लाल बसेस होणार इतिहासजमा
मुंबई : मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या बेस्टच्या बसेसचे अस्तित्व संकटात आले आहे. दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही रेड आणि ब्ल्यू लाईन बसेस धावताना पहावयास मिळणार आहेत. तोट्याशी संघर्ष करणाऱ्या बेस्टच्या उपक्रमाने मोठ्या संख्येने खासगी बसेस आपल्या ताफ्यात समाविष्ठ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खासगी बस व्यवस्थापणाला सरकारकडून परवाने देण्यात येणार आहेत. यामुळे येत्या काळात बेस्टच्या बसेस आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१६-१७ चे अर्थसंकल्प सादर करताना मोठ्या शहरांमध्ये खासगी बस व्यवस्थापणाला परवाने देण्याची घोषणा केली होती. काही खासगी बसेसच्या व्यवस्थापणाने मुंबईतील विविध मार्गावर वातानुकूलित बसेस चालविण्याकरता स्वारस्य दाखविले आहे. काही खासगी कंपन्यांनी आपल्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांकरता कार्यालयात येण्याकरता व कार्यालयातून घरी सोडण्याकरता खासगी बससेवा उपलब्ध करून देण्यास सुरूवात केलेली आहे.
अशियातील सर्वश्रेष्ठ परिवहन सेवा देणाऱ्या बेस्टच्या बसेसने गौरवशाली इतिहास आपल्या सुविधेतून निर्माण केला आहे. देशाच्या अन्य राज्यातील तसेच महाराष्ट्रातील विविध भागातील मुंबईत येणाऱ्याला पूर्वी मुंबईतील बेस्टच्या डबलडेकर बसमध्ये बसायची इच्छा असायची. हळुहळू मुंबईतल्या बेस्टच्या डेपोतूनच नाही तर बेस्टच्या ताफ्यातून डबलडेकर बस नाहीशा झाल्या. बेस्टच्या ताफ्यात सध्या १२५ डबलडेकर बसेस शिल्लक राहील्या असल्या तरी त्या खुप जुन्या असून वापरातही नाहीत. प्रशासन आता डबलडेकर बस खरेदी करण्याच्या सध्या तरी विचारात नाही.
बसच्या ताफ्यामध्ये सध्या ७०० बसेसचा तुटवडा आहे. सद्य:स्थितीत बेस्टच्या ताफ्यात ४०४७ बसेस असून ५०२ मार्गावर सध्या बेस्टच्या बसेस धावत आहेत. या वर्षी बेस्टने ३०३ नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बसेस ताफ्यामध्ये दाखल होण्यास एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बेस्टने दीडशे बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. खासगी बसेसवर फक्त बेस्टचा वाहक असणार आहे. चालक, इंधन व देखभाल आदी जबाबदारी खासगी बसमालकांची राहणार असून दर किलोमीटरच्या हिशोबाने बेस्ट उपक्रम त्यांना पैसे देणार आहे.
खासगी बसेस भाडे तत्वावर घेतल्याने फायदाच होणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात येत आहे. देखभाल खर्च शून्य असणार आहे. बस मालकांना प्रती किलोमीटर ३७ ते ३८ रूपये भाडे देण्यात येणार आहे. साधारणपणे बेस्टच्या बसेस दररोज १८० ते २०० किलोमीटर धावत असतात. यापूर्वीही बेस्टने भाड्याने बसेस घेण्याची तयारी दर्शविली होती. पण बेस्ट समितीकडून मान्यता न मिळाल्याने ही योजना बारगळली होती.