460 शाळांमधील 2 लाखांहून अधिक विद्यार्थी ओला-सुका कचरा वर्गीकरणाचा संदेश प्रसारीत करणार
नवी मुंबई : नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ओला व सुका कचरा घरातच वेगळा करून हे मी माझ्या चांगल्या आरोग्यपूर्ण जीवनासाठी करीत आहे हे समजून वैयक्तिक स्वच्छतेसोबतच सामाजिक स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे हे जाणले पाहिजे आणि स्वत:पासूनच स्वच्छतेची सुरुवात केली पाहिजे अशा शब्दात उपस्थित शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य व उप मुख्याध्यापकांशी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुसंवाद साधत शाळा-शाळांतील विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या घराघरात व सोसायट्यांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचा संदेश पोहचविणारी “क्लिनलीनेससोल्जर” ही संकल्पना सर्वांच्या सहयोगाने राबविण्याचे सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सानपाडा सेक्टर 15 येथील साधू वासवानी इंटरनॅशनल स्कुलच्या सहयोगाने शाळेच्या सभागृहात संपन्न झालेल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी व महापालिका शाळांतील मुख्याध्यापक, प्राचार्य व उप मुख्याध्यापक यांच्या घनकचरा व्यवस्थापन विषयक कार्यशाळेप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार, परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ.अंबरिश पटनिगिरे, ई.टी.सी. केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, महापालिका शिक्षणाधिकारी संदिप संगवे, साधू वासवानी इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्य श्रीम. मंगला चंद्रशेखर व इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई शहरात 6 हजार 300 पेक्षा जास्त सोसायट्या असून एका सोसायटीत किमान 4 ते 5 मुले विविध शाळांमध्ये शिकणारी असतात. या विद्यार्थ्यांना जर ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून दिले आणि त्यांच्यामार्फत शाळेमध्ये याप्रकारचे वर्गीकरण सुरु केले आणि त्यांच्या घरात व शेजारी हा संदेश घराघरात पोहचला तर निश्चितच स्वच्छतेची व कचरा वर्गीकरणाची सवय सर्वांना लागेल आणि यामधून या कामाला गती येईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांचा कचरा वर्गीकरण आणि स्वच्छता या गोष्टींमध्ये सक्रीय सहभाग त्यांच्या पालकांना व सोसायटीतील नागरिकांना निश्चितच प्रोत्साहक ठरेल व घराघरातील तसेच सोसायटीतील कचरा वर्गीकरणावर नियंत्रण राहील असेही आयुक्त म्हणाले. शहराचे भविष्य असणा-या विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करीत एकप्रकारे आपण शहराचे भविष्य घडवित आहोत असे त्यांनी सांगितले.
700 मेट्रीक टन दररोज निर्माण होणा-या शहरातील कच-यापैकी दोन महिन्यात आपण नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत कचरा निर्माण होतो अशा घराच्या पातळीवरच 300 मेट्रीक टन ओला – सुका कचरा वर्गीकरणापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि 100 टक्के कचरा वर्गीकरण हे आपले उद्दीष्ट आहे हे स्पष्ट करीत शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत शिक्षकांमध्ये व शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची साखळी निर्माण करीत आपण शाळा-शाळांमध्ये ओल्या कच-यावर प्रक्रीया करणारे प्रकल्प उभारण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणार असल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. याकरीता उपलब्ध असलेले विविध प्रकल्प पर्याय आपल्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत पार पाडली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
यापुढील काळात घरातूनच कमीत कमी कचरा कसा निर्माण होईल याकडे प्रत्येक नागरिकाने कटाक्षाने भर द्यावा असा प्रयत्न राहणार असून निर्माण झालेल्या कच-याचे सोसायटी पातळीवरच प्रकल्प राबवून विल्हेवाट लावण्याची सुविधा करण्याकडे विशेष लक्ष दिले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांमार्फत आपल्या घरात कच-याचे वर्गीकरण होते आहे काय?याकडे लक्ष दिले जाईलच याशिवाय सोसायटी पातळीवरही कच-याचे वर्गीकरण होते काय? महानगरपालिकेची कचरा गाडी वेळेवर येते काय? त्यामध्ये कचरा वेगवेगळा दिला जातो काय? या गोष्टींवरही नियंत्रण ठेवले जाईल अशी “क्लिनलीनेस सोल्जर” ही अभिनव संकल्पना त्यांनी मांडली. सुरत येथील प्लेगच्या साथीनंतर सर्वात स्वच्छ शहर म्हणून सुरतचा झालेला कायापालट याचे उदाहरण देत त्यामध्ये विद्यार्थ्यांचा स्वच्छता प्रणालीवर असलेला नियंत्रणात्मक सहभाग याचाही उल्लेख त्यांनी केला. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेप्रमाणेच सामाजिक स्वच्छता ही स्वत:ची जबाबदारी मानून कचरा वर्गीकरणाची व स्वच्छतेची सवय लावून घ्यायला हवी असे त्यांनी स्पष्ट केले.
“क्लिनलीनेस सोल्जर” ही संकल्पना सादरीकरणाव्दारे स्पष्ट करताना ई.टी.सी. केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांनी शाळा पातळीवर व सोसायटी पातळीवर विद्यार्थ्यांचे गट तयार करून कचरा वर्गीकरणाचा संदेश घराघरापर्यंत पोहचेल असे सांगितले.प्रायोगिक स्वरुपात असलेल्या या संकल्पनेबाबत काही सूचना करावयाच्या झाल्यास त्या 5 ऑगस्ट पर्यंतcommissioner@nmmconline.com, dmc_swm@nmmconline.com या ई-मेलवर कराव्यात असे आवाहन त्यांनी केले.
साधू वासवानी इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी ओला व सुका कचरा याबाबतची माहिती नाट्यमय स्वरुपात दिली.शाळेच्या प्राचार्य श्रीम. मंगला चंद्रशेखर यांनी कचरा वर्गीकरण व त्याची विल्हेवाट या दृष्टीने बालजनग्रह या सेवाभावी संस्थेव्दारे राबविल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती देत शाळेने याविषयी केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रीय व राज्य स्तरावर सन्मान झाला असल्याची माहिती दिली. शिक्षणाधिकारी संदिप संगवे यांनी स्वच्छता हे सुध्दा एकप्रकारचे मुल्य शिक्षण असल्याचे सांगत याव्दारे आपण समाजाला शाळेशी जोडतोय अशा शब्दात आभार मानले.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपस्थित मुख्याध्यापक, प्राचार्य, उपमुख्याध्यापक यांचेमार्फत स्वच्छतेचे हे अभियान शाळा-शाळांमध्ये व तेथून विद्यार्थ्यांमार्फत घराघरात पोहचेल असा विश्वास व्यक्त करीत उपस्थितांना “यासाठी आपण तयार आहात ना?” असा प्रश्न विचारल्यावर सर्वांनी हात उंचावत एकमुखाने नवी मुंबई स्वच्छ व सुंदर करण्यासाठी “आम्ही तयार आहोत” असा सकारात्मक प्रतिसाद दिला.