नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाळी कालावधीतील आजार प्रसारीत होऊ नयेत यादृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्यात येत असून त्याकरीता प्रतिबंधात्मक विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. यामध्ये मलेरिया/डेंग्यू आजारांच्या नियंत्रणाकरीता विशेष काळजी घेण्यात येत आहे.
एप्रिल महिन्यापासूनच विशेष मोहिमेअंतर्गत महापालिका क्षेत्रात विभागवार असलेल्या नागरी आरोग्य केंद्र स्तरावरून गप्पी मासे मोहिम,व्यापक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन सुरु करण्यात आले असून मे महिन्यापासून घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोधमोहिम हाती घेण्यात येऊन डास अळीनाशक फवारणी करण्यात आली. जून महिन्यात हिवताप प्रतिरोध महिना म्हणून 61 ठिकाणी हिवताप शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन 12हजाराहून अधिक नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले.
जुलै महिना हा डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून पाळण्यात आला असून विविध 69 ठिकाणी डेंग्यू / मलेरिया विषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये रक्त नमुने घेऊन 2507 रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे या आजारांविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी या दृष्टीने 11205 हस्तपत्रकांचे वितरण करण्यात आले. रक्त नमुना दुषित आढळलेल्या एका रुग्णास 14 दिवसांचा संपूर्ण उपचार देण्यात आला आहे. तसेच सदर या रुग्णाच्या परिसरातील 100 घरांमध्ये जलदताप सर्व्हेक्षण, घरांतर्गत डास उत्पत्ती शोधमोहिम, धुरीकरण व डास नाशक पावडर फवारणी करण्यात आलेली आहे.
मागील वर्षी जानेवारी 2015 ते 4 ऑगस्ट 2015 या कालावधीत महापालिका क्षेत्रात हिवतापाचे 146 रुग्ण आढळून आले होते.तसेच डेंग्यू सदृष्य 434 रुग्ण आढळून आले होते. त्यादृष्टीने या वर्षी अधिक खबरदारी बाळगत सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक विशेष उपाययोजना करण्यात आल्याने या वर्षी मलेरिया/डेंग्यू आजारांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. यावर्षी माहे जानेवारी 2016 ते 4 ऑगस्ट 2016 पर्यंत महापालिका क्षेत्रात हिवतापाचे एकुण 121 रुग्ण आढळले आहेत तसेच डेंग्यूसदृश्य एकुण 107 संशयीत रुग्ण आढळले असून त्यापैकी 7 रुग्णांना डेंग्यू झाल्याची तपासणीअंती खात्री झाली व त्यावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने सर्वच रुग्णांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व प्रकारची प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. यादृष्टीने महत्वाचे म्हणजे महापालिका रुग्णालये व खाजगी रुग्णालये येथून मलेरिया/डेंग्यू याबाबतचा दैनंदिन अहवाल संकलीत करण्यात येत आहे.
अशाचप्रकारे नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात आवश्यक ठिकाणी जलद ताप सर्व्हेक्षण व डास उत्पत्ती शोध मोहीम नियमितपणे राबविण्यात येत आहे. तसेच वृत्तपत्रांतून, व्हॉट्सॲप सारख्या लोकप्रिय सोशल मिडीयातून या आजारांविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येऊन त्यांच्या क्षेत्रात रॅलीव्दारे जनजागृती करण्यात आली आहे. यासोबतच ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे, सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागरण करण्यात येत आहे. याशिवाय चर्चासत्र, पोस्टर्स, हस्तपत्रके याव्दारे नागरिकांना आरोग्य शिक्षण दिले जात आहे. घरांतर्गत किंवा सोसायटी अथवा बांधकाम आवारात डास उत्पत्ती स्थाने आढळून आल्यास संबंधितांना नोटीसा बजावण्यात येत आहेत.
नमुंमपा कार्यक्षेत्रातील सर्व नमुंमपा – खाजगी शाळा व महाविद्यालयांमध्ये डास नाशक फवारणी (Indoor Residual Spray) करण्यात आलेली असून डासांचा प्रादुर्भाव होणार नाही व हिवतापाचे संक्रमण होणार नाही याकरीता नागरिकांचेही सहकार्य गरजेचे असून नागरिकांनी आपले घर, कार्यालय व परिसरात पाणी साचून राहणार नाही याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांनी आपल्या गच्चीवरील व घरांतर्गत असलेले भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे, उघड्यावरील टायर्स असे अनावश्यक पडलेले साहित्य नष्ट करावे. फुलदाण्या, ट्रे, फेंगशुई यामध्ये साचलेले पाणी आठवड्यातून एकदा बदलावे. घरामधील व घराबाहेरील पाणी साठविण्याचे ड्रम, टाक्या, भांडी आठवड्यातून एकदा पूर्णपणे कोरडे करावे.शक्य झाल्यास डास प्रतिबंधात्मक मच्छरदाणीचा वापर करावा. फ्रिजचा डिस्फ्रॉस्ट ट्रे तसेच एसी डक्ट मध्ये साचलेले पाणी नियमीत काढून टाकावे.
महापालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये – दवाखान्यांत सर्व प्रकारच्या तापाच्या रुग्णांची मोफत रक्त तपासणी होत असून आवश्यकतेनुसार घरी जाऊनही रुग्ण संशोधन कार्यवाही करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी रुग्ण संशोधन कार्यवाहीसाठी आपल्या घरी येणा-या आरोग्य कर्मचा-यास तसेच फवारणी कामगारांस सहकार्य करावे.
पावसाळी कालावधीतील डासांचे संभाव्य वाढते प्रमाण लक्षात घेऊन डासांच्या उत्पतीवरील प्रतिबंधासाठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी व महानगरपालिका आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत असून नागरिकांनी आपल्या घर, परिसरात हिवताप / डेंगी आजाराचा प्रादुर्भाव आढळल्यास अथवा डासांचा प्रादुर्भाव दिसल्यास नजिकच्या महापालिका आरोग्य केंद्राशी वा नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाशी तातडीने संपर्क साधावा जेणेकरून नागरिकांच्या तक्रारीची त्वरीत दखल घेण्यात येऊन उचित कार्यवाही करण्यात येईल असे सूचित करण्यात येत आहे.