मुंबई : शहरात गेले काही वर्षे पाऊस कमी पडत असल्याने शहरात पुनर्बांधणी करण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये सन २००७ पासून रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्याचा नियम मुंबई महानगरपालिकेने केला आहे. परंतु, गेल्या ९ वर्षात शहरात झालेल्या पुनर्बाधनीत इमारतीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यास बिल्डरांनी दुर्लक्ष केल्याचे पालिकेने दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. अशा इमारतींना यापुढे नोटीस बजावण्यात येईल, असा खुलासा पालिकेने आता केला आहे.
मुंबईमध्ये कित्तेक वर्षे पाऊस कमी पडत असल्याने ५०० चौरस मिटरपेक्षा जास्त आकारमानाच्या भूखंडावर ज्या इमारतीची पुनर्बाधणी करण्यात येईल, अशा सर्व इमारतीत रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्यात आले होते. मुंबईमध्ये इमारतींची पुनर्बांधणी जोरात सुरु असताना रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यास मात्र टाळाटाळ होते. ही परिस्थिती लक्षात येताच तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांनी २०१३-१४ मध्ये मुंबईत ५५ हजाराहून अधिक इमारती उभा राहिल्या असताना रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवलेला नाही. याबाबत खरी परिस्थिती लोकांसमोर आणण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. परंतू प्रशासनाने अद्यापही रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष केले आहे.
शहरात पाऊस कमी पडत असल्याने पाणी कपात लागू आहे. धरणातही पाणीसाठा समाधानकारक नसल्याने रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प का राबवले जात नाहीत? पालिका असे प्रकल्प न राबवनाऱ्या बिल्डरवर इमारतीवर काय कारवाई केली? रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या श्वेतपत्रिकेचे काय झाले? अशा प्रश्नांची सरबत्ती केल्यावर मुंबईत शहरात ८० पूर्व उपनगरात ६०० तर पश्चिम उपनगरात २,६०० इमारतीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात आला आहे. मुंबईमध्ये ५०० चौरस मिटरपेक्षा जास्त भुखंडावर पुनर्बांधणी करण्यात आलेल्या इमारती नेमक्या किती, याची आकडेवारी पाहावी लागेल. जर अशा काही इमारती असल्यास त्यावर पालिका नोटीस बजावून कारवाई करेल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी दिली.