काँग्रेस पक्षाने म्हणजेच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी राणेंना विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले आणि राणेंनी पक्षाने टाकलेला विश्वास खरा करून दाखविला.
पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील साडेअकरा कोटी जनतेला यावेळी पाहायला आणि ऐकायला मिळाला, तो आवाज म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे होय. राणे यांचा प्रवेश राज्याच्या विधान परिषदेत अतिशय सन्मानाने झाला. त्यांची निवड झाली ती बिनविरोध. काँग्रेस पक्षाने म्हणजेच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी राणेंना विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले आणि राणेंनी पक्षाने टाकलेला विश्वास खरा करून दाखविला.
विधान परिषदेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षीय बळ जास्त असल्याने त्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र सभागृहात कायम दबदबा राहिला तो नारायण राणेंचाच. राणे म्हटले की, आक्रमक आणि रोखठोक बाणा. परंतु वरिष्ठ सभागृहात त्यांनी अत्यंत शिस्तीत आणि अभ्यासपूर्ण सहभाग घेऊन स्वत:ची उत्तम छाप पाडली आहे. मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता आणि पुन्हा मंत्री अशी वाटचाल केल्याने शासन, प्रशासनाचा दांडगा अनुभव नारायण राणेंच्या पाठीशी आहे. प्रशासनावर आणि स्वपक्षातील सहका-यांवरही राणे यांनी त्यांच्या अनुभवी कारभाराने आदरयुक्त जरब बसविली आहे.
विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून एकत्रित काम करताना दिसत असले तरी, दोन्ही पक्षांचे सरकारच्या विरोधात मनोमीलन नाहीये. या उलट विधान परिषदेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती असली, तरी प्रभाव आणि वर्चस्व होते ते केवळ नारायण राणे आणि नारायण राणे यांचेच. यात दुमत होणे नाही.
राणेंच्या कामाची एक पद्धती आहे
ज्येष्ठांच्या ज्येष्ठ सभागृहात आगमन झाल्यावर राणेंच्या व्यक्तिमत्वात मोठा आणि सकारात्मक बदल अनेकांना जाणवू लागला. वैचारिक अशी वेगळी उंची आणि प्रगल्भता दिसून आली. परिषदेच्या कामकाजावर बारीक लक्ष आणि जनहिताचीच काळजी त्यांच्या कृतीतून सभागृहाला दिसून आली. हातात कायद्याची आणि विधिमंडळाच्या नियमांची पुस्तकं घेऊनच नारायण राणे सभागृहात येतात आणि अखेपर्यंत, कामकाज संपेपर्यंत ठाण मांडून बसतात. हा गुण अन्य सदस्यांत दिसत नाही.
राणेंच्या विधान परिषदेतील प्रवेशामुळे सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनाही शिस्त आणि गांभीर्य पाळावे लागते. मंत्रीही राणेंच्या दबावाखाली असतात. चुकीचं आणि पोकळ आश्वासन देण्याची सवय असलेल्या मंत्र्यांना आता वास्तव आणि ठोस आश्वासन द्यावं लागतं. एखाद्या प्रश्नाला बगल दिली जात आहे किंवा सदस्यांची दिशाभूल केली जात असल्याचे जाणवताच नारायण राणे ताडकन उभे राहतात आणि मंत्र्यांना अचूक, जनहिताचे भान द्यावे लागते.
राणेंना टाळून, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कोणाही मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांनाही पुढे जाता येत नाही. सभापतींनाही नारायण राणेंची कायम दखल घ्यावीच लागते. मुंबईसह राज्याचे कोणतेही प्रश्न, लक्षवेधी, चर्चा असली तरी नारायण राणे त्यात लक्ष घालतात, बारकावे शोधतात आणि सरकार आणि सभापतींकडून प्रश्नांना, समस्यांना उत्तर देण्याची तत्परता राणे दाखवतात. राज्यातील प्रश्नांची त्यांना भरपूर जाण आहे आणि त्यांचा आटापिटा जनतेच्या भल्यासाठीच असतो.
कोपर्डीतील अत्याचाराचे प्रकरण असो की, कलंकित मंत्र्यांचा मुद्दा असो, मुंबई महानगरपालिकेतील विविध घोटाळे असोत, राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांची गुंडगिरी असो, राणे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. सत्ताधा-यांना घाम फोडला आहे. भाजपाचे असोत की शिवसेनेचे मंत्री असोत, त्यांना राणेंना मान आणि सन्मान द्यावा लागतो. अधिका-यांचे कान आजवर कोणाही सदस्यानी टोचले नव्हते, पण वरिष्ठ सभागृहाची शान राहावी, प्रतिष्ठा वाढावी, म्हणून नारायण राणे यांनी स्वत:कडे वाईटपणा घेऊन मंत्र्यांना, सहकारी सदस्यांना टोकायला कमी केलेले नाही. शेवटी सभागृहाची प्रतिष्ठा आणि श्रीमंती जपण्यावरच राणेंचा कटाक्ष असतो.
नारायण राणेंची खरी गरज विधानसभेत होती. त्यांनी सहा वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून त्या पदाला एक उंची मिळवून दिली. एक आदरयुक्त दरारा निर्माण केला. आज विधान परिषदेत धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते असले, तरी त्या या लोकशाहीची शान असलेल्या सभागृहात हुकूमत आहे ती नारायण राणे यांचीच. महाराष्ट्राचे हितच त्यांच्या डोळ्यांसमोर असते. पक्षीय राजकारणापलीकडे लोकशाहीची संकल्पना आहे, यावर राणे यांचा विश्वास आहे. विधान परिषदेत कृतिशील विचारवंतांची आज कमतरता आहे. राणेंच्या अस्तित्वाने ही उणीव भरून निघाली आहे. सरकारवर अंकुश ठेवण्यात पहिल्याच अधिवेशनात नारायण राणे यशस्वी झाले आहेत. काँग्रेस पक्षाची हिंमत, प्रतिष्ठा आणि विरोधाची धार राणेंनी वाढविली आहे. पक्षाला संजीवनी मिळून दिली आहे.