- मुंबई : मुंबईत अनेक ठिकाणी बेकायदा दुमजली झोपड्या उभ्या राहिल्या आहेत़ अशा बांधकामांमुळे एखाद्या दुर्घटनेत निष्पाप जिवांचा बळी जाऊ शकतो़ जुहू गल्लीतील आगीच्या दुर्घटनेतून ही बाब उजेडात आल्यानंतर मुंबईत सर्व १४ फुटांहून उंच झोपड्यांवर पावसाळ्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजय मेहता यांनी घेतला आहे़ निवडणुकीचा काळ असल्याने या कारवाईत राजकीय पक्षांकडून अडथळा आल्यास त्यांच्यावरही उचित कारवाईचे संकेत पालिकेने दिले आहेत़
- झोपड्यांना १४ फुटांपर्यंत उंची वाढविण्याची परवानगी आहे़ मात्र अनेक ठिकाणी उंचीची मर्यादा ओलांडण्यात आली असल्याचे समोर आले आहे़ आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या जुहू गल्लीतील मेडिकल स्टोअरवरील गच्चीही बेकायदा होती़ या दुर्घटनेत नऊ जणांचा दुर्दैवी अंत झाला़ याची गंभीर दखल पालिकेच्या मासिक बैठकीत शनिवारी घेण्यात आली़ १४ फुटांहून उंच झोपड्यांची यादी तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व साहाय्यक आयुक्तांना या वेळी दिले़
पावसाळ्यातील चार महिने बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येत नाही़ त्यामुळे ही सर्व यादी या काळात तयार ठेवावी़ या झोपड्यांवर आॅक्टोबरमध्ये कारवाई करण्यात येणार आहे़ ही कारवाईत अडथळा आणणाऱ्यांच्या नावांची नोंद घेऊन त्याचा अहवाल तयार करण्याची सूचनाही आयुक्तांनी २४ विभाग कार्यालयांच्या साहाय्यक आयुक्तांना केली़
पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने व्होट बँक म्हणजे झोपड्यांवर कारवाईस राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध होणार हे निश्चित आहे़ त्यामुळे असा विरोध करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांच्या नावांची नोंद घेऊन त्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत़