज्य सरकारकडून सातत्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनावर पुरस्करांचा वर्षाव होत आहे. परंतु आज प्रत्यक्षात नवी मुंबई शहरामध्ये काय आढळून येत आहे, याचा आढावा घेतल्यास दिव्याखाली अंधार या एकमेव शब्दांमध्ये उत्तर पहावयास मिळते. नवी मुंबई शहराचा कारभार ग्रामपंचायत, सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका असा टप्याटप्याने स्थंलातरीत होत आलेला आहे. सिडको कालावधीत शहराचा विकास नियोजनबध्द होत असायचा, पण नवी मुंबई महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सुविधांचे प्रमाण कमी होत गेले आणि समस्यांचे प्रमाण वाढत गेले. एमआयडीसी, सिडकोचे आजही नवी मुंबईत अस्तित्व पहावयास मिळत आहे. घणसोली व लगतचा परिसर आजही सिडकोने नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत केलेला नाही. स्वच्छतेचा पुरस्कार मिळविणार्या महापालिकेच्या कानकोपर्यात बकालपणा आहे. अनधिकृत झोपडपट्टया आहे. गावठाणात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर आहेत. घरपट्टी कोणत्या वास्तूची व त्याच घरपट्टीच्या आधारावर भलत्याच ठिकाणी इमारती उभ्या केल्या जात आहेत. डोंगराळ भागातही झोपड्यांचा शिरकाव झालेला आहे. एमआयडीसी भागात उत्तर भारतीयांची वस्ती व त्यातील तबेले पाहिल्यावर प्रथमदर्शनी आपण उत्तर प्रदेश व बिहारमध्येच असल्याचा भास होतो. प्रशासनाच्या व राज्यकर्त्यांच्या उदासिनतेमुळे आज नवी मुंबई शहराच्या सौंदर्याचे तीन तेरा वाजलेले आहेत. अनधिकृत होर्डीगच्या बाबतीत नवी मुंबई प्रशासनाला उशिराने जाग आल्यामुळे अनधिकृत बॅनर व होर्डिग लागण्याचे प्रमाण बर्याच अंशी कमी झाले आहे. अनधिकृत होर्डीग व बॅनर लावणार्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे महापालिका प्रशासनाला अधिकार असतानाही मनपा प्रशासनाने ते अधिकार आजतागायत कधी वापरलेच नाहीत. आता एक महिन्यापासून मनपा प्रशासनाने अनधिकृत बॅनर व होर्डिगविरोधात मोहीम उघडल्याने बकालपणाला काही अंशी आळा बसला आहे. तुकाराम मुंढे यांच्या आगमनाने जादूची कांडी फिरवावी तसा चमत्कार नक्कीच घडणार नाही. पण त्यांच्या कार्यप्रणालीचा नावलौकीक असल्याने नवी मुंबईकर त्यांच्याबाबत आशावादी आहेत. तुकाराम मुंढे यांच्या आगमनानंतर मनपा प्रशासनातील अनेक विभाग कधी नव्हे ते कामाला लागले आहे. स्वमालकीचे धरण असल्याने नवी मुंबईकर पाण्याच्या बाबतीत सुजलाम सुफलाम होते. 24 तास पाणी विनासायास उपलब्ध होत होते. गावठाण भागात, घरपट्टीच्या इमारतींमध्ये, हॉटेलांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोडण्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असे. पालिका प्रशासनाच्या विभाग कार्यालयांतील पाणीपुरवठा विभागांकडून या पाणीचोरांकडे कानाडोळा करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी झाली. आता पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर आणि नव्याने आलेल्या तुकाराम मुंढे या आयुक्तांना आपला कार्यक्षमपणा दिसावा याकरता अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याची मोहिम उघडण्यात आली. पंरतु ही कारवाई म्हणजे निव्वल ढोंग व डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार असल्याचे अल्पावधीत स्पष्ट झाले. पालिका कर्मचार्यांनी अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई केली. परंतु पालिका कर्मचारी जाताक्षणी संबंधित सोसायटीतील लोकांनी प्लंबरला बोलावून तोडलेल्या नळजोडण्या पूर्ववत जोडून घेतल्या. मग हे कारवाईचे नाटक कशासाठी होते? खोदकाम करून चांगल्या रस्त्यांचे मात्र तीन तेरा करण्यात आले. नवीन आयुक्तांना कामाच्या माध्यमातून सलामी देण्यासाठी अतिक्रमण विभागही कधी नव्हे तो रस्त्यावर उतरला. टपर्या व चायनीजचालक, फेरीवाल्यांवर कारवाई जोरदारपणे करत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. पण हेही नाटक असल्याचे काही सेंकदातच स्पष्ट झाले. अतिक्रमण विभागाची पाठ फिरताच फेरीवाले रस्त्यावर आले, चायनीजवाले पुन्हा व्यवसाय करू लागले. मुळातच नवी मुंबई शहराच्या बकालपणाला, अस्वच्छतेला नवी मुंबई मनपा प्रशासनातील कर्मचारी व अधिकारीच जबाबदार आहेत. राजकारण्यांबरोबर प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी मलिदा कमविण्यात व्यस्त आहे. नवी मुंबई शहराविषयी, नवी मुंबईकरांविषयी, येथील समस्यांविषयी पालिका प्रशासनातील कर्मचारी व अधिकार्यांमध्ये कोणतीही आस्था राहीली नसल्याचे पहावयास मिळते. शहरासाठी काहीतरी करून दाखविण्याची इच्छाशक्ती मनपा अधिकारी व कर्मचार्यांमध्ये पहावयास मिळत नाही. एकंदरीत अंधेर नगरी, चौपट राजा हे चित्र सर्वत्र आहे. तुकाराम मुंढे यांचा नावलौकीक नवी मुंबई मनपा प्रशासनामध्ये खरोखरीच परिवर्तन घडवून आणेल का, प्रशासनात शिस्त निर्माण होईल का, बकालपणाचे सावट दूर होईल का, पाणीचोरी संपुष्ठात येईल का अशा विविध प्रश्नांच्याच्या उत्तरावर तुकाराम मुंढेच्या कार्यप्रणालीचे अस्तित्व निश्चित होणार आहे.
संदीप खांडगेपाटील
(साभार:- दै. नवराष्ट्र)