नवी मुंबई : सर्व प्रकारच्या अपंग व्यक्तींना एकाच छताखाली शिक्षण, प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी इ.टी.सी.अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र चालविणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका असून या अपंग कल्याणकारी उपक्रमचा गौरव देशा-परदेशातील विविध पुरस्कारांनी, तज्ज्ञ मान्यवरांच्या कौतुक शब्दांनी अनेकदा झाला आहे.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, विधानसभा सदस्य, बेलापूर यांनी केलेल्या इटीसी पाहणी दौ-याच्या अनुषंगाने विविध प्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने इटीसी उपक्रमाबद्दल व तेथील अपंग कल्याणकारी कार्याबद्दल गैरसमज होऊ नयेत, म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने याबाबतची वस्तुस्थिती मांडण्यात येत आहे.
28 जून 2007 रोजी अनिवासी कर्णबधिर शिक्षण, प्रशिक्षण केंद्रापासून सुरुवात करुन पुढे 2008 पासून नवी मुंबई महानगरपालिकेने या केंद्राचा विस्तार करीत कर्णबधिर, मतिमंद, अंध, अध्ययन अक्षम, बहुअपंगत्व, स्वमग्न अशा विविध प्रकारच्या अपंग व्यक्तींना सामावून घेणा-या इ.टी.सी. केंद्रास सुरुवात केली. विविध स्वरुपाचे अपंगत्व लक्षात घेऊन त्यादृष्टीने उपयोगी अभ्यासपध्दती विकसित केल्याने अल्पावधीतच बालकांसह पालकांचाही विश्वास केंद्राने संपादन केला आहे. येथील प्रवेशाची मागणी वाढू लागली व ही वाढती मागणी लक्षात घेऊन वाशी येथे स्वतंत्र इमारतीत इ.टी.सी.केंद्र स्थलांतरीत करण्यात आले. त्यानंतरही प्रवेशाची मागणी वाढतच आहे.
सध्या इ.टी.सी. केंद्रात 650 विद्यार्थी प्रवेशित असून याठिकाणी एकात्म शिक्षण, समावेशित शिक्षण, दूर शिक्षण असे शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. याठिकाणी अपंगत्वाचे स्वरूप लक्षात घेऊन प्रशिक्षण दिले जात असल्याने एकाचवेळी सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण न देता अपंगत्वाच्या स्वरूपानुसार बॅचनिहाय दिवसभर प्रशिक्षण दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांची मोठी संख्या आणि जागेची अडचण लक्षात घेऊन मतिमंद शिक्षण विभाग दोन सत्रात सकाळी व दुपारी सुरु असतो. इ.टी.सी. केंद्र ही अपंगांची फक्त शाळा नसून ते अपंग विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालक, अपंगव्यक्ती, विशेष शिक्षक, सामान्य शिक्षक व विशेष प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण केंद्र आहे. मागील वर्षात या सर्व प्रकारच्या साधारणत: 5000 हून अधिक व्यक्तींनी या शिक्षण, प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. त्याचा संपूर्ण तपशील केंद्रामध्ये उपलब्ध आहे.याशिवाय 1200 हून अधिक अपंग व्यक्तींचे प्रवेशासाठी विनंतीअर्ज प्राप्त असून ते प्रतिक्षा यादीवर आहेत आणि प्रवेशासाठी इच्छुक सर्व्हेक्षणातील अपंग व्यक्तींची संख्या कितीतरी अधिक आहे.
नवी मुंबई शहरातील सीआरझेड क्षेत्रात असणा-या एकूण 132 इमारतींचा प्रस्ताव एमसीझेडएमए कडे पाठविण्यात आलेला आहे. त्यामध्ये इ.टी.सी. केंद्राचाही समावेश असून त्यांस मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. एमसीझेडएमए मार्फत ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर इतर इमारतींसोबत इटीसी केंद्रासही भोगवटा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येईल. तत्पुर्वी कारवाई करावयाची झाल्यास ती सर्व 132 इमारतींवर करावी लागेल, मात्र सदर प्रस्ताव शासन विचाराधीन असल्याने कारवाई करण्यात आलेली नाही.
इ.टी.सी. केंद्रातील गणवेश व शैक्षणिक साहित्य तेथील विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यानंतर योग्य वेळेत लगेचच उपलब्ध करुन देण्यात येत असते. इ.टी.सी. केंद्राव्दारे बहुअपंगत्वाना शिक्षण – प्रशिक्षण दिले जात असल्याने येथील प्रवेशप्रक्रिया शाळेसारखी केवळ सुरुवातीलाच नसून आवश्यकतेप्रमाणे वर्षभर सुरु असते. त्यामुळे गणवेश व शैक्षणिक साहित्य काही प्रमाणात भांडारगृहात उपलब्ध ठेवावे लागते. सदर भांडारातील साहित्याचे नियमित परीक्षण केले जात असून त्याठिकाणी उपलब्ध साहित्य योग्य आहे व त्यामध्ये कोणताही फरक आढळून आलेला नाही. यासोबतच तेथील विद्यार्थ्यांसाठीची प्रयोगशाळाही सर्व उपकरणे – साहित्याने परीपूर्ण असून तिचा वापर आवश्यकतेनुसार योग्यवेळी योग्य प्रमाणात करण्यात येत असतो.
इ.टी.सी.चे कल्याणकारी कार्य पाहून काही खाजगी संस्थांनी उपयोगी उपकरणे, साहित्य केंद्रास सहकार्य स्वरुपात प्रदान केले असून त्याठिकाणचे साहित्य हे खाजगी संस्थांचे नसून इ.टी.सी. केंद्राच्या अखत्यारितील व वापरातील साहित्य आहे.
अपंग क्षेत्र सक्षमीकरण करणे याकरीता महापालिका अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली असून त्याबाबतचे धोरण महापालिका सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आलेले आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करुन धोरण तयार करणे ही पध्दती अवलंबविण्यात आलेली आहे.
अपंगांचे सामाजिक पुनर्वसन, सर्वेक्षण, क्षेत्रभेट, अतिथी खर्च यावर खर्च कऱण्यात आलेली रक्कम आवश्यकतेनुसार आर्थिक नियोजन व गरजेपुरतीच करण्यात आलेली आहे व याबाबतचे लेखा परीक्षण नियमित होत असते.
केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत या ‘अपंग शिक्षण’ या विषयातील डॉक्टरेट असून त्यांची निवड व नेमणूक पूर्णपणे नियमानुसार झालेली आहे. रितसर जाहिरातीव्दारे त्यांची 9/5/2007 रोजी सरळ सेवेने मुख्याध्यापक पदावर नेमणुक झालेली असून त्यानंतरही केंद्रासाठी संचालक पदाची जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर रितसर निवड प्रक्रिया पूर्ण करून त्यांची सरळसेवेने संचालक, केंद्रप्रमुख म्हणून दि. 28/1/2008 मध्ये नेमणुक झालेली आहे. ही नियुक्ती सरळसेवेने रितसर प्रक्रियेने झालेली असून त्यांना या पदावर पदोन्नती देण्यात आलेली नाही.
त्याचप्रमाणे अपंग कल्याणकारी क्षेत्रातील कामाची दखल घेत त्यांना नागरी प्रशासनातील सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल देशातील मानाचा मा. पंतप्रधान पुरस्कार ( Prime Minister Award for Excellence in Public Administration)सन 2011 मध्ये प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र शासनानेही इ.टी.सी. केंद्रास सर्वोत्कृष्ट अपंग कल्याणकारी कार्य करणारी संस्था म्हणून सन 2012 मध्ये गौरविले आहे. अपंगांविषयीच्या डॉ. वर्षा भगत यांच्या अभ्यासामुळे त्यांना शासनामार्फत बिहार, पाँडेचरी, गोवा, कर्नाटक, ओडीसा, आसाम, दिल्ली, गुजरात, यशदा असा विविध ठिकाणी सादरीकरणाकरीता निमंत्रीत करण्यात आले आहे व येत असते. संस्थांची गुणवत्ता तपासणी करणा-या QCI – NABET या मानांकीत राष्ट्रीय संस्थेनेही इ.टी.सी. केंद्रास “अ” श्रेणीचे अधिस्विकृती प्रमाणपत्र देऊन गौरविले असून अशाप्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करणारे हे अपंग क्षेत्रातील एकमेव केंद्र आहे. याशिवाय केवळ राज्य व देशातील नव्हे तर अमेरिका, इंग्लंड, इटली,ऑस्ट्रेलिया, चीन सारख्या विविध देशांतील अपंग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी तसेच मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटी देऊन इ.टी.सी. च्या कार्यपध्दतीचे कौतुक केले आहे. नुकतेच 28 एप्रिल 2016 रोजी महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती समितीतील उपस्थित 9 आमदार सदस्यांनीही इटीसीच्या कार्याची प्रशंसा केली आहे. यामध्ये केंद्र संचालक म्हणून डॉ. वर्षा भगत यांच्या अभ्यासू व सर्वसमावशक कार्यपध्दतीचा महत्वाचा वाटा आहे. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या इ.टी.सी.केंद्र भेटीच्या वेळी संचालक डॉ. वर्षा भगत पूर्वपरवानगीने 11 ऑगस्टपासून रजेवर असल्याने त्याठिकाणी उपस्थित नव्हत्या.
इ.टी.सी. केंद्रामार्फत अपंग विद्यार्थी व व्यक्ती यांना स्वावलंबी बनवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम प्रभावीपणे केले जात आहे. विद्यार्थी आणि पालकांचा अढळ विश्वास केंद्रातील कार्यपध्दतीवर असल्याने केंद्रात प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांची प्रतिक्षा यादी सतत वाढती असून आणखी एखादे उपकेंद्र सुरु करावे अशी मागणी पालक व लोकप्रतिनिधी यांचेकडून होत आहे. याठिकाणी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात दिले जाणारे शिक्षण – प्रशिक्षण तसेच समर्पित भावनेने काम करणारे शिक्षक आणि त्यांचे टिमवर्क यांचाही इ.टी.सी.च्या नावलौकिकात मोठा वाटा आहे.म्हणूनच स्वच्छ कामकाज व लोककल्याणकारी कार्य करणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे इ.टी.सी. अपंग शिक्षण,प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र विशेष विद्यार्थी – व्यक्तींचा व त्यांच्या पालकांचा आपुलकीचा आधार झालेले दिसून येते.