सहकार्य करण्यास प्रशासनाची उदासिनता
मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मुंबईतील घाटकोपरमध्ये येवून दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी तरी त्यांना माफक सुविधाही प्रशासनाकडून अद्यापि उपलब्ध झालेल्या नाहीत. दुष्काळाने मारले आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले, त्यामुळे ‘आई जेवू घालिना अन् बाप भिक मागू देईना’ अशी अवस्था दुष्काळग्रस्तांची झालेली आहे. आजही
रोजगारासाठी, अस्तित्वासाठी, उपजिविका करण्यासाठी दुष्काळग्रस्तांना संघर्ष करावा लागत आहे. घाटकोपर येथील दत्ताजी साळवी मैदानावर गेल्या दोन महिन्याहून अधिक दिवस आपल्या परिवारासह दुष्काळग्रस्तांनी आश्रय घेतला आहे. ग्रामीण भागात तहानलेली जमिनच पाण्यासाठी आसूसलेली असल्याने ग्रामस्थांना कोठून चारा-पाणी मिळणार. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त आपल्या बायका-मुलांसह शहरी भागात आश्रयाला आले आहेत. मुंबईत आले तरी पोटापाण्यासाठी रोजगाराच्या शोधात रस्तोरस्ती, नाक्यानाक्यावर हे दुष्काळग्रस्त काम मागत फिरत आहेत. नांदेड जिल्ह्यातील जवळपास ४५० परिवार उघड्या मैदानावर राहूट्या बांधून असुविधांशी मैत्री करत आला दिवस ढकलत आहेत. अधिकांश दुष्काळग्रस्तांना उघड्यावरच झोपावे लागत आहे. महिलांना स्नानासाठी व शौचासाठी उघड्यावरच बसावे लागत आहे. पावसाळा आता उंबरठ्यावर येवून ठेपल्याने आता दुष्काळग्रस्तांनी आपापल्या गावी जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
काही दिवसापूर्वी १५० परिवारांना येथून ठाण्यात स्थंलातरीत करण्यात आले होते. परंतु त्या ठिकाणी काम न मिळाल्याने त्यातील काही परिवार पुन्हा घाटकोपर येथे आले. मराठवाड्यातील लोक यंदा दुष्काळामुळे मोठ्या संख्येने मुंबई शहर, उपनगर, ठाणे ग्रामीणमध्ये उपजिविकेकरता आले आहेत. मुंबईत आल्यावर रोजगार भेटेल, कमाईतून परिवाराची भूक भागविता येईल आणि थोडे फार पैसे घेवून गावी परत जाता येईल या आशेने मराठवाड्यातील मुखेड तालुक्यातील लोक मुंबईत आले. परंतु रोजगार तर लांबची गोष्ट राहीली, त्यांना मुंबईत पिण्याच्या पाण्याकरताही संघर्ष करावा लागला. महापालिका प्रशासन घाटकोपरमधील दुष्काळग्रस्तांना दररोज २ टॅकर पाणी पाठवून आपली जबाबदारी पार पाडत आहे. मनपाचे घाटकोपर एन विभागाचे सहाय्यक आयुक्त एस.एम.दुबेदी यांनी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या ठिकाणी पाहणी दौरा केला होता. दौऱ्यात त्यांनी दुष्काळग्रस्तांना सुविधा उपलब्ध करून देण्याकरता मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशही दिले होते. परंतु कोणत्याही सुविधा दुष्काळग्रस्तांना पुरविण्यात आल्या नाहीत. दुष्काळग्रस्त ज्या ठिकाणी आश्रय घेवून आहेत, त्या जागेची सफाईही करण्यात आली नाही.
जुन महिन्याच्या सुरूवातीच्या दहा-बारा दिवसानंतर पावसाला बऱ्यापैकी सुरुवात होत असल्याने त्या कालावधीत दुष्काळग्रस्त गावी जाण्याची तयारी करत आहेत. पावसाळ्यात गावी काम करायचे आणि उर्वरित कालावधीत मुंबईत येवून उपजिविका भागवायची असा क्रमच दुष्काळग्रस्तांचा बनलेला आहे. काही सामाजिक संस्थांनी व लोकप्रतिनिधींना दुष्काळग्रस्तांना मदत करण्यास पुढाकार घेतला आहे. खासदार किरिट सोमैय्या व स्थानिक नगरसेवक दिपक हांडे यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हातभार लावला आहे. छावणी मांडून खा. सोमैय्यांनी धान्य उपलब्ध करून दिले. नगरसेवक हांडे यांनी मैदानात वीज उपलब्ध करून दिली आहे. दररोज ८ ते १० वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून धान्य व अन्नही उपलब्ध करून दिले जात आहे.