अनंतकुमार गवई
नवी मुंबईः पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यात येत असून, विशेष प्रतिबंधात्मक मोहिमा राबविण्यात येत आहेत. जून महिना हिवताप प्रतिरोध महिना या संकल्पने अंतर्गत जनजागृती मोहिमेमध्ये जून-२०१६ या कालावधीत हिवताप/डेंग्यु जनजागरणाची ८४ शिबीरे, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींचे प्रशिक्षणसत्र, सोसायटी सभा इत्यादी ठिकाणी आयोजित करुन ३३७५ रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तसेच १२३६२ हस्तपत्रके आणि १२४७६ पोस्टर्स यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय जुलै महिना डेंग्यु प्रतिरोध महिना या संकल्पने अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जनजागृती शिबीरे, महाविद्यालये प्रशिक्षण, चर्चासत्र, पोस्टर्स लावणे आणि हस्तपत्रक वाटणे इत्यादीव्दारे नागरिकांना आरोग्य शिक्षण दिले जात आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जानेवारी-२०१६ ते १८ जुलै २०१६ पर्यंत हिवताप आजाराचे एकुण ८५ रुग्ण आढळले असून, डेंग्यु सदृश्य एकुण ६४ संशयीत रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३ रुग्णांना डेंग्यु झाल्याची तपासणीअंती खात्री झाली. त्यावर उपाययोजना करण्यात आली. या अनुषंगाने सर्वच रुग्णांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिका आरोग्य विभागामार्फत सर्वप्रकारची रुग्णसंशोधन कार्यवाही करण्यात आलेलीआहे.
याबाबतच्या विशेष मोहिमेमध्ये ‘घरांतर्गत डास उत्पत्ती शोध मोहिम’ घेण्यात आली होती. या मोहिमेत २०,३२० नागरिकांनी गृहभेटीस परवानगी दिल्याने त्यांच्या घरांमध्ये वरची टाकी, खालची टाकी, लॉफ्ट टँक, ड्रम, टायर्स, कुंड्या इत्यादी ५०,३११ इतकी डास उत्पत्ती संभाव्य स्थानांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आढळून आलेल्या ३४४ दुषित स्थानांपैकी सर्वच्या सर्व स्थाने नष्ट करण्यात आली आहेत. महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व महापालिका, खाजगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये महापालिका आरोग्य विभागामार्फत डासनाशक फवारणी करण्यात आली आहे.
डासांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि हिवतापाचे संक्रमण होणार नाही याकरीता नागरिकांनी आपले घर, कार्यालय आणि परिसरात पाणी साचून राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. गच्चीवरील आणि घरांतर्गत असलेले भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे, उघड्यावरील टायर्स असे अनावश्यक पडलेले साहित्य नष्ट करावे. फुलदाण्या, ट्रे,फेंगशुई यामध्ये साचलेले पाणी आठवड्यातून एकदा बदलावे. घरामधील आणि घराबाहेरील पाणी साठविण्याचे ड्रम, टाक्या, भांडी आठवड्यातून एकदा पूर्णपणे कोरडे करावे. शक्य झाल्यास डास प्रतिबंधात्मक मच्छरदाणीचा वापर करावा. फ्रिजचा डिस्फ्रॉस्ट ट्रे तसेच एसी डक्ट मध्ये साचलेले पाणी नियमीत काढून टाकावे. आपल्या घरी येणार्या आरोग्य कर्मचार्यांमार्फत तसेच महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये दवाखान्यांत सर्व प्रकारच्या तापाच्या रुग्णांची मोफत रक्त तपासणी करून घ्यावी. रुग्ण संशोधन कार्यवाहीसाठी आपल्या घरी येणार्या आरोग्य कर्मचार्यास तसेच फवारणी कामगारांस सहकार्य करावे. पावसाळी कालावधीतील डासांचे संभाव्य वाढते प्रमाण लक्षात घेऊन डासांच्या उत्पतीवरील प्रतिबंधासाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेऊन महापालिका आरोग्य विभागास सहकार्य करावे. आपल्या घर, परिसरात हिवताप/डेंगी आजाराचा प्रादुर्भाव आढळल्यास अथवा डासांचा प्रादुर्भाव दिसल्यास नजिकच्या महापालिका आरोग्य केंद्राशी वा नवी मुंबई महापालिका रुग्णालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.