कोपरखैरणे : प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक यांच्या एकत्रित सहयोगातूनच प्रगतीशील शहर निर्मिती होते असे सांगत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या अभिनव उपक्रमांतर्गत आज सेक्टर 14, कोपरखैरणे येथील जूनी क्षेपणभूमी शास्त्रोक्तरीत्या बंद करून त्याठिकाणी महानगरपालिकेने विकसित केलेल्या निसर्गोद्यानात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांशी सुसंवाद साधला.
प्रारंभी नागरिकांसोबत मॉर्निंग वॉक करत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी नागरिकांची निवेदने स्विकारली व त्यांचे म्हणणे जाणून घेतले. नागरिकांनी केलेल्या तक्रारी / सूचनांवर लगेच 7 ते 15 दिवसांत कार्यवाही करण्याचे व संबंधितांना तसे कळविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले व त्यामधील धोरणात्मक बाबींविषयी कामाची आवश्यकता लक्षात घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर नागरिकांच्या दृष्टीकोनातून शहर बघण्यासाठी हा थेट भेटीचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम सुरु केला असे सांगत आयुक्तांनी या भेटीतून नागरिकांच्या अपेक्षा व सूचना जाणून घेता येतात व त्याचा उपयोग शहर विकासासाठी होतो असे सांगितले.
कोपरखैरणे येथील अनेक नागरिकांनी आजच्या भेटीत विशेषत्वाने पार्कींग अडचणींविषयी आपले म्हणणे मांडले. शहरातील पार्कींगविषयी वाहतूक पोलीस विभागाशी समन्वय साधून सम-विषम तारखेस पार्कींग करणे, पार्कींगच्या जागा ठरविणे अशा विविध प्रकारे नियोजन करण्यात येत असून याकरीता नागरिकांनीही वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले.
ज्याप्रमाणे नागरिकांच्या महापालिका, पोलीस अशा प्राधिकरणांकडून अपेक्षा असतात त्याचप्रमाणे नागरिकांनीही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपला दैनंदिन व्यवहार ठेवल्यास नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर व अत्याधुनिक बनायला वेळ लागणार नाही. प्रत्येक नागरिकाला135 लीटर प्रतिदिन प्रमाणे पाणीपुरवठा करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत व त्याप्रमाणे सोसायटीला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यानुसार सोसायटीनेही आपल्या सभासदांमध्ये पाण्याचे योग्य नियोजन करावे म्हणजे अडचण भासणार नाही असे ते म्हणाले.
त्याचप्रमाणे नागरिकांनी आपल्या घरातच कचरा ओला व सुका असा वेगवेगळा ठेवावा आणि सोसायट्यांनीही तसाच वेगवेगळ्या स्वरुपात महानगरपालिकेकडे द्यावा ही भूमिका स्पष्ट करीत आयुक्तांनी यासाठी महानगरपालिकेमार्फत दोन महिन्यांपासून सोसायट्यांमध्ये विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे असे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी आपण निर्माण करीत असलेला कचरा नियमानुसार ओला व सुका असा वेगवेगळा ठेवावा व ओला कचरा देताना प्लास्टीक पिशव्यांचा वापर करु नये असे आवाहन त्यांनी पुन्हा एकवार केले. काही नागरिकांनी मांस, मासळी यांचा ओला कचरा प्लास्टीक पिशवीशिवाय घरात ठेवल्यास दुर्गंधी येते असे मत मांडले आहे यावर भाष्य करताना आयुक्तांनी अशाप्रकारचा ओला कचरा घरात न ठेवता तो लगेच सोसायटीच्या ओल्या कच-यासाठी दिलेल्या कचरा कुंडीत टाकावा म्हणजे हा प्रश्न निकाली निघेल अशी उपाययोजना सुचविली. तथापि सोसायट्यांनी ओला व सुका असा वर्गीकृत कचरा देणे अनिवार्य आहे अन्यथा कचरा उचलण्यात येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले.
शहर विकासातील नागरिक हा सर्वात महत्वाचा भाग आहेत, त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता कर, स्थानिक संस्था कर, पाणीपट्टी असे कर नियमित व वेळेवर भरणा केले तर त्या करांमधून महापालिकेला प्राप्त होणा-या उत्पन्नातून नागरिकांनाच दर्जेदार सुविधा पुरविणे शक्य होईल असे ते म्हणाले. यापुढील काळात नागरिकांची महापालिकेकडे असलेली कामे विभाग पातळीवरच मार्गी लागावीत, त्यांना मुख्यालयापर्यंत येण्याची गरज पडू नये यादृष्टीने विभाग कार्यालयांच्या सक्षमीकरणावर भर दिला असून विविध सुविधा ऑनलाईन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही सुरु आहे. महानगरपालिका याकरीता मोबाईल ॲप विकसित करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अनधिकृत इमारतीत घर घेऊन फसवणूक होण्यापेक्षा घर घेण्यापुर्वीच नागरिकांनी त्याची अधिकृतता तपासून पहावी, त्यासाठी महानगरपालिकेतून आवश्यक माहिती घ्यावी असे ते म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामावर कारवाई केले जात असल्याचे स्पष्ट करीत इतर अनधिकृत बांधकामांप्रमाणेच गावठांणातील पूर्वीच्या नाही तर जानेवारी 2013 नंतरच्या विनापरवानगी सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई महानगरपालिकामार्फत केल्या जाणा-या नागरी सुविधा कामांची आवश्यकता लक्षात घेऊन तसेच त्यांची तांत्रिक व आर्थिक पडताळणी करूनच कामे हाती घेतली जातील असे त्यांनी सांगितले.
एक उत्तम उपक्रम सुरु केल्याबद्दल याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या नागरिकांपैकी अनेक जणांनी उत्साहाने हस्तांदोलन करीत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांचे अभिनंदन केले, आभार मानले.