* प्रकल्पग्रस्तांसाठी मनसेची लवकरच मंत्रालय व वर्षा बंगल्यावर धडक
* प्रकल्पग्रस्तांकरता मनसेच्या गजानन काळेंना सरकारला इशारा
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकारने सातत्याने उदासीनता दाखविल्यामुळे सिडको व मनपा प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांवर हातोडा चालविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी होणार्या नवी मुंबई बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबईने जाहीर पाठींबा दर्शविला आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांची भूमिका तांत्रिक दृष्ट्या जरी बरोबर असली तरी प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर हे नवी मुंबई शहर उभे आहे. त्यामुळे त्यांच्या गरजेपोटी घरांच्या संदर्भात आयुक्तांनी सहानुभूती पूर्वक विचार करून न्यायी भूमिका घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
सातत्याने गेली पंधरा ते वीस वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीने व आता भाजपा-शिवसेनेने मतांसाठी प्रकल्पग्रस्तांच्या घराचा प्रश्न भिजत ठेवला असून, स्वयंघोषित प्रकल्पग्रस्त नेत्यांच्या कचखाऊपणामुळे आजही हा प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मुळातच सिडको व मनपाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर राज्य सरकारकडे फक्त दिखाऊपणाचा पाठपुरावा करणार्या या नेत्यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाशी काहीही देणे घेणे नाही असेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रश्नावर आक्रमक होणार असून, दहा दिवसांत शासन निर्णय आणण्याची दर्पोक्ती करणार्या व सत्कार सोहळे करणार्या नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाचे राजकारण थांबवावे असेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निलेश बाणखेले, ऍड. कौस्तुभ मोरे, नितीन चव्हाण यांनी म्हटले आहे.
येत्या काही दिवसांत प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याच्या प्रश्नावर शासन निर्णय न झाल्यास मुख्यमंत्री व राज्य सरकारच्या एकाही मंत्र्याचा जाहीर कार्यक्रम नवी मुंबईत होऊ देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सविनय म्हात्रे यांनी दिला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या प्रश्नासंदर्भात सिडको व मनपाशी संघर्ष करण्यापेक्षा यापुढच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंत्रालय व मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडकेल असा गर्भित इशारा मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे.