शिवसेना या चार शब्दावर जीव ओवाळून लाखो शिवसैनिक देशाच्या कानाकोपर्यात आपणास पहावयास मिळतील. एकेकाळी महाराष्ट्रापुरतीच सिमित असणारी शिवसेना आज देशाच्या कानाकोपर्यात परिचित आहे. १९ जुन १९६६ रोजी हिंदूत्वाला आपले उभे आयुष्य समर्पित केलेल्या बाळासाहेब ठाकरे या एका झंझावाती वादळाने शिवसेनेची स्थापना केली. शनिवार, दि. १९ जुन २०१६ रोजी या घटनेला ५० वर्ष पूर्ण होत आहे. राजकारणात शिवसेनेला फारसे यश मिळाले नसले तरी समाजकारणाच्या क्षेत्रात शिवसेना अन्य राजकीय, राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत, हिंदूत्ववादी संघटनांच्या तुलनेत अग्रस्थानी आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे समीकरण आजही जोपासणार्या शिवसेनेला व शिवसैनिकांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लोक वेगळ्या नजरेतून पाहत आहे.
मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती व्हावी, मुंबई ही महाराष्ट्रातच राहीली पाहिजे यासाठी लढा उभारला गेला. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. परंतु मुंबई महाराष्ट्रात राहीली असली तरी मराठी माणूस मात्र मुंबईतून हळूहळू हद्दपार व्हायला लागला होता. ज्या मुंबईसाठी मराठी माणसांने संघर्ष केला, त्याच मुंबईत मराठी माणसाला त्या काळातही अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत होता. मराठी माणसाला रोजगारासाठी संघर्ष करावा लागत होता. गुजराथी व दाक्षिणात्य लोक व्यवसाय व रोजगारासाठी मुंबईत अग्रस्थानी असताना मराठी माणूस मात्र रोजगाराच्या स्पर्धेत मागे फेकला जात होता. अशा वेळी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, मराठी माणसाच्या रोजगारासाठी, मराठी माणसाच्या मुंबईतील अस्तित्वासाठी बाळ ठाकरे नावाच्या एका वादळाने शिवसेनेची स्थापना केली. बाळ ठाकरे पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे झाले. नोकरीमध्ये दाक्षिणात्यांचे वाढते प्राबल्य पाहून ‘बजाव पुंगी अन् हटाव लुंगी’ नारा देत मराठी माणसाला मुंबईत रोजगार भेटलाच पाहिजे याकरता शिवसेना सक्रिय झाली.
शिवसेना स्थापनेनंतर दोन वर्षामध्ये ठाण्याचा नगराध्यक्ष शिवसेनेचा झाला. ठाण्याने शिवसेनेला स्थापनेपासूनच भरभरून दिलेले आहे. ठाणे आणि शिवसेना हे नाते एक वेगळेच झाले. निवडणूकांच्या भाषणातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, ‘माझे ठाणे मला कधी दगा देणार नाही’. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत व हयातीनंतरही ठाणेकरांनी शिवसेनेला कधीही अंतर दिले नाही. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केल्यावर सुरूवातीच्या काळात मनोहर जोशी, सुधीर जोशी, धर्मवीर आनंद दिघे, वामनराव महाडीक, प्रमोद नवलकर, सुभाष देसाई, साबिर शेख, दत्ताजी नलावडे, छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, दिवाकर रावते अशा अनेक बिन्नीच्या शिलेदारांनी शिवसेना वाढीसाठी जिवाचे रान केले. सुरूवातीच्या काळात शिवसेना ही फक्त शहरी भागापुरतीच मर्यादीत होती. मुंबई, मुंबईची उपनगरे, ठाणे व सभोवतलाचा परिसर इतपतच सिमित शिवसेनेची ओळख होती. ‘गाव तेथे शाखा’ हे शिवसेनेच्या बाबतीत शिवसेनाप्रमुखांनी स्वप्न बाळगले होते. ही महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचे अधिकाधिक श्रेय हे छगन भुजबळांकडे व त्यापाठोपाठ नारायण राणे यांच्याकडे जाते. भुजबळांनी गावागावात शिवसेना नेली, नारायण राणेंनी कोकण शिवसेनामय केला, ठाणे जिल्ह्यात धर्मवीर आनंद दिघेंमुळे शिवसेनेचा दरारा वाढला.
नगरपालिका व महानगरपालिका निवडणूकीत शिवसेनेला यशाची व सत्तेची चव लवकरच चाखावयास मिळाली असली तरी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत शिवसेना यशस्वी ठरली नाही. मराठीचा मुद्दा घेवून राजकीय क्षेत्रात भरारी मारण्यास मर्यादा पडतील, हे ओळखून शिवसेनेने हिंदूत्वाची कास धरली.
१९८५च्या विधानसभा निवडणूकीपर्यत खिजगणतीत नसलेल्या शिवसेनेने १९९०च्या निवडणूकीत भाजपाशी हिंदूत्वाच्या मुद्यावर जवळीक साधत युती केली. प्रथमच या निवडणूकीत शिवसेनेचे ५२ आमदार निवडून आले. १९९५ साली झालेल्या निवडणूकीत शिवसेना सत्तेवर आली. ७३ आमदार शिवसेनेचे व ६२ आमदार भाजपाचे निवडून आले. अपक्षांची मोट बांधत शिवसेना-भाजपा सत्तेवर आली. पण १९९०-९५च्या काळात शिवसेनेला एक मोठा राजकीय हादरा बसला. शिवसेनेसाठी जीवाचे रान करणारे व मातोश्रीचे लाडके असणारे छगन भुजबळ शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून कॉंग्रेसच्या छावणीत दाखल झाले. शिवसेना सत्तेवर आली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी प्रथमच मनोहर जोशींच्या माध्यमातून राज्याला ब्राम्हण मुख्यमंत्री दिला. त्यानंतर नारायण राणेंकडे मुख्यमंत्रीपद सोपवित शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेत तळागाळातल्या शिवसैनिकाला न्याय मिळतो हा संदेश संघटनात्मक पातळीवर सर्वांना दिला.
लोकसभा निवडणूका लागल्यावर वाजपेयी सरकारची लोकप्रियता कॅश करण्यासाठी लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय शिवसेना-भाजपाच्या तत्कालीन शिवशाही सरकारने घेतला. सहा महिने बाकी असतानाच सरकार विसर्जित करण्याचा हा निर्णय आत्मघातकी ठरला. कॉंग्रेसचे सरकार त्यानंतर आले. शिवसेना-भाजपाला विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरावे लागले. शिवसेनेच्या यशाला ओहोटी लागल्यावर भाजपाने खरे रंग दाखविण्यास सुरूवात केली. एकेकाळी धाकट्या भावाच्या भूमिकेत वावरणार्या भाजपाने आपली वाट वेगळी करण्यास सुरूवात केली. विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची तत्परता भाजपाने दाखविली, ही खरे तर शिवसेनेसाठी धोक्याची घंटा होती. राज ठाकरे यांनीही मधल्या काळात शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून वेगळी चूल मांडली.
शिवसेनाप्रमुखांचे निधन झाले आिंण शिवसैनिकांसह शिवसेना पोरकी झाली. मागील विधानसभा निवडणूकीत भाजपाने वेगळा सवतासुभा केला. मोदी लाटेचे वारे जोरदार वाहत असल्याने भाजपाने निवडणूकीत युती केली नाही. शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा यांच्याशी एकाकी झुंज देत ६३ आमदार निवडून आणले.
अन्य पक्ष आणि शिवसेना यामध्ये पक्षातर्ंगत पातळीवर जमिन आसमानचा फरक आहे. अन्य पक्षाचे कार्यकर्ते त्या त्या पक्षाशी निष्ठावंत नसतील, इतके कट्टर व कडवट शिवसैनिक शिवसेनेशी प्रामाणिक असतात. शिवसेनेच्या भगव्याशी आणि शिवसेनेच्या ‘जय महाराष्ट्र’ या परवलीच्या शब्दाशी ते निष्ठावंत असतात. पक्षावर श्रध्दा ठेवून शिवसेनाप्रमुखांना शिवसैनिक देव मानतात. शिवसेना संघटनेची ५० वर्ष आता १९ जूनला पूर्ण होतील. शिवसेनेचे रोपटे लावणारे शिवसेनाप्रमुख शिवसैनिकांना अनाथ करून स्वर्गलोकी निघून गेले आहेत. शिवसेनेने या वाटचालीत अनेक खस्ता खाल्या आहेत. विश्वासघाताचे वार पचविले आहेत. बाबरी मस्जिद पडल्यावर देशपातळीवर अनेक मोठ्या नेत्यांनी पलायनवादी भूमिका घेतली असताना ‘बाबरी मस्जिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे, अशी भूमिका घेणारे फक्त आणि फक्त शिवसेनाप्रमुखच एकमेवाद्वितीय होते. जातीय दंगलींनी मुंबईच्या कानाकोपर्यात विध्वंस घडत असताना राधाबाई चाळीच्या जळीत कांडानंतर शिवसेनेच्या सक्रियतेने मुंबईत मराठी पर्यायाने हिंदू माणूस जिवंत राहीला. मुंबईकरांचा आजही शिवसेनेवर विश्वास आहे. कोणतेही संकट येवो, संकटाची पर्वा न करता जनतेला दिलासा देण्यासाठी मदतीला सर्वप्रथम धावून येणारा शिवसैनिकच असतो, हे महाराष्ट्राला एव्हाना समजून उमजून चुकले आहे. राजकारणातही राहूनही समाजकारणी चेहरा शिवसेनेने आपल्या कृतीतून आजवर जोपासला आहे