महाड- मुसळधार पावसामध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा ब्रिटीशकालीन जुना पुल वाहून गेला. ही घटना मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत त्यावेळी पूलावर असणा-या दोन एसटी बसेस आणि काही खासगी वाहने वाहून गेली आहेत.
जयगडहून मुंबईला येणारी एमएच – २० – बीएल १५३८ आणि राजापूरहून बोरीवलीला येणारी एमएच – ४० – एन ९७३९ या दोन बसेस, एक तवेरा आणि आणखी काही वाहने वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे.
जयगड-मुंबई बसचे चालक एस. एस. कांबळे, वाहक व्ही. के. देसाई आणि राजापूर-बोरीवली बसचे चालक इ. एस. मुंढे, वाहक पी. बी. शिर्के आहेत. या दोन्ही बसमध्ये चालक-वाहकासह मिळून एकूण २२ प्रवासी होते.
या दोन बसेसची नोंद पोलादपुर एसटी स्थानकातून पुढे रवाना अशी आहे, मात्र या दोन्ही बसेसची त्यानंतर पुढे कोणत्याही डेपोत नोंद झालेली नाही.
एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफ शोधकार्यासाठी सहा बोटींचा वापर करणार आहे. तसेच नौदल आणि वायूदलाचीही मदत घेतली आहे. हॅलिकॉप्टर्सच्या मदतीने शोध कार्य सुरु आहे.
दरम्यान, पूल वाहून गेल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक कशेडी बायपासमार्गे वळवण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी दिली. मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
महाड तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये राजेवाडी गावाजवळील मुंबई गोवा महामार्गावरील जुना पुल मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास वाहून गेला. यात राजापुर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एस.टी. गाड्या आणि अन्य ७ ते ८ छोट्या चारचाकी गाड्या वाहुन गेल्याचा अंदाज आहे. नौदल, एनडीआरएफ, तटरक्षक दल, अग्निशमन दल, पोलिसांनी जोरदार शोधमोहीम हाती घेतली. मात्र, बुधवारी सायंकाळपर्यंत अथक परिश्रम घेऊनही गाडी किंवा प्रवाशांचा शोध लागला नाही. अंधार झाल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली असून गुरुवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु ठेवण्यात येणार आहे.
गेल्या दोन दिवसात महाबळेश्वरमध्ये सोमवार आणि मंगळवारी मिळुन ४५२ मिमी पाऊस कोसळला. यामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्याच वेळेस काळ नदीनेही उग्र रूप धारण केले. सावित्री आणि काळ नदीच्या प्रचंड वेगाने वाहणा-या पुराच्या पाण्याने मुंबई गोवा महामार्गावरील सावित्री टोल नाक्याजवळील जुना ब्रिटीश काळातील दगडी पुल रात्रीच्या अंधारात वाहून गेला. दाट अंधार आणि मुसळधार पावसामुळे पुल वाहून गेल्याचा अंदाज वाहनचालकांना आला नाही. यामुळे या महामार्गावरून जाणारी सात ते आठ वाहने पुलावरून नदीत कोसळली आणि प्रचंड वेगात वाहणा-या पुराच्या पाण्यात वाहून गेली.
या जुन्या पुलाशेजारीच नवा पुल बांधण्यात आला आहे. दुहेरी मार्गावरील या नव्या पुलावरून कोकणात जाणारी वाहने तर जुन्या पुलावरून मुंबईकडे जाणारी वाहनांची वाहतुक होत असे. हा पुल दगडी कमानी बांधकामाचा पुल आहे. या पुलाला सतरा गाळे होते. याची उंची नऊ मीटर होती. अंधा-या रात्री हा पुल मुळापासून उखडून गेल्याने पाण्याचा प्रवाह किती ताकदीचा होता याचा अंदाज येतो. ही घटना समजताच प्रशासनाचे सर्व अधिकारी रात्री साडेबारा वाजता घटनास्थळी दाखल झाले. नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या वाहनांचा शोध घेण्याकरीता दादली पुल, खाडीपट्टा आदी भागात कर्मचारी नेमुन ग्रामस्थांना देखील सूचीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आपत्कालीन यंत्रणेमार्फत नौदल आणि तटरक्षक दलामार्फत हेलिकॉप्टर आणि होड्यांच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला. दासगाव ते घटनास्थळ आणि दरम्यानच्या नदीपात्राचा हेलिकॉप्टर मार्फत शोध घेण्यात आला. मात्र हाती काहीही लागले नाही.
सोशल मिडीयाचा अतिरेक
जिल्हाधिकारी शीतल उगले आणि पोलीस अधीक्षक सुवझ हक यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन पुरूषांचे मृतदेह दासगाव खाडीत सापडल्याचे सांगितले. मात्र दासगाव खाडीपट्टा परीसरात दुपारपर्यंत कोणताही मृतदेह सापडला नाही. याबाबत सोशल मिडीयावर नदीपात्रातील मृतदेहांचे चुकीचे फोटो व्हायरल करण्यात आला. याच्याच आधारावर जिल्हाधिकारी श्रीमती उगले यांनी मिडीयाला दोन मृतदेह सापडल्याचे सांगितले. मात्र हा सर्व प्रकार खोटा असल्याचे समोर आले आहे. दिवस भर दादली पुल, शेडव नाका, गांधारी पुल, आंबेत, दासगाव, चिंभावे आदी ठिकाणी मृतदेह आणि गाड्या मिळाल्याच्या अफवा सुरू होत्या. यामुळे तालुक्यातील आणि शहरातील लोकांनी नदी किनारे, वेगवेगळ्या पुलांवर आणि महामार्गावर गर्दी करून उभे असल्याने वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे शोध कार्यात अडचणी निर्माण होत होत्या.
ब्रिटीश सरकारच्या पत्राकडे दुर्लक्ष
या पुलाचे बांधकाम १९२८ मध्ये झाले आहे. हा पुल कालबाह्य झाला आहे. अशा आशयाचे पत्र ब्रिटीश सरकारने भारत सरकारला याआधीच दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
पुलाला धोका नसल्याचा दोन महिन्यांपूर्वी शासकीय यंत्रणांनी दिला होता अहवाल
सावित्री नदीवरील महाडजवळच्या या ब्रिटिशकालीन पुलाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी मे २०१६ मध्ये पाहणी केली होती. या पुलाला कोणताही धोका नाही असा अहवाल अभियंत्यांनी दिला होता. त्यामुळे ८८ वर्षापूर्वी बांधलेल्या या पूलावरून वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती. सध्या हा पूल कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पेण यांच्या अखत्यारीत आहे. महाडपासून ४ कि.मी. अंतरावर दक्षिणेस बिरवाडी हद्दीमध्ये सावित्री नदीवर मुंबई – गोवा महामार्गावर हा पूल ब्रिटीशांनी १९२८ साली बांधला होता. त्याची लांबी १८० मिटर तर रूंदी ६ मिटर होती. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा २०११ साली सर्वे केल्यांनतर कन्सल्टन्सी इंजिनियरींग सर्व्हिसेस मुंबई यांनी या पुलाला धोका नसल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर मे २०१६ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी सुद्धा या पूलाची पाहणी करून हा पूल धोकादायक नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे या पूलावरून देखील वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. अखेर हा पूल सावित्रीच्या प्रवाहाने कोसळला.
राजापूर-बोरिवली आणि जयगड – मुंबई या एसटी बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी, तसेच खाजगी बेपत्ता वाहनातील नागरिकांच्या नातेवाईकांनी रायगड जिल्हा नियंत्रण कक्षाशी ०२१४१- २२२११८ येथे आणि नियंत्रण कक्ष, टोल फ्री क्रमांक १०७७ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.