अहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर (इ.स. 1725 ते इ.स. 1795) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या पदवीने संबोधित करण्यात येते. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे. घरचा आणि राज्याचा कारभार पाहण्यात हुशार असलेल्या अहिल्याबाई होळकरांचे साम्राज्य मध्यप्रदेशात असले तरी त्यांचा जन्म 31 ऑगस्ट 1725 रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. धनगर असलेले माणकोजी शिंदे-पाटील यांची अहिल्या नावाची ही मुलगी लहानपणापासूनच धाडसी होती. तसेच राज्यकर्त्यांना आवश्यक असणारे सर्व गुण तिच्याजवळ लहानपणापासूनच होते.
बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, 8 वर्षांच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर यांचे सन 1754 मध्ये, कुम्हेरच्या लढाईत निधन झाले. 12 वर्षांनंतर, तिचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. अहिल्यादेवीने आपल्या साम्राज्याचे तुंगांपासून रक्षण केले. त्यांनी लढाईत स्वत सैन्याचे नेतृत्व केले आणि अनेक लढाया जिंकल्या. त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. त्या न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या,परराज्याशी सलोख्याचे संबध रहावे म्हणून त्यांनी पंधरा राज्यात आपले वकील नेमले होते.इतर राज्यातील नऊ वकील होळकर राज्याच्या दरबारात होते. मातोश्री अहिल्याबाईंनी निर्माण केलेल्या प्रशासन व्यवस्थेत प्रजेची उन्नती व विकास, सामाजीक शांतता,सुव्यवस्था,समता व ममत्व,न्याय,स्वातंञ्य या मुलभूत मानवी मुल्यांचा प्रत्यक्ष आस्वाद त्या काळात जनता घेत होती,हे आजच्या प्रशासनाला फार मोठे आव्हान होते.
अहिल्यादेवी होळकर या होळकर घराण्याच्या. होळकर घराणे हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील सातारा जिह्यातील फलटण तालुक्यातील होळ या गावचे. घराण्याचे मूळपुरुष मल्हारराव होळकर यांना छत्रपतींनी माळवा प्रांताची सुभेदारी दिली. त्यांनी इंदौर संस्थानाची स्थापना केली. याच घराण्यातील पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वतचे राज्य स्वबळावर मिळवून राज्यभिषेक करून घेणारा एकमेव राजा `महाराजा यशवंतराजे होळकर’. तसेच भारतामध्ये रेल्वे चालू करण्यासाठी ब्रिटीशांना कर्ज देणारे तुकोजीराजे होळकर हे याच घराण्यातले. दिल्लीतील `रायसीना’ हा भूभाग होळकरांच्या अधिपत्याखाली होता. याच रायसीना ग्राममध्ये `होळकर उद्यान’ होते. आज याच `रायसीना होळकर इस्टेट’मध्ये आपल्या देशाचे राष्ट्रपती भवन, संसद भवन, केंद्रीय सचिवालय आदी भव्य वास्तू दिमाखाने उभ्या आहेत. प्रजासत्ताक दिनादिवशी राष्ट्रपती भवनावरती `होळकरांचा राजेशाही झेंडा’ डौलाने फडकतो. तसेच राष्ट्रपतींच्या आगमन प्रसंगी प्रथम येणारे घोडदळ होळकरांचा राजेशाही झेंडा डौलाने मिरवत आणते. होळकरशाहीचे एकूण 220 वर्षे 22 दिवस राज्य होते. या दरम्यान होळकर घराण्याचे महापराक्रमी, रणझुंजार, शूर दानशूर, कर्तव्यतत्पर, रणसम्राट 14 राजे-महाराजे होऊन गेले. आणि त्यानंतर 16 जून 1948 साली होळकरशाहीचे भारत देशात विलीनीकरण झाले.
मराठ्यांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्याबाईंचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. माळवा प्रांताचा कारभार त्यांनी बांधला. त्या मल्हारराव होळकरांच्या सून होत. मुलाचे मृत्यूनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकाळात सती परंपरा व हुंडाबळी परंपरा बंद केल्या. स्त्री असूनही तिच्यात अहंकाराची भावना मुळीच नव्हती. विलक्षण धर्मवेडा बरोबरच त्यांच्यात परधर्म सहिष्णुता होती. पराकाष्ठेचा धर्मभोळेपणा असूनही आपल्या प्रजेच्या कल्याणाखेरीज दुसरे विचार मनाला शिवू दिले नाहीत.
जगात राण्या-महाराण्या झाल्या असल्या तरी त्या शेवटी कर्तृत्वाने म्हणा कि कोणा महाराजाची पत्नी होती म्हणून म्हणा प्रसिद्ध आहेत आणि त्या इतिहासावर स्वतःचा असा स्वतंत्र ठसा उमटवू शकलेल्या नाहीत. याला जगात अपवाद असणारी एकमेव महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. यात कसलीही अतिशयोक्ती नाही. होळकर घराण्याचा कट्टर शत्रू माल्कम आपल्या मध्यप्रदेशातील आठवणींत म्हणतो, `सर्व प्रकारच्या मर्यादा पेशव्यांपासून ते हिंदू सनातन्यांनी घातलेल्या असूनही अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने 28 वर्षे प्रजेच्या हिताचे उत्कृष्ट प्रशासन केले त्याला जगात तोड सापडणार नाही. माळव्यातीलच नव्हे तर जिथे तिचा प्रत्यक्ष कारभारही नव्हता अशा हिंदुस्थानातील सर्वच प्रजा तिला दैवी अवतार मानायची. याचे कारण म्हणजे अहिल्याबाईंची प्रजानिष्ठा, आत्मशुद्धता आणि सर्वांच्या कल्याणासाठीची अविरत धडपड होय!’
अहिल्यादेवी होळकर यांनी भारतभरात अनेक मंदिरे, घाट बांधले वा त्यांचा जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यात द्वारका, गुजरात, काशी, वाराणसी, उज्जैन, जगन्नाथपुरी, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, बद्रीकेदार, नाशिक व परळी वैजनाथ, जेजुरी खंडोबा तसेच अनेक जोतिर्लिंग यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. त्यांच्या स्मरणार्थ, इंदौर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या `कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट’ म्हणून ओळखतात. (1725 – 1795, राज्यकालावधी 1767-1795). अहिल्यादेवी होळकर ह्या भारताची, माळवा साम्राज्याची, होळकर घराण्याची तत्वज्ञानी राणी म्हणून ओळखली जाते
अशा थोर समाजसुधारक, प्रजानिष्ठा, उत्कृष्ठ प्रशासन, तत्वज्ञानी, शूर, दानशूर, महापराक्रमी, महाराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी अभिवादन !