नवी मुंबई : आपत्कालीन नियंत्रणाचा विचार करताना त्याप्रसंगी करावयाच्या कार्यवाहीपुरता विचार न करता घटना घडण्यापूर्वी,घटनेप्रसंगी व घटनेनंतर अशा विस्तृत स्वरुपात नियोजन करणे गरजेचे असून याबाबतची अद्ययावत माहिती व ज्ञान मिळावे यादृष्टीने “घटना प्रतिसाद प्रणाली (Incident Response System) – IRS” कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून सकारात्मक रितीने ही प्रणाली समजून घेतल्यास व प्रत्यक्ष अंमलात आणल्यास कोणत्याही आपत्ती प्रसंगाचे सुयोग्य व्यवस्थापन करताना बहुपयोगी ठरेल असे मत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, यू.एन.डी.पी., यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई महानगरपालिकेत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय घटना प्रतिसाद प्रणाली कार्यशाळा शुभारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी यशदाचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र संचालक कर्नल व्ही.एन.सुपनेकर, नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण आणि महापालिकेसहजिल्हाधिकारी कार्यालय, सिडको, पोलीस, वाहतुक पोलीस, एमएमआरडीए, अग्निशमन, एमटीएनएल, एमएसईडीसी, कोस्टल, वनविभाग आणि इतर प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापनात समन्वय आणि संपर्क या दोन महत्वाच्या बाबी असून त्यामध्ये प्रत्येक घटकाची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे आपत्ती प्रसंगात प्रत्यक्ष मदत कार्य करणारी अनेक प्राधिकरणे असली तरी त्यांचा एक प्रमुख असायला हवा व त्या प्रमुखाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्य केले जावे, जेणेकरून मदतकार्यात सुसंगतपणा येऊन विहीत वेळेत व योग्य मदत मिळून आपत्ती प्रसंगाचे निराकरण लवकरात लवकर होईल. त्यादृष्टीने ही कार्यशाळा महत्वाची असून प्रत्येक घटकाला आपत्ती प्रसंगी करावयाचे कार्य समजावे असे त्यांनी सांगितले. आपत्ती प्रसंगात प्रतिसाद कालावधी (Response Time) हा सर्वात महत्वाचा असून तो कमीत कमी असणे आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्वाचे आहे. सर्वात कठीण आपत्ती प्रसंगी उत्तम तयारी म्हणजे आपत्ती व्यवस्थापन अशा शब्दात त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व विशद केले.
नवी मुंबई महानगरपालिका आणि भोवतालचा परिसर यामधील आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू असून लवकरच हे केंद्र कार्यान्वित होत असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.
कर्नल व्ही.एन.सुपनेकर यांनी आय.आर.एस. सारख्या महत्वाच्या विषयाबाबत कार्यशाळा आयोजनात पुढाकार घेणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका असल्याचे सांगत या प्रणालीचा उपयोग केवळ आपत्ती प्रसंगी नाही तर दैनंदिन कार्यप्रणालीतही चांगल्या रितीने होतो असे सांगत या प्रणालीची विस्तृत माहिती दिली. 29 व 30 जुलै या दोन दिवशी आयोजित या कार्यशाळेत कर्नल व्ही.एन.सुपनेकर यांच्याप्रमाणेच सोलापुरचे अतिरिक्त जिल्हा अधिकारी प्रविणकुमार देवरे हे पंढरपूर यात्रेच्या नियोजनातील आय.आर.एस. प्रणाली या विषयी माहितीप्रद व्याख्याने देणार आहेत.