मुंबईत ७४० धोकादायक इमारती
मुंबई : पावसाळा आता उंबरठ्यावर आलेला असतानाच पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना लक्षात घेवून धोकादायक इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडीत करण्याचा मुंबई महापालिकेने निर्णय घेतला आहे. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक इमारतींमधील रहीवाशांना जबरदस्तीने सदनिका खाली करण्यास भाग पाडण्याकरताच मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेताना महापालिका प्रशासनाकडून मुंबईतील धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये मुंबई शहर व उपनगरातील ७४० इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या. यातील अधिकांश इमारती पावसाळ्यामध्ये कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या इमारतींमध्ये शासकीय, महापालिकेच्या तसेच खासगी इमारतींचाही समावेश आहे.
दक्षिण मुंबईतील डाकयार्ड रोडवरील बाबु गेनू मार्केटची इमारत दोन वर्षापूर्वी कोसळली. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली ७२ लोकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई मनपाने प्रथमच आक्रमक होत सावध पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मनपाने घोषित केलेल्या ७४० धोकादायक इमारतींमध्ये ३०८ इमारती या पश्चिम उपनगरातील आहेत आणि २८६ इमारती पूर्व उपनगरातील आहेत. मुंबई शहरातील धोकादायक इमारतींपैकी १४६ इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती मनपाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मनपा प्रशासनाने गेल्या वर्षी ५४२ इमारती धोकादायक घोषित केल्या होत्या. त्यातील अधिकांश इमारती पाडण्यात आल्या आहेत. यावर्षी घोषित केलेल्या धोकादायक इमारती लवकरच पालिका प्रशासनाकडून पाडण्यात येणार आहेत. मनपा प्रशासनाने सी-१ व सी-२ श्रेणीतील धोकादायक इमारती तात्काळ खाली करण्याच्या नोटीसा रहीवाशांना दिल्या आहेत. इमारत खाली न केल्यास व दुर्घटना झाल्यास त्या दुर्घटनेतील जिवित व वित्त हानीस महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचा इशारा महापालिकेने नोटीशीमध्ये दिला आहे.