लिंगायत व बंजारा समाजाच्या दफनभूमीच्या भुखंडाचे गौडबंगाल
सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : सर्वधर्मियांची नगरी असणार्या नवी मुंबईत हिंदू धर्मियांचा अपवाद वगळता इतर धर्मियांना अंत्यविधीकरता मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध आहे. अंत्यविधीकरता जागा कमी पडल्यास अन्य धर्मियांना अतिरिक्त जागा देण्याचे औदार्य सिडकोकडून तात्काळ दाखविले जाते. मनपाही तत्परता दाखवून त्या ठिकाणी सुविधा पुरविण्यास प्राधान्य देते. मात्र हिंदूंना अंत्यविधीकरता व हिंदूंच्या दफनभूमीकरता जागा कमी पडत असतानाही जागा देण्यास व सुविधा पुरविण्यास सिडको व महापालिका हात आखडता घेते. हिंदू धर्मातील दफनभूमीची समस्या दिवसेंगणिक गंभीर होत चालली असून नवी मुंबईत फक्त कोपरखैराणेतच हिंदू दफनभूमी असून अन्य ठिकाणी हिंदू स्मशानभूमीतच लहान बालके दफन होतात, त्याच ठिकाणी वयस्क तसेच युवकांना दफन केले जात आहे.
नेरूळ सेक्टर 2 मध्ये शांतीधाम सारसोळेगाव स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत जुईनगर, नेरूळ पूर्व व पश्चिम आदी भागातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. ख्रिश्चन व मुस्लिम वगळता हिंदू धर्मातील सर्व घटकांवर या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात. याच ठिकाणी बाजूला हिंदू दफनभूमी आहे. पण ही दफनभूमी लहान बालकांकरताच आहे. हिंदू धर्मातील बंजारा, लिंगायत व आदिवासी समाजामध्ये मृतदेह दफन करण्याची पध्दत आहे. नवी मुंबईत हिंदूंची दफनभूमी फक्त कोपरखैराणेतच आहे. तथापि बंजारा, लिंगायत आणि आदिवासी समाजात कोणी मृत झाल्यास त्याचा मृतदेह कोपरखैराणे येथे घेवून न जाता त्या त्या भागातील स्थानिक स्मशानभूमीमध्ये दफन केले जातात. या स्मशानभूमीत फक्त लहान बालकांनाच दफन करण्याची परवानगी असल्याने वयस्क अथवा अन्य वयीन मृतदेहांना दफक करण्यास स्मशानभूमीतील कर्मचार्यांनी विरोध केल्यास व कोपरखैराणेतील दफनभूमीत मृतदेह घेवून जाण्याची सूचना केल्यास स्थानिक भागातील नगरसेवक अथवा राजकीय घटक दमदाटी करून त्याच ठिकाणी मृतदेह दफन करण्यास भाग पाडतात.
शांतीधाम सारसोळेगाव स्मशानभूमीच्या बाजूलाचा लिंगायत व बंजारा समाजाच्या दफनभूमीकरता सिडकोने भुखंड आरक्षित ठेवले होते. आज त्या भुखंडाच्या आरक्षणाबाबत काय झाले, याची तसदी कोणताही राजकीय घटक घेत नाही अथवा पुढाकार घेत नाही, हे आदिवासी, बंजारा व लिंगायत समाजाचे दुर्दैवंच म्हणावे लागेल. या स्मशानभूमीलाच लागून बंजारा समाजाच्या दफनभूमीकरता जागा सिडकोने आरक्षित ठेवली होती. सुरूवातीच्या काळात या भुखंडावर बंजारा समाजातील काही मृतदेहांना दफनही करण्यात आले होते. पुढे बंजारा व लिंगायत समाजाच्या दफनभूमीकरता कोणी पुढाकार न घेतल्याने या भुखंडाचे श्रीखंड भलत्याच कोणी लाटल्याची माहिती सिडकोतील काही लोकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. शांतीधाम सारसोळेगाव स्मशानभूमीलगतचाच भुखंड मुस्लिम व अन्य एका धर्मियांना विभागून देण्यात आला आहे. त्याच जागेवर बंजारा समाजाच्या दफनभूमीकरता भुखंड आरक्षित असल्याची माहिती स्मशानभूमीतील ग्रामपंचायतकालीन कर्मचार्यांकडून दिली जात आहे. स्मशानभूमीलगत मुस्लिम दफनभूमीच्यालगत लिंगायत समाजाच्या दफनभूमीकरता सिडकोने जागा आरक्षित ठेवली होती. पण आज या रिकाम्या जागेवर जंगली झाडे उगवलेली पहावयास मिळत आहे.
हिंदू धर्मियांत अंत्यविधीकरता मनपा प्रशासन लाकडे, रॉकेल व मीठ मोफत पुरविते, त्याचधर्तीवर हिंदू व अन्य समाजातील दफनविधीलाही खोदकाम व अन्य खर्च पुरविण्याची मनपा प्रशासनाने तयारी दर्शविली होती. त्याकरता निविदाही मागविली होती. तथापि आमच्या दफनभूमीमध्ये अन्य धर्मियांनी दफनविधीकरता खोदकाम केल्यास भावना दुखावल्या जातील असे मुस्लिमांकडून तत्कालीन काळात सांगण्यात आल्याने हा मदतीचा प्रश्न बारगळला तो कायमचाच. आज मृतदेहाचे दफन करताना मृताच्या नातलगांनाच हा खर्च करावा लागत आहे.
हिंदू दफनभूमीकरता कोपरखैराणे याच ठिकाणी व्यवस्था आहे. त्यामुळे तेथे मृतदेह दफनासाठी घेवून जाण्याऐवजी त्या त्या ठिकाणच्या स्मशानभूमीला प्राधान्य दिले जाते. एक मृतदेह दफन करण्यासाठी गेल्यास थोड्या खोदकामावर हाडे बाहेर येतात. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना भावनिक दु:ख होते. हिंदूच्या दफनाकरता जागेचा अभाव पाहता एकाच जागेवर मृतदेहाचे दफन करावे लागते. नेरूळ सेक्टर 2 मधील लिंगायत व बंजारा समाजाकरता आरक्षित असलेल्या जागेवर दफनभूमीची व्यवस्था केल्यास दफनभूमीची समस्या निकाली निघेल. ऐरोली विधानसभा मतदारसंघात हिंदू दफनभूमीकरता व्यवस्था आहे, मग बेलापुर विधानसभा मतदारसंघात ही हिंदू दफनभूमीकरता कोणी प्रयत्न करणार का नाही असा संतप्त सवाल बंजारा, लिंगायत व आदिवासी समाजाकडून उपस्थित केला जात आहे. बंजारा व लिंगायत समाजाच्या दफनभूमीकरता आरक्षित असलेल्या भुखंडाचे काय झाले याबाबतही आता गौडबंगाल निर्माण झाले आहे.
***************
पूर्वी स्वतंत्र दफनभूमी होती…
गेल्या 40 वर्षापासून आम्ही नवी मुंबईमध्ये निवासी वास्तव्य करत आहोत. पूर्वी हर्डिलिया कंपनीच्या जागेवर कुकशेत गाव होते. या गावामध्ये आदिवासी लिंगायत समाजाकरता स्वतंत्र दफनभूमी होती. परंतु हर्डिलिया कंपनीच्या आगमनानंतर आम्हाला नेरूळ सेक्टर 14 या परिसरात एमआयडीसीने वसविलेल्या नवीन मौजे कुकशेत गावात स्थंलातरीत करण्यात आले. जुन्या गावात दफनभूमी होती. परंतु पुर्नवसन करताना एमआयडीसीने दफनभूमीकरता कोणतीही स्वतंत्र व्यवस्था न केल्याने सारसोळेतील स्मशानभूमीतच आम्हाला आमच्या नातलगांना दफन करावे लागत आहे. सिडकोकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. लहान मुलांच्या जागेतच आम्हाला मृतदेहाचे नाईलाजास्तव दफन करावे लागत आहे.
– एकनाथ ठाकूर
कुकशेत